मुंबई(प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील दंडोबा डोंगर भागातील एका रिकाम्या विहिरीतून एका जंगली मांजराची सुटका करण्यात आली आहे. शनिवारी दि. १८ रोजी पहाटे वनविभागाने या मांजरीची सुटका केली. पहाटेच्या वेळी ट्रेकिंगसाठी गेलेल्या काही मुलांना ही मांजर आढळून आली होती. त्यांनी लगेच वन विभागाला कळवले.
शनिवारी दि. १८ रोजी पहाटे ट्रेकिंगला गेलेल्या मुलांना विहिरीत कोल्ह्यासारखा दिसणारा प्राणी अडकल्याचे आढळून आले. विहिरीत एक प्राणी अडकल्याची माहिती मिळताच, वन विभागाने त्वरित कारवाईला सुरुवात केली. घटनास्थळी पोचून विहिरीची तपासणी केली. सकाळ नुकतीच उजाडत असल्याने विहिरीत नक्की कोणता प्राणी पडलाय याची खात्री होत नव्हती. मात्र सूर्य उजाडल्यानंतर ही एक जंगली मांजर असल्याचे लक्षात आले.
या विहिरीची खोली सुमारे ५० मीटर होती. आणि विहीर सिमेंटनी बांधली असल्या कारणाने या मांजरीला बाहेर येणे शक्य होत नव्हते. या मांजरीला वाचवण्यासाठी वन विभागाच्या रेस्क्यू टीमला बोलवण्यात आले. सुरुवातीला, जाळी विहिरीत सोडून त्या मांजरीला वर आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. यानंतर वनरक्षक सागर थोरात यांनी विहिरीत उतरून या मांजरीची सुटका करण्याचे ठरवले. सागर थोरात यांच्या कमरेला दोरी बांधून त्यांनी पाणी नसलेल्या या ५० फुट खोल विहिरीत उतरून या जाल्गली मांजरीची सुटका केली. विहिरीतून वर काढल्यानंतर या मांजरीची पशुवैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर या जंगली मांजरीला नजीकच्या जंगलात सोडण्यात आले.
ही कारवाई सांगलीचे वन परिक्षेत्र अधिकारी युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सांगलीचे सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित सजने, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, वनरक्षक सागर थोरात महिला वन रक्षक पुजा राजमाने आणि प्रवीण जगताप या वेळी उपस्थित होते. त्याच बरोबर वन विभागाचे मजूर भोला पाटील ,बाबू खामकर,दिलीप जाधव ,गोपीनाथ पाटील, मधुकर, विक्रम यांनी या मांजरीला विहिरीतून बाहेर काढले. अशा घटना ताबडतोब वन विभागाच्या निदर्शनास आणून द्याव्यात आणि वन्यप्राण्यांचे जीव वाचवण्यात वन विभागाचे सहकार्य करावे. असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी युवराज पाटील यांनी केले.