कल्याण-डोंबिवलीतील कचर्‍याची समस्या तत्काळ सोडवा; अन्यथा तीव्र जन आंदोलन

माजी आमदार नरेंद्र पवार यांचा इशारा

    16-Jun-2022
Total Views |

NP
 
 
 
 
 
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून ‘माझी वसुंधरा अभियाना’अंतर्गत पुरस्कार मिळवल्याचा बडेजाव केला जात आहे. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कल्याण-डोंबिवली शहरातील कचर्‍याचे ढीग पाहता महानगरपालिका प्रशासन खरोखर शहरातील स्वच्छतेसाठी काम करीत आहे का, असा प्रश्न उपस्थित करत, पुढील दहा दिवसांत कचर्‍याची समस्या न सोडविल्यास भारतीय जनता पार्टीच्यावतीने मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे कल्याण पश्चिमचे माजी आमदार व भाजप भटके विमुक्त आघाडीचे संयोजक नरेंद्र पवार यांनी महागनरपालिका आयुक्तांना पत्र लिहून दिला आहे.
 
 
 
कल्याण-डोंबिवली शहर व विशेषतः कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कचर्‍याची समस्या अत्यंत भयावह होत चालली आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जात नाही, बहुतांश भागात घंटागाडी जात नाही, प्रत्येक विभागात दिवसभर कचरा पडून असतो, एका दिवसात एक वेळ तरी रस्ते स्वच्छ करणे अपेक्षित असताना त्यावरदेखील काम होत नाही. या संदर्भात स्थानिक मनपा प्रशासनाला वारंवार संपर्क करून, तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे कचर्‍याची समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी पवार यांनी केली आहे.
 
 
 
...तर भाजप कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक रस्त्यावर उतरतील’
 
यंदाच्या पहिल्याच पावसात कडोंमपाच्या नालेसफाईची ‘पोलखोल’ झाली. कल्याण टॉकीज रस्त्यावर पूरस्थिती निर्माण होऊन रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याची वेळ आली. कचर्‍यावर तत्काळ उपाययोजना करण्यात आली नाही, तर नाले तुंबून रस्त्यांवर व अनेक भागात नागरिकांच्या घरातसुद्धा पाणी जाणार आहे. ही अत्यंत गंभीर समस्या असून, कचर्‍यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे. कचरा उचलण्याच्या नावाखाली नागरिकांकडून अधिकचे पैसे घेणार्‍या महापालिका प्रशासनाने शहरातील कचरा समस्या गांभीर्याने घेऊन सोडवली नाही, तर भाजप कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही नरेंद्र पवार यांनी यावेळी दिला आहे.