मुंबई: "महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेत उतरावे, निवडणूक लढवून दाखवावी, मी त्यांच्या विरोधात लढेन" असे थेट आव्हान नवनीत राणा यांनी दिले आहे. मी अशी काय चूक केली की मला १४ दिवस तुरुंगात डांबले? श्रीरामाचे नाव घेणे, हनुमान चालीसा म्हणणे हा गुन्हा आहे का? जर ही चूक असेल तर मी ती करेनच असेही नवनीत राणा यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरेंनी जनतेत उतरून दाखवावे, महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ त्यांनी निवडावा मी त्यांच्या विरोधात उभी राहणार अशा शब्दांत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे.
कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर मानेच्या दुखण्यामुळे नवनीत राणा यांना रुग्णालयात दाखल केले गेले होते. तिथून त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचे आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याला अटक करून त्यांच्यावर राजद्रोहासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तब्बल बारा दिवसांनी मुंबई सत्र न्यायालयाने त्यांची सशर्त जामीनावर सुटका केली. "नवनीत राणा- रवी राणा या दोघांनाही राज्य सरकारने क्रौर्याची वागणूक दिली" अशी टीका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.