नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी) : 'साप्ताहिक विवेक'तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाची सखोल माहिती देणारा 'लोकनेता ते विश्वनेता' ग्रंथ सोमवारी देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना सादर करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाचा सखोल आढावा घेणारा 'लोकनेता ते विश्वनेता' या ग्रंथाची निर्मिती 'साप्ताहिक विवेक'तफे करण्यात आली आहे.
हा ग्रंथ देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना सोमवारी उपराष्ट्रपती भवनामध्ये सादर करण्यात आला. यावेळी उपराष्ट्रपती नायडू यांनी ग्रंथाचे अवलोकन करून हा ग्रंथ प्रत्येक भारतीयाने वाचायला हवा, असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे 'साप्ताहिक विवेक'ने अतिशय महत्त्वाच्या विषयावर दर्जेदार ग्रंथाची निर्मिती केल्याचे सांगून 'साप्ताहिक विवेक'चे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी साप्ताहिक विवेकचे मुद्रक - प्रकाशक राहुल पाठारे, समुहाचे मुख्य लेखापाल आदिनाथ पाटील, ग्रंथाचे संपादक निमेश वहाळकर, मार्केटिंग विभाग प्रमुख अजय कोतवडेकर, ग्रीन वॉटर रेवल्युशन प्रा. लि.चे फाउंडर - मॅनेजिंग डायरेक्टर यशवंत कुलकर्णी, बी. वी. जी. ग्रुप इंडियाचे डायरेक्ट राजीव जालनापूरकर आणि सुजाता जालनापूरकर, विवेक समुहाचे गार्डियन डॉ. दिलीप कुलकर्णी, जयपॅन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे एम.डी. कमलेश पांचाल, जे - पॅन ट्युब्यूलर कॉम्पोनॅन्ट्स प्रा. लि.चे चेअरमन जिग्नेश पांचाल, एस. एस. हायस्कुलचे चेअरमन कमलेश पटेल आणि 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणाचा सखोल आढावा प्रथमच मराठीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात देशाच्या परराष्ट्र धोरणास नवी दिशा दिली आहे. जागतिक संघर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांची मुत्सद्देगिरी महत्वाची ठरत आहे. या सर्व घटनांचा सखोल आढावा प्रस्तुत ग्रंथात घेण्यात आला आहे. मराठीमध्ये अशा प्रकारचा ग्रंथ प्रथमच प्रकाशित करण्यात आला आहे.