मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस वाढली आहे. एक-एक मत महत्वाचं असताना सपा आणि एमआयएम यांची मत कोणाच्या पारड्यात जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. त्यानंतर आता एमआयएमने आपला पाठिंबा ठाकरे सरकारला दिला.
एकीकडे 'एमआयएम ही भाजपची बी टीम आहे असा उल्लेख मंत्री आदित्य ठाकरे वारंवार करत असतात मात्र एमआयएम कोणाची बी टीम आहे?, हे आता कळून चुकलं, अशी टीका मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महविकास आघाडीला पाठिंबा जाहीर करण्यापूर्वी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, अनिल परब, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत चर्चा केली.
त्यानंतर जलील यांनी त्यांचा पाठिंबा महाविकास आघाडीला दिलाय. याबाबत ट्विट करत जलील म्हणाले, भाजपला हरवावं या उद्देशाने आम्ही शिवसेनेचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीला मतदान करतो आहोत असं इम्तियाज जलील यांनी जाहीर केलं. त्यामुळे आता केवळ भाजपचा पराभव व्हावा यासाठी शिवसेना आपल्या मूळ हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली देत आहे.
संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण झाल्याची घोषणा करेल, याकडे शिवसैनिकांचं लक्ष होतं. मात्र, उद्धव ठाकरेंनी घोर निराशाच केली. संभाजीनगर नामकरण तर सोडाच मात्र औरंजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्या एमआयएम पक्षाचा पाठिंबा राज्यसभेत घेण्यासाठी त्यांच्याशी सल्लामसलत करण्यात व्यस्त होती.
मतांची जुळवाजुळव करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांची ही भूमिका आता कट्टर शिवसैनिकांना मान्य आहेत का? एमआयएमने राज्यसभेत शिवसेनेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिल्यानं आता औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर होणार का? हे शिवसैनिकांनी समजून घ्यावं आणि एमआयएम हा पक्ष भाजपची 'बी' टीम आहे, हे म्हणणाऱ्या युवासेनेच्या मंत्री आदित्य ठाकरे यांनाही ही एक चपराकच म्हणावी लागेल.
राज्यसभेत मिळालेल्या या पाठिंब्यामुळे शिवसेनेचा उमेदवार निवडून येईलही मात्र भाजपने महविकास आघडी आणि प्रामुख्याने शिवसेनेला एक एक मतासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्षांकडे झगडावे लागत आहे. दुसरीकडे पहिले तर हीच शिवसेना युतीच्या काळात सन्मानाने सत्ता गाजवत होती मात्र उद्धव ठाकरेंनी आमची २५ वर्षे सोडली असे म्हणत आपल्या हिंदुत्ववादी आणि सर्वात जुन्या मित्राला कपटी असे संबोधले.
मात्र आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने जी खेळी केली त्यावरून खरा शत्रू कोण हे उद्धव ठाकरेंना कळून चुकले असेल, शरद पवारांचे राज्यसभेच्या निवडणूक सुरु असतानाच मुंबईबाहेर जाणे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपल्या कोट्यात बदल करणे हे सगळं महाविकास आघडीतील धुसपूस उघड होण्यात पुरेसा आहे. काँग्रेसने मात्र सेफ गेम करत आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित केला आणि राष्ट्रवादीही त्याच तयारीत आहे. शिवसेनेचा दुसरा संजय मात्र या लढाईत पिछाडीवर असल्याचे दिसते. "चार वर्षे निवडणूक लढविली मात्र पहिल्यांदाच मत मागण्याची वेळ आली. हा अनुवभव रोमांचकारी होता असं संजय राऊत म्हणाले. ही वेळ शिवसेनेवर का आली याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे.