कर्नाटकला भेट देऊन 'रेवा'चा खोल अरबी समुद्रात विश्राम; तर 'प्रथमा'चे पुनरागमन

काही दिवसांपूर्वी गुजरात किनारपट्टीजवळ आढळून आली होती "प्रथमा"

    09-May-2022   
Total Views | 148
mangrove

 

मुंबई (प्रतिनिधी) : वेळास किनाऱ्यावर सॅटलाईट ट्रान्समीटर लावलेल्या 'प्रथमा' या मादी कासवाचे महाराष्ट्रात पुनरागमन होत आहे. वेळासपासून गुजरातच्या सागरी परिक्षेत्रापर्यंत या मादी कासवाने प्रवास केला होता. आता पुन्हा एकदा ती महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात परतण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. तर सॅटलाईट ट्रान्समीटर लावलेल्या इतर कासवांचा दक्षिण भारताच्या दिशेने प्रवास सुरू आहे.
 
 
वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह फाउंडेशन'ने 'भारतीय वन्यजीव संस्थान'सोबत (डब्लूआयआय) 'ट्रॅकिंग द मायग्रेटरी मूव्ह ऑफ ऑलिव्ह रिडले सी टर्टल्स ऑफ द कोस्ट ऑफ महाराष्ट्र' हा संशोधन प्रकल्प सुरू केला आहे. या अभ्यासाअंतर्गत पाच मादी कासवांवर सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवून त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास सुरू आहे. आत्तापर्यंत ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांना फक्त भारताच्या पूर्व किनार्‍यावर टॅग केले गेले आहे. मात्र, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असा संशोधन प्रकल्प राबवण्यात आला नव्हता. म्हणूनच वर्षाच्या सुरुवातीला कोकण किनारपट्टीवर पाच ऑलिव्ह रिडले कासवांच्या मादींना यशस्वीरित्या सॅटेलाइट टॅग करण्यात आले. भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील 'ऑलिव्ह रिडले सी टर्टल्स'चा हा पहिला सॅटेलाइट टॅगिंग प्रकल्प आहे.
 

या प्रकल्पाअंतर्गत टॅग केलेली 'प्रथमा' कासव महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात परतत आहे. तिने गुजरातच्या सागरी परिक्षेत्रापर्यंत स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर केले होते. काही दिवस गुजरातमध्ये घालवल्यानंतर तिने पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. तर आंजर्ले आणि गुहागर किनाऱ्यावरुन सॅटलाईट टॅग करुन सोडलेल्या 'सावनी' आणि 'वनश्री' कासवाचा दक्षिणेच्या दिशेने प्रवास सुरू आहे. त्या एकसारख्या मार्गावर असल्याचे दिसून आले आहे. बदलत्या सागरी प्रवाहांमुळे हे झाल्याचा संशय आहे. गुहागर किनाऱ्यावरुनच सोडलेल्या 'रेवा' या मादी कासवाने कर्नाटकच्या सागरी परिक्षेत्रापर्यंत प्रवास केला आहे. सध्या ती  कर्नाटकच्या किनारपट्टीपासून २४० किमी अंतरावर आहे. 'रेवा'ने अलीकडेच १५० मीटर खोल समुद्रापर्यंत प्रवास केल्याची नोंदही 'डब्लूआयआय'च्या संशोधकांनी केली आहे. ती सध्या 'चागोस-लॅकॅडिव्ह रिज' या सागरी परिक्षेत्रात अन्नाच्या शोधार्थ आहे.  

 
 

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास. 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121