शकटासुर वध
ज्या खोलीत कृष्णाला पाळण्यात झोपविले होते, त्या खोलीत, शेतकरी आपल्या घराच्या ओट्यावर छकड्याचा मूळ साचा ठेवतात, तसे नंदाघरी आढ्यावर एक छकडा ठेवला होता. छकड्याला संस्कृत भाषेत ‘शकट’ म्हणतात. त्या शकटाला दोर बांधून कृष्णाचा पाळणा बांधला होता. आता कृष्ण बालकाला एकटाच पाहून कंसाचा दूत असलेल्या त्या शकटात एकदम जीव संचारला व त्याने पाळण्यात झोपलेल्या कृष्णाला आपल्या भाराखाली दाबण्याचा प्रयत्न केला. भगवान कृष्णाने शकटाचे विकट कारस्थान ओळखले व आपल्या लाथेने त्या शकटासुराला खाली पाडून त्याचा चक्काचूर केला. भोळ्याभाबड्या भक्तांना या कथेत खरोखरच एक शकटासुर नावाचा राक्षसत्या लाकडी शकटातून म्हणजे छकड्यातून उत्पन्न होऊन भगवान बालकृष्णाला मारण्याचा प्रयत्न करतो, असे मनोमन वाटते. आपण या शकटासुराचा अर्थ समजून योगमार्गात आणखी अग्रेसर होण्याकरिता काय करावे लागते, याचे रहस्य पाहू.
वैदिक वाड्.मयात संसाराला ‘शकट’ म्हणतात. मराठीतसुद्धा आपण संसाराला ‘गाडी’च म्हणतो. संसाराची ही गाडी म्हणजे शकट पार करायला इतकी कठीण असते की जवळजवळ सर्वच साधक असल्या संसार शकटाच्या ओझ्याखाली दबले जाऊन नाश पावतात. अनेक प्रकारची संकटे येत असतात. परंतु, ज्याला भगवान श्रीकृष्ण व्हायचे आहे, अशा श्रेष्ठ साधकाला आपल्याला नष्ट करणार्या अशा संसाररूपी शकटाला म्हणजे शकटासुराला लाथेने खाली दाबून त्याचा वध करून स्वतःला सुरक्षित ठेवावे लागते.
अर्जुनवृक्षाचे उन्मूलन
प्रथम कथा पाहू. कृष्ण आता चालण्याइतका मोठा झाला होता. पण, खेळण्याऐवजी कृष्ण फार खोड्या करीत असे. म्हणून घरच्या एका लोखंडी उखळीला यशोदेने कृष्णाला दोरीने बांधून यशोदा कामानिमित्त बाहेर गेली. घरी येऊन पाहते तो बाळकृष्ण घरी नाही. धावत अंगणात जाते तो पाहते की, कृष्णाने लोखंडाच्या उखळीसकट अंगणात जाऊन अंगणात अगदी जवळजवळ लागून वाढलेल्या दोन अर्जुन वृक्षांमधून जाता जाता स्वबलाने लीलया त्या अर्जुनवृक्षांनाच उन्मळून खाली पाडले. यशोदा हे पाहून थक्क झाली. मोठमोठ्या मल्लांना जे शक्य झाले नाही ते या चिमुरड्या बालकाने लीलया केले. हे अर्जुनवृक्ष म्हणे कुबेराचे पुत्र होते आणि ते शापाने अर्जुनवृक्ष बनले होते.
कथेतील साधनारहस्य पाहू. आपल्या शरीरात ईडा व पिंगला नामक दोन योगनाड्या असतात. ईडा-पिंगला नाड्यांवर नियंत्रण आणून सुषुम्ना नाडीत प्रवेश केल्याविना योगी उच्च धारणायुक्त बनू शकत नाही. हेच ते अर्जुनवृक्ष. आता ईडा-पिंगलांना व्यासांनी अर्जुनवृक्षांची उपमा देऊन त्यांना धनेश-कुबेराचे पुत्र का म्हटले आहे, यातील रहस्य पाहू. ईडा-पिंगला या शक्ती व प्रेरणा देणार्या योगनाड्या आहेत. प्रेरणा देणार्या अवस्थेला वेदात ‘अर्जुन’ म्हटले आहे. म्हणून त्या योगनाड्यांना व्यासांनी अर्जुनवृक्ष म्हटले आहे. आता ते वृक्ष ‘कुबेर पुत्र’ कसे? साधारण योग्याला केवळ सुरुवातीच्या काळात ईडा-पिंगला नाड्यांवर संयम ठेवता आल्यास आपण योगमार्गातील काय पण प्रचंड संपत्ती प्राप्त केली, असे गर्वाने वाटत असते. असल्या गर्वरूप कुबेरपुत्र संपत्तीचा साधकाने आपल्याच उखळीने नाश करायला हवा. उखळी का? तर उखळीत धान्याप्रमाणे गर्ववृत्तीचे कंदन करता येते. अशी ती बहारीची कथा आहे. सूर्य, चंद्रनाडी हा विषय शिवस्वरोदयशास्त्रात विस्तृतपणे आला आहे. विधायक संगीत व अचूक भविष्य सांगण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होतो. आता इथे एवढा उल्लेख पुरे. वेदांमध्ये प्रेरक शक्तीला ‘अर्जुन’ व ‘अर्जुनी’ अशा दोन्ही शब्दाने गौरविले आहे. भगवान श्रीकृष्ण सखा वीर अर्जुन हाच प्रेरक शक्तिस्रोत असून कृष्ण लीलेतील प्रेरक योगनाड्या मानलेले दोन अर्जुनवृक्ष हेच होत.
पुतना मावशी
आता आपणास स्पष्ट झाले आहे की, कंस नावाचा कोणी बाह्य राक्षस नसून आपल्यातीलच वाईटविरोधीवृत्तीच होत. असल्या वृत्ती आपल्याच असतात म्हणून कंसाला ‘कृष्णाचा मामा’ दाखविला आहे. याच कंसाने पुतनेला कृष्णवधाकरिता म्हणजे खर्या अर्थाने योग्याच्या समाधी अवस्थेचा भंग करण्याकरिता पाठविले. तीही कंसाप्रमाणे कृष्णाची मावशी बनून आली. चांगली धष्टपुष्ट आणि देखणी अशी ही पुतना मावशी होती. तिने आपल्या स्तनात म्हणे विष भरून आणले होते. ही साधी गोष्ट आहे की, शरीरातील कोणत्याही अवयवात विष भरले तर त्या व्यक्तीलाच विषबाधा झाल्याशिवाय राहणार नाही. विष भरून आलेली पुतना कृष्णाला आपले विष पाजण्याऐवजी रस्त्यातच मरून पडली असती. पुतनेने दूध पाजण्यासाठी कृष्णाला जवळ घेतले. थोड्याच वेळात भगवान गोपाळ कृष्णाने तिच्या स्तनांतील विष व सर्व रक्त पिऊन तिचे प्राणकर्षण केले. पुतना मरून पडली.
येथे पूत याचा स्पष्ट अर्थ पवित्र झालेले, शुद्ध झालेला असा आहे. ‘पूत’ शब्दापासून ‘पुतना’ हा स्त्रीलिंगी शब्द आला आहे. पुतना म्हणजे विशिष्ट कर्म केले वा होऊ दिले म्हणजे आपण आता पवित्र झालो, अशी भावना ठेवणे होय. आपण अमुक प्रकारचे जीवन जगतो आहोत की, जे कर्म आपल्याला पूर्ण पवित्र करीत आहे, असे मनाला पुष्ट करणारे विचार साधकाच्या मनात साधना मध्यंतर काळात असतात. साधनेत ज्या अनुभूती येतात त्याच सर्व असून आता आपल्याला इतिकर्तव्यता काही उरली नाही, आपण पवित्र झालो, असा अहंभाव चित्तात उत्पन्न होऊन, त्या अहंभावाचे पान करून स्वतःचे जीवन धन्य समजण्याकडे साधकाची प्रवृत्ती होत असते. ज्या साधकाला समाधी अवस्था प्राप्त करायची आहे, त्याने या अवस्थेच्याही पलीकडे गेले पाहिजे. आपल्याच वृत्ती मावशीचे हे स्तन विषमय असतात, हे श्रेष्ठ साधक ओळखत असतो आणि कृष्णाप्रमाणे वृत्ती मावशीचे विषमय दूधच नव्हे, तर तिचे पोषण करणारे रक्त व धारण करणारे प्राणसुद्धा कर्षण करून कृष्ण साधक पुतनारूप वृत्तीमावशीला मारतो आणि आपली साधना पूर्ववत चालू ठेवतो. पुतनावधाचा असा दिव्य अर्थ आहे.
- योगीराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)