पुणे: रोटरीच्या वैद्यकीय मोफत शस्त्रक्रिया शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती काश्मीरच्या विभागीय आयुक्तांनी दिली. शिबिराचा दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये दक्षिण काश्मीर भागात होणार असून, त्याची नोंदणी जून महिन्यात सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीरचे विभागीय आयुक्त पांडुरंग के. पोले यांच्यासमवेत ‘रोटरी क्लब ऑफ इंडिया’चे गव्हर्नर डॉ. राजीव प्रधान, संचालक आरोग्य सेवा काश्मीर डॉ. मुस्जताक अहमद, नोडल अधिकारी डॉ. तलत आणि ताहिर मगर हे उपस्थित होते.
बारामुला, कुपवाडा आणि गांदरबल या तीन जिल्ह्यांमध्ये आयोजित केलेल्या आठवडाभराच्या मेगा आरोग्य शिबिरात भव्य प्रतिसाद मिळाल्याची माहितीही त्यांनी दिल. विभागीय आयुक्तांनी सांगितले की, “या शिबिराचा उद्देश ‘कोविड’मुळे जो वैकल्पिक शस्त्रक्रियांचा ‘बॅकलॉग’ पूर्ण करणे, हा होता. या वैद्यकीय शस्त्रक्रिया महामारीच्या काळात आरोग्य पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय कर्मचार्यांवरील दबाव कमी करण्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या,” हेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
रोटरीने या आधी केलेल्या कामाची आठवण करून देताना डॉ. राजीव प्रधान म्हणाले की, “संस्थेने आफ्रिकन खंडाला ४६ वेळा भेट दिली आणि दीड लाख शस्त्रक्रिया केल्या. याशिवाय रोटरीचे श्रीनगरमध्ये दोन क्लब असून याचे जाळे १८४ देशांमध्ये पसरलेले आहे. यात ४३ नामांकित आंतरराष्ट्रीय शल्यचिकित्सक आणि ‘रोटरी क्लब’चे स्वयंसेवक उपस्थित होते. ज्यांना सर्जन, ऍनेस्थेटिक्स, पॅरामेडिक्स आणि साहाय्यक कर्मचारी अशा सुमारे ४५० व्यक्तींनी सहकार्य केले.”
विशेष म्हणजे, ११ मे १८ दरम्यान झालेल्या या शिबिरात सर्व शस्त्रक्रिया केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत मोफत करण्यात आल्या.