लखनऊ : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि संस्कार भारतीचे संस्थापक बाबा योगेंद्रजी यांचे शुक्रवार, दि. १० जून रोजी वयाच्या ९८व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ढासळल्याने लखनऊच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संस्कार भारती या कला क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेत राष्ट्रीय संगठन मंत्री म्हणूनही ते कार्यरत होते.
बाबा योगेंद्रजी यांच्याविषयी...
ज्येष्ठ प्रचारक बाबा योगेंद्रजी यांचा जन्म ०७ जानेवारी १९२४ रोजी उत्तर प्रदेशच्या बस्ती या जिल्ह्यातल्या एका गावात झाला. लहान वयातच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊ लागले. त्यानंतर गोरखपूरला शिक्षण घेत असताना त्यांचा संपर्क संघाचे ज्येष्ठ प्रचारक नानाजी देशमुख यांच्याशी आला. संघ शिक्षा वर्ग पूर्ण केल्यानंतर ते प्रचारक म्हणून निघाले.
संस्कार भारतीची सुरुवात...
गोरखपुर, प्रयाग, बरेली, बदायूं आणि सीतापुर या पाच ठिकाणी ते प्रचारक म्हणून होते. १९८१ रोजी संस्कार भारती या संस्थेची स्थापना केल्यावर त्यांनी या संस्थेचे कार्य पाहिले. यामार्फत कलासाधकांच्या मनात त्यांनी राष्ट्रभावना जागृत केली. संस्कार भारती ही आज कलेच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असून याचे संपूर्ण श्रेय बाबा योगेंद्रजींनाच जाते.