एकाच हाताची पाचही बोटं जशी सारखी नसतात, तशा एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या विचार करण्याच्याही म्हणा शंभर तर्हा. आता शरद पवार आणि कुटुंबीयही त्याला अपवाद नाहीच की... काका-पुतण्याची विचार अन् कृती करण्याची पद्धतही पहाटेच्या शपथविधीवेळी अवघ्या महाराष्ट्राने अनुभवलीच. आताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खा. शरद पवार आणि त्यांच्या कन्या बारामतीच्या खा. सुप्रिया सुळे यांच्या अशाच काहीशा परस्पर विरोधी विचारांचा प्रत्यय नुकताच आला. आता महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणा जशी आधीची पिढी वागली, तसेच सध्याची आणि पुढची पिढी वागेल, असे मुळीच नाही. मग ते ठाकरे असो वा पवार अथवा राजेंचे घराणे, चर्चा तर होणारच! एकीकडे शरद पवारांनी दगडूशेठ मंदिरात नुकतेच पाऊल ठेवायचे टाळले, तर या घटनेला काहीच दिवस उलटत नाही, तोवर पवारांची कन्या थेट तुळजापूरला तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक झाली. आता सुप्रियाताईंचे हे देवदर्शन पवारसाहेबांच्याच आशीर्वादाने मुद्दाम घडवून आणले होते की, ताईंनी सहजच तुळजापूर गाठले ते देवी तुळजाभवानीच जाणो. पण, राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी, देवदर्शन, दौरे असे सगळेच वाटते तितके नैसर्गिक असेलच, असे मुळीच नाही. त्यातच नास्तिक म्हणून ओळखले जाणार्या पवारांची आस्तिक कन्या तुळजाभवानीसमोर एकाएकी नवस बोलते आणि तोही राजकीय नवस म्हटल्यावर राजकीय वर्तुळात भुवया उंचावणे अगदी साहजिकच! ‘राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, सर्व मंत्रिमंडळासोबत नवस फेडायला येईन,’ असे म्हणून सुप्रियाताईंनी राष्ट्रवादी काँग्रेसची आगामी काळातील राजकीय महत्त्वाकांक्षाच म्हणा बोलून दाखवली. त्यामुळे ‘पुढील २५ वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार,’ असे प्रतिदावे राऊतांनाही लगोलग करावे लागले. यावरून हेच स्पष्ट होते की, ठाकरेंना या खुर्चीवर आणखीन किती दिवस बसू द्यायचे अथवा नाही, हे राष्ट्रवादीच्या घड्याळाचे तीन काटेच ठरवतील. तसेच, महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे हे दीर्घकालीन नेतृत्व सर्वमान्य नाहीच, यावरही सुप्रियाताईंच्या नवसाने शिक्कामोर्तबच केले. पण, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री म्हणजे नेमके कोण? खुद्द सुप्रियाताई की अजितदादा, या महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुचर्चित प्रश्नावर मात्र सुप्रियाताईंनी पवारांचाच आदर्श घेऊन ‘सस्पेन्स’ मात्र कायम ठेवला.
अहो, हे तर मुंबईचे मुख्यमंत्री!
मुख्यमंत्रिपदाचे दायित्व स्वीकारल्यापासूनच उद्धव ठाकरे मुंबईबाहेर फारसे पडले नाहीच. अपवाद काय तो कोकणातील वादळानंतरच्या धावत्या तोंडदेखल्या दौर्यांचा आणि गाडी चालवत पंढरपूरच्या विठ्ठलदर्शनाचा. पण, त्यापलीकडे आपण मुंबईचे नाही, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत, याचा मात्र उद्धव ठाकरेंना सपशेल विसर पडलेला दिसला. ‘कोविड’ काळ असो वा नंतर त्यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया, वैद्यकीय कारणांच्या आड मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या वेशीबाहेर पाऊल ठेवण्याचेही बहुतांशी टाळले. पण, ‘घरी बसलेला मुख्यमंत्री’ म्हणून सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर ‘मी घरात बसून राज्याचा राज्यशकट हाकतो’ म्हणून फुकाचा अभिमानही मिरवला. पण, मंत्रालय मुंबईत असले तरी मुंबईबाहेरच मोठा महाराष्ट्र वसतो, याचे उद्धव ठाकरेंने सोयरसुतकं नाहीच. पण, हेच उद्धव ठाकरे आणि त्यांचा शिवसेना पक्ष मात्र वारंवार मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव असल्याचे सांगून भयंगड निर्माण करण्याचा अगदी नेटाने प्रयत्न करतो. परंतु, ठाकरे सरकारचा कारभार पाहता, मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्र तर उद्धव ठाकरेंच्या खिजगणतीतही नाही. त्यामुळे महाराष्ट्रापासून मुंबई सर्वांगीणदृष्ट्या तोडण्याचे उद्योग हे केंद्रातून नव्हे, तर खुद्द मुंबईत बसूनच जोमात सुरु असल्याचे दिसतात. कारण, उद्धव ठाकरेंना शेतकरी असो एसटी कर्मचारी अथवा परिचारिका, महाराष्ट्राच्या मातीशी काडीमात्र रस नसून, आपली सत्ता केवळ मुंबई महापालिकेत कशी अबाधित राहील, यासाठीच काय तो यांचा आटापिटा! आता मुख्यमंत्री म्हटलं की, राज्यभरातील विकासकामांचे उद्घाटन हे आलेच. पण, सरड्याची धाव कुंपणापर्यंत तशी उद्धव ठाकरेंची धाव ही केवळ मुंबईपर्यंत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील आणि उर्वरित महाराष्ट्रातील किती विकास प्रकल्पांच्या फिती कापल्या, याची आकडेवारी काढली, तर फरक, दुजाभाव समोर दिसेलच. म्हणूनच मुंबई आमची, ठाणे आमचे, बाकी महाराष्ट्र तुमचा असाच जणू अलिखित करार राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर ठाकरेंनी केलेला दिसतो. काँग्रेस तर ठाकरे आणि पवारांच्या दृष्टीने नुसती कुरकुरणारी खाटच. तेव्हा, मुंबईबाहेरच्या महाराष्ट्रातील समस्यांची दखल सोडा, त्या किमान त्यांच्या कानावर तरी पडतात का, असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.