‘स्टार्टअप्स’ना तंत्रज्ञानाचे धडे देणारे योगेश घोरपडे स्वतःच्या कल्पना उद्योगामार्फत सत्यात उतरवणे, हे प्रत्येक तरुण उद्योजकाचे स्वप्न असते. पण, या वाटचालीत मोठे सर्वात मोठा वाटा असतो, तो तंत्रज्ञानाच्या वापराचा. तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय कुठलाच उद्योग पुढे जाऊ शकत नाही. हीच गोष्ट ओळखून ‘स्टार्टअप्स’ना तंत्रज्ञानाचे धडे देऊन प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे हाच व्यवसाय आपल्या ‘एव्हिझिप्रो’ या कंपनीमार्फत करणार्या योगेश घोरपडे यांचा उद्योजकीय प्रवास उलगडणारा हा लेख...
मोठे होण्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते. मार्गदर्शकाशिवाय आपण आपल्या प्रयत्नांचे यशात परिवर्तन करू शकत नाही. आजच्या युगात तर मार्गदर्शकांची गरज खूप आहे. या काळातला सर्वात मोठा मार्गदर्शक तंत्रज्ञान आहे. आपल्या कामाला तंत्रज्ञानाची जोड नसेल, तर आपले काम लोकांपर्यंत पोहोचणे निव्वळ अशक्य. तंत्रज्ञान तुमच्यासमोर अनेक अशक्य वाटणार्या वाटा खुल्या करते. त्यामुळे आपल्याला तंत्रज्ञानाच्या वापराला पर्याय नाही. नवीन येणार्या तरुणांनी या गोष्टीकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे, नवीन तंत्रज्ञान शिकून घेतले पाहिजे, तरच जगाच्या बरोबर राहता येईल.
योगेश यांनी सांगली येथील ‘वालचंद कॉलेज’मधून १९९५ साली ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग’चे शिक्षण पूर्ण केले. अभियांत्रिकी क्षेत्रातच काम करायचे ठरवले. योगेश यांना बर्याच क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. संरक्षण क्षेत्र, सॉफ्टवेअर यांसारख्या क्षेत्रांमध्ये कामांचा अनुभव मिळाला. ‘सीमेन्स’, ‘भारत फोर्ज’, ’डीआरडीओ’ यांसारख्या बहुराष्ट्रीय तसेच संरक्षण क्षेत्रांमध्ये योगेश यांनी काम केले. त्यांनी या काळात केलेल्या कामांची यादीही खूप मोठी आहे. भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर संशोधक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न असलेल्या ‘डीआरडीओ’च्या सर्वात मोठ्या मिसाईल प्रोग्राम, इंदौर येथील ‘हायस्पीड टर्बाईन प्रोजेक्ट’, ‘जीएसएलव्ही डीए२’च्या पहिल्या ‘मोटार अॅनालिसिस’चे काम असेल यांसारखी अनेक मोठ्या पातळीवरची कामे करण्याची संधी योगेश यांना मिळाली.
‘सीमेन्स’ कंपनीसोबत काम करत असताना त्यांना ‘फोर्ड मोटर’, ‘नासा’शी संलग्न ‘जेपीएल’, ‘एम अॅण्ड एम’सारख्या मोठ्या कंपन्यांसोबत योगेश यांचे काम आहे. योगेश यांच्यात अंगभूत असलेली संशोधक वृत्ती यांमुळे या क्षेत्रात मोठे संशोधन करून त्यांनी तीन पेटंट्ससुद्धा मिळवली आहेत. सतत नवीन शिकत राहिले पाहिजे, या त्यांच्या इच्छेने त्यांनी हॉवर्ड विद्यापीठाशी संलग्न असलेल्या भारतीय विद्यापीठातून ‘एमबीए’ची पदवीसुद्धा मिळवली. याच काळात त्यांना ‘रिटेल’ क्षेत्रातसुद्धा रस निर्माण झाला. त्यामुळेच त्यांनी या क्षेत्रासाठी काम करण्यास सुरुवात केली. योगेश यांनी जेव्हा या क्षेत्रासाठी काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा भारतात ‘स्टार्टअप्स’ किंवा नवउद्यमींचे क्षेत्र नुकतेच उदयाला येत होते. अनेक ‘स्टार्टअप्स’ उदयास येतात आणि बंद पडतात. हे असे का होते आहे, याचा शोध जेव्हा योगेश यांनी घेतला, तेव्हा त्यांना जाणवले की, या ‘स्टार्टअप्स’कडे असलेली नवीन तंत्रज्ञानाची कमतरता. कुठलाही नवीन व्यवसाय लगेच मोठ्या स्पर्धेला तोंड देऊ शकत नाही. कारण, त्यांच्याकडे भांडवल, प्रगत तंत्रज्ञान, नसतात योग्य मार्गदर्शन यांसारख्या कुठल्याच गोष्टी नसतात.
त्यामुळेच त्यांच्यावर व्यवसाय बंद करण्याची वेळ येते. त्यामुळेच या क्षेत्रासाठी काहीतरी केले पाहिजे, यातूनच ‘एव्हिझिप्रो’ चा जन्म झाला. “सुरुवातीच्या काळात परदेशात काम करण्याच्या बर्याच संधी मिळत होत्या, पण मी ठरवलेच होते की, जे काही करायचे आहे ते भारतात राहूनच. त्यामुळे त्या सर्व संधी नाकारून मी भारतातच काम करायचे ठरवले आणि त्याप्रमाणे काम करायला सुरुवात केली,” असे योगेश ‘मी या व्यवसायाकडे का वळलो’ या प्रश्नाचे उत्तर देताना सांगतात. त्यामुळेच स्वतःच्या ज्ञानाचा फायदा स्वतःच्या देशातच झाला पाहिजे, या हेतूनेच काम करायला सुरुवात केली, असे योगेश सांगतात. “मी जेव्हा माझ्या कामाच्या निमित्ताने देशभर, जगभर फिरत होतो, लोकांशी बोलत होतो तेव्हा माझ्या लक्षात असे आले की, उद्योग मग त्याचा आकार, क्षेत्र कुठलेही असो त्याला पुढे जाण्यासाठी तंत्रज्ञान या सर्वात मोठ्या गोष्टींची गरज आहे आणि तीच या क्षेत्राची कमजोरी आहे.
त्यामुळे हे क्षेत्र स्थिर करायचे असेल किंवा या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर या बाजारात येणार्या नवीन संकल्पना, तंत्रज्ञान या ‘स्टार्टअप्स’पर्यंत पोहोचायला हव्यात. उदा. जर एखादे छोटे हॉटेल किंवा किराणामालाचे दुकान असेल तर ते खूप छोट्या पातळीवर काम करत असतात. पण त्यांचा आकार, त्यांच्या आर्थिक क्षमता या खूप कमी असल्याने त्यांना त्यांच्या क्षेत्रातल्या मोठ्या उद्योगांशी स्पर्धा करता येत नाही. रिटेल क्षेत्र जरी घेतले तरी त्यातील ‘अॅमेझॉन’, ‘रिलायन्स’, ‘शॉपर्स स्टॉप’ यांसारख्या मोठ्या कंपन्यांसोबत कधीच स्पर्धा करत येत नाही. याचे कारण या मोठ्या कंपन्यांकडे तंत्रज्ञानाचे पाठबळ आहे. ते तंत्रज्ञान विकत घेण्याची आर्थिक क्षमतासुद्धा आहे. यामुळेच जर छोट्या पातळीवरचे उद्योग टिकायचे असतील, तर त्यांच्यापर्यंत या सर्व गोष्टी त्यांना परवडतील, अशा स्वरूपात त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. यासाठी आम्ही सुरुवातीला या उद्योगांना कमीत कमी किमतीत या सर्व गोष्टी पुरवतो. सुरुवातीला मोफतसुद्धा देतो, त्यांना प्रशिक्षित करतो, त्यांना याचे महत्त्व समजावून सांगतो, अशा प्रकारे आम्ही आमच्या ‘एव्हिझिप्रो”मार्फत काम करतो,” असे योगेश सांगतात.