नवी दिल्ली : “भारतीय समाजाने अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी ५०० वर्षे लढा दिला आणि आता ही संघर्षमय साधना त्याच्या सिद्धीकडे जाताना दिसत आहे. अयोध्येत उभारले जाणारे भव्य श्रीराम मंदिर भारताचे राष्ट्रमंदिर ठरेल,” असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी अयोध्येत केले. अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराची उभारणी अतिशय वेगाने सुरू आहे. मंदिराचा प्रमुख भाग असलेल्या गर्भगृहाच्या उभारणीस आता प्रारंभ झाला असून त्यासाठीचे भूमिपूजन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास, महासचिव चंपत राय, खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी, मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि संतसमुदायाची उपस्थिती होती. “अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिराची निर्मिती व्हावी, यासाठी भारतीय समाजासह संतसमुदाय ५०० वर्षांपासून संघर्षमय साधना करत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ साली श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करून या संघर्षमय साधनेस मूर्तरूप देण्यास प्रारंभ केला. त्यानंतर आता गर्भगृहाचे भूमिपूजन करून संघर्षमय साधना त्याच्या सिद्धीकडे जाताना दिसत आहे. देशातील प्रत्येक भारतीयासाठी याहून मोठा गौरवाचा क्षण असू शकत नाही. त्यामुळे अयोध्येमध्ये उभारले जाणारे भव्य श्रीराम मंदिर भारताचे राष्ट्रमंदिर ठरेल,” असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.
‘धर्मो रक्षति रक्षित:’ या भावनेने हिंदू समाजाने शेकडो वर्षे लढा दिल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “आक्रमकांनी भारताच्या आस्थांवर प्रहार केला. त्यांनी भारतीयांच्या आकांक्षांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ज्या आक्रमकांनी आपल्या नापाक इराद्यांनी भारताच्या आस्थेवर प्रहार केला, त्यांना भारतीय समाजाने चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय समाजाने ‘यतो धर्मस्ततो जय:’ ही उक्ती सार्थ ठरविली आहे. धर्म, सत्य आणि न्यायाच्या मार्गावर वाटचाल केल्यास विजयी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, ही प्रेरणा आजच्या पवित्र दिनी मिळाली आहे. भव्य मंदिराच्या उभारणीसाठी संतसमुदायाने आपले आयुष्य शेकडो वर्षे अर्पण केले. अशोक सिंघल यांच्यासारखे महापुरुष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विचार परिवाराच्या संघटनांनी जो त्याग केला, त्याची पूर्तता झाली आहे,” असे योगी आदित्यनाथ यांनी यावेळी नमूद केले.
असे असेल गर्भगृह
भगवान रामलला ज्या गर्भगृहात विराजमान होणार आहेत, ते ४०३ चौरस फुटांचे असेल. रामललाच्या गर्भगृहाचा आकार २० बाय २० फूट ठेवण्यात आला आहे. राम मंदिरासाठी उभारण्यात येणारा प्लॅटफॉर्म २१ फुटांचा आहे, ज्यामध्ये सुमारे १७ फूट प्लिथं सुमारे चार फूट पट्ट्यांसह सोडण्यात येणार आहे. त्यावर भव्य मंदिराचे बांधकाम सुरू आहे. आराखड्यानुसार मकराना येथील संगमरवरापासून प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. प्लॅटफॉर्मवर खांब आणि मधोमध भिंतीसाठी जागा सोडली जात आहे. हे खांब आणि भिंती बन्सीपहारपूर येथील १९९० साली कोरलेल्या दगडापासून बनवल्या जाणार आहेत. गर्भगृहासोबतच मंदिराच्या पहिल्या मजल्याचीही उभारणी सुरू केली जाणार आहे.