ठाणे : पूर्व भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्याप उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यात चक्क ‘सायबर’ हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ’जगभरातील मुस्लिमांची माफी मागा, प्रेषितांचा अपमान केल्यास शांत बसणार नाही,’ असा धमकीवजा संदेश प्रसारित करत हॅकरने ठाणे पोलिसांचे संकेतस्थळच हॅक केले. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आला.
या घटनेनंतर संपूर्ण पोलीस दलासह गृहविभाग खडबडून जागा झाला आहे. ‘वन हॅट सायबर टीम- इंडोनेशिया डिसेफर,’ असा संदेश पाठवून हॅकरने पोलिसांनाच आव्हान दिल्याने ‘सायबर’ पोलिसांनी याची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. पूर्व भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर देशविदेशात मुस्लीम समाजाकडून केंद्र सरकारविरोधात टिकेची झोड उठवून मोर्चे काढले जात आहेत. काही मुस्लीम राष्ट्रांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे. देशात शर्मा यांना अटक करण्याची मागणी जोर धरत असतानाच मंगळवारी ठाणे पोलिसांचे संकेतस्थळ हॅक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. ‘सायबर’ पोलिसांकडून मंगळवारी सकाळी संकेतस्थळ सुरू केले असता हा प्रकार समोर आला.
‘सायबर’ हल्ला करणार्यांचा शोध सुरू
हॅकरने एक संदेश पाठविला असून त्यात ‘जगभरातील मुस्लिमांची माफी मागा, प्रेषितांचा अपमान केल्यास आम्ही शांत बसणार नाही,’ असे म्हटले आहे. तसेच, ‘वन हॅट सायबर टीम- इंडोनेशियन डिफेसर’ असेही संदेशात म्हटले आहे. त्यामुळे इंडोनेशियातून हे संकेतस्थळ हॅक झाले का, असा प्रश्न उपस्थित होतोय. या घटनेनंतर पोलिसांनी पथके तयार करून ‘सायबर’ हल्ला करणार्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.