मोकळ्या मैदानात पार्किंग आणि कचर्‍याचे साम्राज्य; मुलांना खेळायला जागाच नाही!

मुंबई महापालिका प्रशासनाचा कानाडोळा

    16-Jun-2022
Total Views | 45

charkop
 
 
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिकेकडून खेळाची मैदाने बांधण्यात आली होती. मात्र, आता त्याचा वापर गाड्या पार्किंगसाठी तसेच कचरा टाकण्यासाठी होत असून याकडे मुंबई महापालिका दुर्लक्ष करत असल्याची तक्रार कांदिवलीतील चारकोप येथील स्थानिकांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना केली. कांदिवली येथील चारकोपमधील प्रभाग क्र. १८ मधील सेक्टर ३ येथील मैदानाचा वापर हा आता पार्किंगसाठी व कचरा टाकण्यासाठी होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. गेली दहा ते १२ वर्षांपासून आम्ही येथे राहत आहोत. सुरुवातीला आमची मुले या मैदानात खेळायची. सोयीनुसार लोकांनी मैदानाच्या भिंती तोडत वाहने उभी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता मुलांना खेळायला जागा राहिलेली नाही.
 
 
 
लोक कचरादेखील येथेच आणून टाकतात. वारंवार तक्रार करूनही पालिका कर्मचारी पाहणी करण्याची तसदीही घेत नाहीत, असे स्थानिकांनी स्पष्ट केले. जवळपास १५ वर्षे उलटूनही पालिकेने मैदानामधील कचरा साफ केला नसून पालिका, स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी मुले या मैदानामध्ये खेळायची, पण आता कोणीच इथे फिरकत नाही. त्यामुळे हा कचरा पूर्णपणे दाबला गेला आहे. घाणीमुळे प्रचंड दुर्गंधी येते. त्यामुळे येथे आरोग्याच्या तक्रारी वारंवार उद्भवतात, आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, असेही स्थानिकांनी सांगितले. एवढेच नाही, तर मृत नातेवाईकांच्या खाटाही इथे आणून टाकल्या असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.
 
 
 
भाजपकडून पार्किंग समस्येबाबत प्रस्ताव
 
मुळातच चारकोपमध्ये जेव्हा ‘म्हाडा’कडून बांधकाम करण्यात आले, त्यावेळी ‘म्हाडा’ने गाड्या पार्किंगसाठी कोणतीच सोय केलेली नाही. त्यामुळे ज्या नागरिकांकडे गाड्या आहेत, ते जागेअभावी असे मैदानात पार्किंग करतात. या मैदानाला लागूनच एक मार्केट प्लॉट आहे. त्याठिकाणी इमारत बांधून व्यापार्‍यांसाठी व पार्किंगसाठी सोय करावी, असा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाच्यावतीनेआम्ही दिलेला आहे. जेणेकरून, रस्त्यावर व मैदानात जे पार्किंग करण्यात येत आहे ते बंद होईल व मुलांना खेळण्यासाठी मैदान मोकळे होईल.
- शरद साटम, उत्तर मुंबई जिल्हामंत्री, भाजप
 
 
 
स्थानिकच पुन्हा कचरा टाकतात
 
तो प्लॉट ‘म्हाडा’च्या अंतर्गत येतो. तरीही मुंबई महापालिकेमार्फत आपण ते मैदान साफ करून घेतो. आता ते मैदान साफ झाल्यानंतर तेथे पुन्हा कचरा हा तेथील स्थानिकच टाकतात. तसेच, हे मैदान मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावे, म्हणून मी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. तसेच, मैदानाबाहेर गाड्यांची पार्किंग करा, म्हणून मी अनेकदा स्थानिकांना सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच माझ्या कार्यकर्त्यांनी ५० टक्के कचरा हा ‘जेसीबी’ आणून साफ केला होता. तसेच, ‘म्हाडा’चेही या प्लॉटकडे पूर्ण लक्ष आहे. अनधिकृत कुठलेही काम तेथे होत नाही. मी मागील अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्न करीत आहे.
- संध्या दोषी, माजी नगरसेविका, शिवसेना
 
 
 
- शेफाली ढवण
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121