मुंबई : “जोपर्यंत सर्वसामान्यांना न्याय देणार नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही,” असा खणखणीत इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला. ते जालन्यातील जलआक्रोश मोर्चात बोलत होते. जालन्यातील पाणी समस्येवर भाजपच्यावतीने बुधवार दि. १५ जून रोजी प्रचंड जनसमुदायासह ‘जलआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि महिला व सर्वसामान्य नागरिक या मोर्चात सहभागी झाले. सकाळी ११.३०च्या दरम्यान मामा चौकातून भाजपच्या ‘जलआक्रोश मोर्चा’ला सुरुवात झाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारचा समाचार घेत म्हणाले की, “जोपर्यंत तुम्ही सामान्य माणसाला न्याय देणार नाहीत, तोपर्यंत आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही. तुम्हाला कारभार चालवू देणार नाही आणि एक-एक दिवस तुमचा भारी करू,” असा इशारा फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला. पुढे ते म्हणाले की, “संभाजीनगरमध्ये आम्ही काढलेल्या मोर्च्यामुळे किमान सरकारला जाग आली, मुख्यमंत्र्यांना यावे लागले, घोषणा करावी लागली आणि काही काम सुरू झाले. तसेच इथेही करावे लागेल. सरकारला सामान्य माणसाच्या आक्रोशाची दखल घ्यावी लागेल, जे सरकार सामान्य माणसाच्या आक्रोशाची दखल घेत नाही ते सरकार जागेवर राहत नाही. आमच्या काळात १२९ कोटी रुपये जालन्याच्या पाण्यासाठी दिले होते. आता अडीच वर्षे झाली, त्या पैशांचे या सरकारने काय केले,” असा प्रश्न फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.
‘आक्रोश मतपेटीतूनही दिसू द्या’
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले की, “अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जालन्याच्या पाणी वितरण योजनेसाठी निधी मिळाला. मात्र, ठाकरे सरकारच्या काळात ही योजना तसूभरही पुढे सरकली नाही. आम्ही विरोधी पक्षात असलो, तरी नागरिकांच्या मागणीला आम्ही प्रतिसाद दिला. आता सरकारलाही इशारा देतो की, आमचे प्रश्न सोडवले पाहिजेत. लोकांमध्ये असंतोष आहे. २०१९ मध्ये अमित शाह यांनी सांगितले होते. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील. मात्र, निकाल लागल्यावर शिवसेना बदलली. आधीच्या सरकारने सुरु केलेल्या योजना यांनी बंद केल्या. आता प्रत्येक निवडणुकीत फटके मारल्याशिवाय गप्प बसायचे नाही. हा असंतोष मतपेटीतून व्यक्त करावा,” असे आवाहनही दानवेंनी नागरिकांना केले.