मुंबई(प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील धामापूर पेठवाडीतील एका ग्रामस्थाच्या विहीरी मध्ये कोल्हा पडलेला आढळून आला. याबाबत वन विभागाला कळवण्यात आले. कुडाळ वन परिक्षेतत्राचे रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या रेस्क्यू पथकाने सुमारे २० फूट खोल विहिरीतून या सोनेरी कोल्ह्यास सुखरूप बाहेर काढले.
या विहिरीला कठडा नव्हता. हा सोनेरी कोल्हा भक्ष्याच्या मागे धावत असताना अंदाज चुकल्यामुळे कोल्हा विहिरीत पडला असावा असे वनविभागाकडून सांगण्यात आले. या विहिरीत एका किनारी बीळ होते. आणि पाण्याची पातळी सुमारे ४-५ फूट होती. यामुळे या कोल्ह्याला बाहेर काढण्यास अडचणी येत होत्या. कोल्हा या बिळापाशी जात होता. अखेर हा कोल्हा वन विभागाच्या पिंजऱ्यात शिरला. आणि पिंजरा विहिरीतून काढण्यात आला. आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे वेळीच वन विभागाला पाचारण करण्यात आले. आणि वन विभागाने या कोल्ह्याची वेळीच सुटका केली. या कोल्ह्याची पशु वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर या कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
हे बचाव कार्य उपवनसंरक्षक दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे , वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट, वनरक्षक धामापूर शरद कांबळे, वाहनचालक राहुल मयेकर यांनी स्थानिक ग्रामस्थ सुशील घाडी, बाळकृष्ण घाडीगावकर, दिनेश काळसेकर, तेजस वालावलकर, चेतन काळसेकर यांच्या मदतीने यशस्वी केले.