पुणे : पुणे शहरातील महापालिका बस सेवेच्या वाहक आणि चालकांनी भर रात्री १२ वाजत चिमुकले बाळ घेऊन गाडीत एकटी असलेल्या महिलेचे रक्षण करण्याची भूमिका अदा केली आणि मनसे चे वसंत मोरे यांनी त्या महिलेस सुखरूप घरी पोहचविण्याचे कार्य केल्याने या सर्वांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हा प्रसंग असा की, मंगळवारी रात्री साधारणतः रात्री १० वाजताच्या दरम्यान सासवड येथून कात्रज कडे जाणाऱ्या सिटी बस मध्ये एकमेव महिला प्रवासी होती.ही गाडी पावणे बाराला कात्रज येथे आली.तिच्या कडेवर चिमुकले बाळ होते. काही सामान होते, तिचे नातेवाईक घ्यायला येणार असे ती सांगत होती मात्र १५-२०मिनिटे उलटली तरी कोणी तिला घ्यायला येईना...त्यामुळे या गाडीचे वाहक आणि चालकांनी गाडीत दिवे सुरू ठेऊन तिला बसविले.
एकटी महिला आणि बाकी पुरुष अशी त्या रात्रीची स्थिती होती.महिलेच्या नातेवाईकांशी पिएमपीचे चालक अरुण दसवडकर आणि वाहक नागनाथ ननवरे यांनी मोबाईल वरून सतत तिच्या नातेवाईकांशी तिला घेऊन जाण्यासाठी या म्हणून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू ठेवले मात्र मोबाईल लागत नव्हता.
याच वेळी नेमके तेथून माजी नगरसेवक वसंत मोरे जात होते त्यांनी सर्व परिस्थिती समजून घेतल्यावर स्वतःच्या गाडीतून महिलेस घरी नेऊन सोडले. या चालक वाहकानी सावध राहून त्या महिलेचे रक्षण केले ही बाब वसंत मोरे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट वर अधोरेखित केली. मात्र नातेवाईकांनी लक्ष दिले पाहिजे असे नमूद केले.या दोघा पिएमपी वाहक चालकांचे सोशल मीडियातून कौतुक होत आहे.