'प्रथमा'चे लोकेशन सिग्नल थांबले

सॅटलाईट ट्रान्समीटरमध्ये बिघाड झाल्याचा संशय

    10-Jun-2022
Total Views | 105
 prathama1
 
 
 
 
मुंबई (प्रतिनिधी): वेळास किनाऱ्यावर सॅटलाईट ट्रान्समीटर लावलेल्या 'प्रथमा' या मादी कासवाचा 'लोकेशन सिग्नल' बंद झाला आहे. सॅटलाईट ट्रान्समीटरमध्ये बिघाड झाल्यामुळे हे प्रसारण थांबले असावे असे वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह फाउंडेशन'ने सांगितले. वेळासपासून गुजरातच्या सागरी परिक्षेत्रापर्यंत या मादी कासवाने प्रवास केला होता. प्रथमने आतापर्यंत २७०० किमीचे अंतर कापले आहे. प्रथमाचे शेवटचे स्थान कुणकेश्वर, सिंधुदुर्गच्या किनाऱ्यापासून ६० किमी अंतरावर होते. तर सॅटलाईट ट्रान्समीटर लावलेल्या इतर तीन कासवांचा दक्षिण भारताच्या दिशेने प्रवास सुरू आहे.
 
 
वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह फाउंडेशन'ने 'भारतीय वन्यजीव संस्थान'सोबत (डब्लूआयआय) 'ट्रॅकिंग द मायग्रेटरी मूव्ह ऑफ ऑलिव्ह रिडले सी टर्टल्स ऑफ द कोस्ट ऑफ महाराष्ट्र' हा संशोधन प्रकल्प सुरू केला आहे. या अभ्यासाअंतर्गत पाच मादी कासवांवर सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवून त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास सुरू आहे. आत्तापर्यंत ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांना फक्त भारताच्या पूर्व किनार्‍यावर टॅग केले गेले आहे. मात्र, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असा संशोधन प्रकल्प राबवण्यात आला नव्हता. म्हणूनच वर्षाच्या सुरुवातीला कोकण किनारपट्टीवर पाच ऑलिव्ह रिडले कासवांच्या मादींना यशस्वीरित्या सॅटेलाइट टॅग करण्यात आले. भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील 'ऑलिव्ह रिडले सी टर्टल्स'चा हा पहिला सॅटेलाइट टॅगिंग प्रकल्प आहे.
 
 
या प्रकल्पाअंतर्गत टॅग केलेली 'प्रथमा' कासव काही दिवसांपूर्वी गुजरात सागरी परिक्षेत्रात भ्रमण करून महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात परतली होती. मात्र, आता या मादी कसवाचा लोकेशन सिग्नल बंद झाला आहे. काही दिवस गुजरातमध्ये घालवल्यानंतर तिने पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. प्रथमाचे शेवटचे स्थान कुणकेश्वर, सिंधुदुर्गच्या किनाऱ्यापासून ६० किमी अंतरावर होते.
 
 
तर आंजर्ले आणि गुहागर किनाऱ्यावरुन सॅटलाईट टॅग करुन सोडलेल्या 'सावनी' आणि 'रेवा' कासवाचा दक्षिणेच्या दिशेने प्रवास सुरू आहे. त्या एकसारख्या मार्गावर असल्याचे दिसून आले आहे. बदलत्या सागरी प्रवाहांमुळे हे झाल्याचा संशय आहे. गुहागर किनाऱ्यावरुनच सोडलेल्या 'रेवा' या मादी कासवाने कर्नाटकच्या सागरी परिक्षेत्रापर्यंत प्रवास केला आहे. सध्या ती कर्नाटकच्या किनारपट्टीपासून २४० किमी अंतरावर आहे. तर 'वनश्री' ही मालवण किनारपट्टी जवळ असल्याचे आढळून आले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्र' पांढरा हत्ती ठरला आहे (rusty spotted cat breeding centre). कारण, 'केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा'ने (सीझेडए) सूचित केलेल्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच लाखो रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या या केंद्रात न झाल्यामुळे याठिकाणी वाघाटींचे प्रजनन गेल्या १३ वर्षात झालेले नाही (rusty spotted cat breeding centre). दै. 'मुंबई तरुण भारत'ने मंगळवार दि. १ एप्रिल रोजी केंद्रातील वाघाटीच्या पिल्लांचे मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते (rusty..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121