मान्सूनच्या प्रतीक्षेतील पाकिस्तानातील जलसंकट

    16-Jun-2022
Total Views | 58
 
 
 
 
 
pakistan water crisis
 
 
 
 
राजकीय उलथापालथीतून आता आर्थिक संकटाकडे वाटचाल करणार्‍या पाकिस्तानमध्ये जलसंकटाच्या समस्येनेही यंदा गंभीर रुप धारण केले आहे. परिणामी, आधीच दिवाळखोरीच्या मार्गावर असलेली अर्थव्यवस्था आता जलसंकटाच्या तीव्र झळा सोसत असून यातून सावरण्यासाठी पाकिस्तान सध्या तरी पूर्णपणे हतबलच आहे.
 
 
 
दक्षिण आशियामधील बहुतांशी देशांना अद्याप मान्सूनची प्रतीक्षा आहे आणि लवकरच भारताप्रमाणेच या देशांमध्येही मान्सून धारा बरसतील. परंतु, पाकिस्तानमध्ये ज्या आतुरतेने सध्या मान्सूनची प्रतीक्षा केली जात आहे, ती उल्लेखनीयच म्हणावी लागेल. पाकिस्तानमधील पाणीटंचाई ही एक मोठी समस्या असून, उन्हाळ्यात अनेक भागांमध्ये नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सध्या पाकिस्तानच्या चार प्रांतांत आणि राजधानी इस्लामाबादमध्येही जलसंकट प्रकर्षाने जाणवते आहे. पाकिस्तानच्या दक्षिणेकडील सिंध प्रांतात तर पाणीटंचाई ही एक भीषण समस्या आहे.
 
 
 
पण, सिंध, बलुचिस्तान आणि पाकिस्तानच्या सर्वात समृद्ध अशा पंजाब प्रांतातही यंदा ७५ टक्क्यांपर्यंत पाणीटंचाई असल्याचे वृत्त आहे. गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात, तेथील पंजाब सरकारने म्हटले आहे की, १ लाख, २७ हजार ८०० क्युसेक पाण्याची गरज असताना केवळ ५२ हजार, १०० क्युसेक पाणीपुरवठाच प्रांताला उपलब्ध होत आहे. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे एकीकडे तेथील जनजीवन विस्कळीत झाले असताना, दुसरीकडे पाकिस्तानमध्ये जलस्रोतांवरुन मात्र अंतर्गत संघर्षही उफाळून आला आहे. कारण, पाकिस्तानमधील सिंध आणि पंजाब प्रांतामध्ये देशाच्या जलसंपत्तीतील आपापल्या वाट्यावरुन आता गंभीर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
 
 
‘ग्लोबल फूड पॉलिसी रिपोर्ट २०२२’ने पाकिस्तानमधील पाणीटंचाईच्या समस्येमुळे उद्भवणार्‍या गंभीर परिणामांवर एका अहवालातून महत्त्वपूर्ण प्रकाश टाकला आहे. वॉशिंग्टनस्थित ‘इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट’ने प्रसिद्ध केलेल्या या अहवालात पुढील दशकात पाकिस्तानमध्ये उष्णतेच्या लाटा वेगाने वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच अहवालानुसार, जलद हवामान बदलांसह पाकिस्तानमधील पाणीटंचाई आणखीन तीव्र होण्याची भीतीही वर्तविण्यात आली आहे. या अहवालानुसार, पाकिस्तानमधील नद्यांच्या सिंधू समूहाचा एक महत्त्वाचा स्रोत असलेल्या हिमालयीन हिमनद्यांची पातळी सन २००० पासून संपूर्ण विसाव्या शतकापेक्षा अधिक खालावली आहे.\
 
 
 
जगातील पाच खोर्‍यांपैकी, जिथे पाण्याच्या कमतरतेमुळे ‘जीडीपी’चे सर्वाधिक नुकसान होण्याचा अंदाज आहे, अशा सिंधू, साबरमती आणि गंगा-ब्रह्मपुत्रा या नद्यांची खोरी दक्षिण आशियामध्येच आहेत. या अहवालात पाकिस्तानला असाही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे की, एकट्या सिंधू खोर्‍यात सन २१०० पर्यंत ‘जीडीपी’चे नुकसान हे तब्बल पाच हजार अब्ज डॉलरपेक्षा अधिक असू शकते. तसेच, या अहवालात हवामान बदलामुळे पाकिस्तान समोर उभे राहिलेल्या वर्तमान आणि दीर्घकालीन आव्हानांचाही उहापोह करण्यात आला आहे. जसे की, हिमनद्यांचे वितळणे, समुद्राची पातळी उंचावणे, भूजलाचा र्‍हास, हवामानातील तीव्र बदल आणि येत्या काही वर्षांत उद्भवू शकणार्‍या, नैसर्गिक धोक्यांची वारंवारता याविषयी तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. तसेच, गरिबीची उच्च पातळी, प्रशासकीय आव्हाने आणि मूलभूत सेवा आणि संसाधनांची कमतरता यांसारख्या समस्या जर कायम राहिल्या, तर त्याचे रुपांतर संभाव्य विनाशकारी परिणाम आणि कैकपटींनी हवामान बदल विषयक धोक्यांमध्येही होऊ शकते.
 
 
 
पाकिस्तान सरकार आणि विविध संस्थांनी केलेल्या अधिकृत संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, या देशातील जवळपास तीन चतुर्थांश लोकसंख्येला घरपोच पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावत आहे. परंतु, या समस्येची व्याप्ती एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. या देशातील उपलब्ध पिण्याच्या पाण्यापैकी ७० टक्के पाणी हे दूषित आणि पिण्यायोग्य नसल्याने आरोग्याच्या समस्यांनीही डोके वर काढले आहे, असे असताना इथे एक मुद्दाम लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, पाण्याचा वापर करण्याच्या बाबतीत जगात पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे.
 
 
 
‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’च्या एका सर्वेक्षणानुसार,पाकिस्तानची दरडोई वार्षिक पाण्याची उपलब्धता १,०१७ घनमीटर आहे - ती एक हजार घनमीटर पाण्याच्या तूट मर्यादेच्या अगदी जवळ आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, २००९ मध्ये ही उपलब्धता सुमारे १ हजार, ५०० घनमीटर होती. ‘पीसीआरडब्ल्यु’नुसार, पाकिस्तानने 1990 मध्ये ‘वॉटर स्ट्रेस लाईन’ला स्पर्श केला आणि २००५ मध्ये ‘वॉटर शॉर्टेज रेषा’ ओलांडली. ही परिस्थिती कायम राहिल्यास पाकिस्तानला तीव्र पाणीटंचाई किंवा दुष्काळसदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. पाकिस्तानात समस्या केवळ पिण्याच्या पाण्याची नाही, तर या देशातील सुमारे 90 टक्के कृषी उत्पादन हे सिंधू खोर्‍यातील सिंचनावर अवलंबून आहे आणि हेच सिंधू खोरे राष्ट्रीय अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे सिंधू नदी खोर्‍यात पाण्याची कमतरता म्हणजे पाकिस्तानमध्ये अन्नधान्याचीही कमतरता असा हा थेट संबंध.
 
 
 
इतकेच नव्हे, तर पाकिस्तानी नागरिकांची मांसाहाराची सवय हेदेखील तेथील जलसंकटामागचे एक प्रमुख कारण मानले जाते. मांस उत्पादन-विक्री हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख भाग आहे आणि पाकिस्तानच्या ‘जीडीपी’तही या क्षेत्राचा महत्त्वाचा हिस्सा आहे. परंतु, हे सर्व ज्ञात सत्य आहे की, प्रति किलो अन्नधान्य वापरल्या जाणार्‍या पाण्याच्या दहापट पाणी प्रति किलो मांस उत्पादनावर खर्च केले जाते, अशा परिस्थितीत मांस उत्पादन वाढल्याने पाकिस्तानमधील पाण्याच्या उपलब्धतेवर आणखी मर्यादा येतील. मात्र, हे गणित फक्त खाण्यापुरते मर्यादित नाही, तर येथे आधी म्हटल्याप्रमाणे पिण्याच्या पाण्याची अवस्था त्याहूनही बिकट आहे. पाकिस्तानची जलसाठवण क्षमता जास्तीत जास्त 30 दिवसांच्या पुरवठ्यापुरती मर्यादित आहे, जी अशा हवामानाची वैशिष्ट्ये असलेल्या देशासाठी शिफारस केलेल्या एक हजार दिवसांच्या साठवण क्षमतेपेक्षा कमी आहे.
 
 
 
पाकिस्तानमध्ये केवळ हवामान संकट हा एकमेव घटक नाही, ज्याने या समस्येला खतपाणी घातले आहे. या भीषण जलसंकटामागे लोकसंख्यावाढ आणि शहरीकरण हीदेखील प्रमुख कारणे आहेत. संशोधकांचा असा अंदाज आहे की, २०४० पर्यंत पाकिस्तान या प्रदेशातील सर्वाधिक पाणी वापरणारादेश बनण्याच्या मार्गावर आहे आणि काही विश्लेषकांच्या मते, पाकिस्तानला दहशतवादापेक्षाही मोठा धोका या जलसंकटाचा आहे. पाकिस्तानचे सुमारे ९२ टक्के क्षेत्र शुष्क किंवा अर्ध-शुष्क म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे आणि पाण्यासाठी पाकिस्तान सिंधू नदीच्या खोर्‍यावर आणि काही प्रमाणात पृष्ठभागावर आणि भूजलस्रोतांवर अवलंबून आहे. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून, पाकिस्तानची लोकसंख्या चौपटीने वाढली आणि लोकसंख्या अशीच वाढत राहिल्यास, २१०० पर्यंत या देशाची लोकसंख्या दहापट वाढलेली असेल. मग अशा स्थितीत पाकिस्तानच्या अस्तित्वाची खात्री कोण देऊ शकेल?
 
 
 
गेल्या महिन्यातील एका घटनेने पाकिस्तानमधील भयावह परिस्थिती जगासमोर आली. कराचीतील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित अशा ‘जिना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटर’मधील सर्व कामकाज संध्याकाळी पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानंतर थांबवावे लागले. पाकिस्तानच्या इंग्रजी वृत्तपत्र ‘द न्यूज इंटरनॅशनल’ने दिलेल्या वृत्तानुसार, तेथील डझनभर शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आणि सोमवारी तिथे मोठ्या संख्येने रुग्णांचे ‘डायलिसिस’देखील होऊ करू शकले नाही. या सर्व परिस्थितीवरुन पाकिस्तानचे जलसंकट हे किती गहिरे झाले आहे, याची कल्पना यावी. मान्सूनच्या आगमनाने पाकिस्तानला काहीसा तत्काळ दिलासा मिळू शकतो. पण, येत्या काळात जिथे हे संकट अधिकच गंभीर होणार आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान या समस्येला कसे सामोरे जाईल, हाच तेथील सरकारसमोरचा यक्षप्रश्न आहे.
 
 
 
 
 
लेखक: एस.वर्मा

(अनुवाद : विजय कुलकर्णी)
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..