मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात 'लेदरबॅक' या जगातील सर्वात मोठ्या सागरी कासवाचा वावर आढळून आला आहे. सिंधुदुर्गातील तेरेखोल नदीत मच्छीमाराच्या जाळ्यात हे कासव अडकले होते. मच्छीमाराने या कासवाची जाळ्यातून सुटका करुन पुन्हा त्याला समुद्रात सोडले. यामुळे राज्याच्या सागरी परिक्षेत्रात या कासवाची तिसऱ्यांदा छायाचित्रीत नोंद झाली आहे.
राज्याच्या सागरी परिसंस्थेमध्ये प्रामुख्याने चार समुद्री कासवे आढळतात. यामध्ये 'आॅलिव्ह रिडले', 'ग्रीन सी', 'हाॅक्सबिल' आणि 'लाॅगरहेड' या कासवांचा समावेश होतो. यामधील 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या दरवर्षी मोठ्या संख्येने कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये 'लेदरबॅक' प्रजातीच्या कासवाचे दर्शनही राज्याच्या समुद्रामध्ये घडले आहे. भारतात केवळ अंदमान-निकोबार बेटावर 'लेदरबॅक' प्रजातीची कासवे विणीसाठी येतात. महाराष्ट्रात १९८५ साली मालवणमधील देवबागच्या किनाऱ्यावर साडेचार फूटाचे 'लेदरबॅक' कासव आढळले होते. तशी नोंद 'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे'कडे (सीएमएफआरआय) आहे. परंतु, त्याचे कोणत्याही प्रकारचे छायाचित्र उपलब्ध नाही. दरम्यानच्या काळात जून, २०१९ मध्ये रायगडमधील भरडखोल येथे मच्छीमाराच्या जाळ्यात हे कासव अडकले होते. त्यानंतर मार्च, २०२१ मध्ये डहाणू समुद्रकिनाऱ्यानजीकही 'लेदरबॅक' कासवाचे छायाचित्रण मिळाले होते. त्यानंतर आता तेरेखोलनजीक समुद्रामध्ये या कासवाचा वावर आढळून आला आहे.
तेरेखोल नदीच्या मुखाजवळ दि.२८ मे रोजी रूपेश महाकाळे हे मासेमारी करत होते. यावेळी त्यांना काळ्या रंगाचे कासव जाळ्यात अडकल्याचे दिसले. त्यांनी लागलीच प्रसंगावधान राखून जाळे कापून या कासवाची सुटका केली. त्याला पुन्हा समुद्रात सोडले. या घटनेचे आपल्या मोबाईलमध्ये छायाचित्रण केले. हे छायाचित्रण 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'ला पाठवण्यात आले. मत्स्यव्यवसाय विभाग आणि मॅंग्रोव्ह फाऊंडेशनच्या माध्यमातून संरक्षित सागरी जीवांच्या संवर्धनासाठी नुकसान भरपाई योजना राबवण्यात येत आहे. यामध्ये जाळ्यात अडकलेल्या संरक्षित सागरी जीवांना मच्छीमारांनी जाळे कापून सोडल्यास त्याला नुकसान भरपाई देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून अनेक दुर्मीळ सागरी जीवांची माहिती मॅंग्रोव्ह फाऊंडेशनला मिळत आहे. या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आलेल्या प्रस्तावातून तेरखोलमध्ये आढळलेल्या लेदरबॅक कासवाची माहिती मिळाली आहे.
उन्हाळ्यात स्थलांतर ?
महाराष्ट्रात यापूर्वी लेदरबॅक कासवाच्या छायाचित्रीत नोंदी या उन्हाळी हंगामात झाल्या आहेत. म्हणजेच जून, २०१९ मध्ये भरडखोल आणि मार्च, २०२१ मधील पालघर जिल्ह्यातील नोंद उन्हाळी महिन्यातील आहे. त्यामुळे उन्हाळ्यात महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात ही कासवे स्थलांतर करत असावीत, अशी शक्यता आहे.