नवी दिल्ली : अत्यंत वाईट आर्थिक संकटातून जात असलेले आपले शेजारी राष्ट्र श्रीलंका आता राजकीय उलथापालथींना सामोरे जात आहे. अनेक दिवसांपासून तीव्र विरोध होऊनही आपली खुर्ची न सोडणाऱ्या पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी अखेर जनमताच्या रेट्यापुढे हार पत्करली आणि अखेर पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या चीनधार्जिण्या धोरणांनी श्रीलंकेला अभूतपूर्व आर्थिक संकटात राजपक्षे यांनी लोटले असा आरोप त्यांच्यावर होतो आहे. लोकांनी महिंद्रा राजपक्षे यांच्या विरोधात हिंसक आंदोलने करूनसुद्धा ते आपली खुर्ची सोडत नव्हते पण अखेर त्यांना नमावेच लागले.
श्रीलंकेत सध्या अभूतपूर्व असे आर्थिक संकट आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसाठीही प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. संपूर्णपणे पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था असेलेल्या श्रीलंकन अर्थव्यवस्थेला कोरोना काळाने अजूनच खाईत लोटले, पण याचबरोबरीने राजपक्षे सरकारची अत्यंत चुकीची धोरणेही श्रीलंकेच्या अधोगतीस कारणीभूत आहेत. याआधी श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली होती पण लोकांच्या प्रचंड विरोधामुळे ती मागे घ्यावी लागली होती. आता या परिस्थितीत आता श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष आणि महिंद्रा राजपक्षे यांचे धाकटे बंधू गोटाबाया राजपक्षे यांच्या हातात सर्व सूत्रे गेली आहेत.