ठाणे : मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मिडीयावर पोस्ट करणाऱ्या दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. साद अश्पाक अन्सारी रा. कैसरबाग, भिवंडी या युवकाला भिवंडी पोलिसांनी तर मुकेश बाबुराम चव्हाण (२२) रा.भंडारी कंपाऊंड, नारपोली याला नारपोली पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकारानंतर संपूर्ण भिवंडीत तणाव पसरला असुन संतप्त जमाव अन्सारी याच्या घरात घुसला.तसेच, माफी मागावयास लावत अर्वाच्च शिवीगाळ करून त्याला मारहाण केली.
मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपच्या प्रवक्ता नूपुर शर्माविरोधात देश- विदेशात पडसाद उमटत असल्याने भाजपने त्यांना पक्षातुन निलंबित केले आहे. दुसरीकडे नुपुर शर्मा यांच्याविरोधात मुंबई, ठाणे व भिवंडीमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, भिवंडीतील एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या व्यक्तीने बांधकाम व्यावसायिकाला आपल्या व्हॉटसअॅपवर आलेला संदेश दाखवला. हा संदेश साद अन्सारी नामक युवकाने त्याच्या इन्स्टाग्राम ग्रुपवर नूपुर शर्माच्या विधानाला समर्थन देणारी एक पोस्ट प्रसारित केल्याबाबतचा होता. या प्रकारानंतर संपूर्ण भिवंडीत खळबळ उडाली.
या घटनेनंतर जमाव त्याच्या घराबाहेर जमला.जमावाने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्याला माफी मागावयास लावत मारहाण केल्याने तणाव पसरला होता. त्यानंतर, साद अन्सारी याच्या विरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.अधिक तपास उपनिरिक्षक शंकर शिंदे करीत आहेत.तर,दुसऱ्या घटनेत मुकेश चव्हाण नामक तरुणानेही फेसबुकवर नुपुर शर्मा यांच्या फोटोखाली तिला पाठींबा दर्शवुन समर्थनार्थ पोस्ट लिहिली.याबाबत नारपोलीतील मोबाईल शॉप चालकाने दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी नारपोली पोलिसांनी चव्हाण याला अटक केली.अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक मदन बल्लाळ करीत आहेत.
दरम्यान,नुपूर शर्मा यांना भिवंडी पोलीसांनी धाडलेल्या समन्स नुसार आज पोलीस ठाण्यात हजर राहणे आवश्यक होते. मात्र नुपूर शर्मा यांनी चार आठवड्यांची मुदत मागितल्याने त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर विचार सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी सांगितले.
साद अन्सारी व चव्हाण यांचा गुन्हा काय ?
भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या सउद पटेल याने काही मेसेज व स्क्रीनशॉट मालकाला पाठवले. ज्यामध्ये साद अशफाक अन्सारी याने त्याचे इंस्टाग्राम या सोशल साईडच्या डज नॉट मॅटर या आयडीवरून नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेले भाष्य जसेच्या तसे टाकून त्याचे समर्थन करीत “ जो धर्म जगात दहशतवाद पसरवितो त्यास सोडून द्या. अशा आशयाचा संदेश इंग्रजीत टाकला. यामुळे अन्सारी याने मुस्लिम धर्मियांच्या विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवून आणि मुस्लिम धर्मियांच्या जनमानसात एकोपा टिकण्यास बाधक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी अन्सारीला अटक केली.तर, मुकेश चव्हाण या तरुणाने नुपूर शर्मा यांच्या फोटोखाली " I Support Nupur Sharma " तलवार बंदूकसे खेला हूं। मुझे डर नहीं चौंकी थाने का, छाती ठोक ठोक के कहता हूं, मैं छोरा हिंन्दू घराने का | RADHEY RADHEY 'असे स्टेटस ठेवले. यावरून त्यालाही अटक करण्यात आली आहे.