मुंबई(प्रतिनिधी): दीड महिन्यांपूर्वी शिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकलेल्या नर बिबट्याचा वन विभागाने विरारहून बचाव केला होता. या अपघातामुळे बिबट्याला आपला पाय गमवावा लागला होता. परंतु, आता हा बिबट्या ठणठणीत झाला असून सक्षमपणे आपल्या तीन पायांवर चालू लागला आहे.
या बाबत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव-पश्चिम डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी ट्विट करत माहिती दिली. या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटी विरार मधून एका बिबट्याचा बचाव करण्यात आला होता. शिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यामध्ये या बिबट्याचा पाय अडकला होता. यानंतर पुढील उपचारांकरिता त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले.
शिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात पाय अडकल्याने बिबट्याचा पुढच्या डाव्या पायाच्या पंज्याला गंभीर इजा झाली होती. परिणामी पशुवैद्यकाने त्याचा पुढचा पूर्ण डावा पाय कापावा लागला. या शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून पशुवैद्यक या बिबट्यावर बारकाईने लक्ष ठेवून होते. आता या बिबट्याची परिस्थिती सुधारली असून तो पुन्हा चालू लागला आहे.
डुकराच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेच्या सापळ्यात हा बिबट्या अडकल्याची शक्यता वनधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. सापळ्यातून सुटका करुन घेण्यासाठी त्याने प्रयत्न केले. मात्र, तार त्याच्या पायाला अडकून राहिली आणि त्यामुळे त्याच्या पायाला गंभीर जखम झाली. त्यानंतर पायाला संसर्ग होऊन पूर्ण पाय निकामी झाला होता. परिणामी पूर्ण डावा पाय कापावा लागला होता.