मुंबई(प्रतिनिधी): गेल्या दहा वर्षात रेल्वे गाड्यांच्या धडकेमुळे जवळपास 186 हत्तींचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे.अशातच आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी नवीन उपाययोजनांचा शोध घेत आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये तुटपुंज्या उपाययोजना केल्या जात आहेत. अलीकडील काळात, महाराष्ट्रातही रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला होता.
प्राण्यांचे विशेषतः हत्तींचे रेल्वे अपघात रोखण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (डब्लूआयआय), आणि पर्यावरण मंत्रालयाने रेल्वेच्या अधिकार्यांशी या बाबत चर्चा केली आहे. प्राण्यांचे भ्रमण मार्ग ओळखून भौगोलिकदृष्ट्या विश्लेषण होणे गरजेचे आहे. तसेच व्यवहार्यपणे अंमलात येऊ शकणाऱ्या उपाययोजना प्रस्तावित करणे गरजेचे आहे.पुढील महिन्यात एक मसुदा दस्तऐवज तयार होणे अपेक्षित आहे. हत्तींची सर्वाधिक संख्या सलेल्या राज्यातच हे अपघात होतात असे नाही. आसाम, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये सर्वाधिक बळी गेले आहेत.
डोंगराळ भागातले उतार हा हत्तींच्या भ्रमणासाठी एक अवघड प्रदेश आहे. उतार भागातले रेलेवे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना हत्ती बराच वेळ रुळाजवळ रेंगाळत असतात. यामुळे धडकेचा धोका अधिक वाढतो.
"हत्तींना उतार उतरण्यास जास्त वेळ लागतो. आणि अशा ठिकाणी ट्रॅक असताना त्यांचा अपघात होण्याची शक्यता असते,” असे डब्लूआयआयचे शास्त्रज्ञ बिलाल हबीब यांनी स्पष्ट केले. पूर्वीच्या प्रस्तावित उपाययोजनांचा खर्च लक्षात घेता, अंडरपास तयार करणे शक्य झाले नाही. तसेच सध्याच्या लाईन्सजवळ हत्तींसाठी समर्पित पास तयार करणे सुद्धा शक्य नव्हते.
संसदेत या घटनांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, सरकारने चालू उपाययोजनांचा पाढा वाचला. निवडक ठिकाणी कुंपण घालणे, सूचित केलेल्या हत्ती कॉरिडॉरबद्दल लोकोमोटिव्ह पायलटना संकेत फलकांद्वारे चेतावणी देणे, ट्रेनमधील कर्मचारी आणि स्टेशन मास्टरांना संवेदनशील करणे, यासारख्या उपाययोजना केल्या असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर नियमितपणे रेल्वेच्या जमिनीतील ट्रॅकच्या जवळपास असलेल्या झाडांची छाटणी कारणे, वन विभाग आणि रेल्वे विभागाने समन्वयाने काम करणे या बाबींचा देखील समावेश असल्याचे सांगण्यात आले.