मुंबई(प्रतिनिधी): तमिळनाडूतून तीन नव्या पालींचा शोध लावण्यात आला आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि इशान अगरवाल यांनी अशा तीन दुर्मिळ पालींचा शोध लावला आहे. जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या ‘व्हर्टब्रेट झुलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत त्यांचा यासंबंधीतील शोध निबंध प्रकाशित झाला आहे.
या तिन्ही पाली निमाॅस्पीस प्रजातीच्या असून, आपापल्या भागातील प्रदेशनिष्ठ जाती आहेत. या मध्ये 'निमाॅस्पीस अळगु' 'निमाॅस्पीस कलकडेनसीस' आणि 'निमाॅस्पीस मुंदनथुराईएनसीस' या तीन पालींचा समावेश आहे. जगभरात निमाॅस्पीस प्रजातीच्या पालींच्या १५० हून अधिक प्रजाती आढळून येतात. आत्तापर्यंत पश्चिम घाटात निमाॅस्पीस प्रजातीच्या तब्बल ४७ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. शरीरशास्त्र आणि जनुकीय विश्लेषणाच्या आधारावर या तिन्ही पाली वेगळ्या असल्याची पुष्टी तज्ज्ञांनी केली आहे. त्यानंतर सोमवारी (ता. २० ) ‘व्हर्टब्रेट झुलॉजी’ पत्रिकेतून हा शोध निबंध प्रकाशित करण्यात आला. यासंबंधीतील माहिती संशोधक तेजस ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडियावरून काही छायाचित्रे प्रसारित करून दिली.
नव्याने शोधण्यात आलेल्या या पालींमध्ये, 'निमाॅस्पीस अळगु' हे नाव त्याच्या सौंदर्यावरून ठेवले आहे! अळगु हा तमिळ शब्द असून याचा अर्थ सुंदर असा आहे. ही पाल केवळ तिरुकुरुंगुडी राखीव जंगलात आढळते. ही समुद्र सपाटीपासून २००-३०० मीटर उंचावरील शुष्कपानगळी जंगलातील दगडांवर आढळून येते. ही एक दिनचर पाल असून छोट्या किटकांवर आपला उदर निर्वाह करते.त्याच बरोबर निमाॅस्पीस मुंदनथुराईएनसीस' ही पाल देखील समुद्र सपाटीपासून २००-३०० मीटर उंचावरील शुष्कपानगळी जंगलातील दगडांवर आढळून येते. ही एक दिनचर पाल असून छोट्या किटकांवर आपला उदर निर्वाह करते. तर, निमाॅस्पीस कलकडेनसीस ही समुद्र सपाटीपासून ९००-११०० मीटर उंचावरील सदा हरित जंगलात झाडांवर सापडते, ही एक दिनचर पाल असून छोट्या किटकांवर आपला उदर निर्वाह करते. या तिन्ही पाली छोट्या आकाराच्या पाली आहेत. या पालींची लांबी ३५ मिमी पर्यंत जाते.
नव्याने शोध लागलेल्या पालीच्या या तिन्ही प्रजाती या शरीराचा रंग, खवल्यांची संख्या, तसेच इतर शारीरिक वैशिष्ट्ये आणि जनुकीय विश्लेषणाच्या आधारावर नवीन असल्याचे सिद्ध झाले असून तज्ज्ञांनीही याची पुष्टी केली आहे. या संशोधनामुळे पश्चिम घाटातील या प्रजातीची संख्या ४७ वर गेली आहे. मात्र भारतात अजूनही नवीन प्रजातींचा शोध लागत असून पाली, आणि इतर सरीसुप आणि एकूणच पर्यावरणीय अभ्यासाच्या दृष्टीने फारसे काम झालेले नसल्याचे सिद्ध होते, असे तिन्ही संशोधकांनी सांगितले.