नवी दिल्ली : बाबा योगेंद्रनाथ यांनी ‘संस्कार भारती’च्या माध्यमातून कलाक्षेत्रात ‘सत्य, शिव आणि सुंदरतेची’ पुनर्स्थापना करण्याचे व्रत घेतले होते. त्यांच्या अवघ्या आयुष्याचे वर्णन करावयाचे झाल्यास ते ‘नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, जिणे अवघे गंगौघाचे पाणी’ अशा शब्दात करावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी शनिवारी केले. ‘संस्कार भारती’चे संस्थापक बाबा योगेंद्रनाथ यांच्या श्रद्धांजली सभेमध्ये रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
“बाबा योगेंद्रनाथ यांच्या निधनाने कलाजगताची मोठी हानी झाली आहे. प्रचारक कसा असावा याचे ते उत्तम उदाहरण होते. नव्याने प्रचारक आयुष्यास प्रारंभ करणार्यांना ते मार्गदर्शन करित असत. त्यांनी आपल्या प्रचारक जीवनामध्ये कोणत्याही कामाची लाज बाळगली नाही. त्यांचे जीवन अतिशय विनम्र, पारदर्शक आणि स्नेहपूर्ण होते. यश-अपयश, दुःख यांचा परिणाम त्यांनी आपल्या कामावर कधीही होऊ दिला नाही. त्यामुळे वयाची शंभरी पूर्ण करतीलच, अशी अपेक्षा होती. आज ते आपल्यात नाहीत. मात्र, त्यांचे कार्य पुढे नेऊन त्यांना अमर ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांच्याविषयी, त्यांचे कष्ट, त्यांचे काम आदी एकत्र करून त्याविषयी लिहिण्याची गरज आहे. छोटाही गुण दिसल्यास त्या व्यक्तीकडून काम करून घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. ते सुयोजक गुणग्राहक होते, सर्व प्रकारच्या लोकांना सोबत घेऊन चालत असत, असे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.
त्यांच्या कार्यक्षम राहण्याने संघटनेस सदैव लाभ होत होता, असे सरसंघचालकांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, त्यांना जीवनाचा मोह नव्हता, मात्र कार्य पूर्ण करण्यासाठी जिवंत राहण्याची त्यांना नक्कीच इच्छा असेल. त्यामुळे ते आता नक्कीच सूक्ष्मदेहाद्वारे संस्कार भारतीचे कार्य साध्य होणे बघतील, यात कोणतीही शंका नाही. मात्र, त्यासाठी तो वारसा घेण्यास आपण सक्षम आहोत का, हा खरा प्रश्न आहे. भारतीय कलेमध्ये पुन्हा एकदा ‘सत्यम, शिवम, सुंदरम’ची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी संस्कार भारतीची स्थापना केली होती. तेच कार्य कृतीद्वारे पूर्णत्वास नेणे ही खरी श्रद्धांजली ठरेल, असेही सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी यावेळी नमूद केले.