न तंद्रयते चरंश्चरैवेति चरैवेति...

    04-May-2022   
Total Views | 66

aniruddha
 
चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट.’ गेल्या काही दशकांत माणसांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल होत गेले. त्यांचा सकारात्मक स्वीकार करत त्यानुसार आपल्या जीवनशैलीत योग्य बदल कसे करावेत, याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारे नाशिकचे मॅरेथॉन व आरोग्य प्रशिक्षक अनिरुद्ध अथनी. अनिरुद्ध यांचा जन्म पुण्याचा. शालेय शिक्षण मुंबईत, ‘इंजिनिअरिंग’ पुण्यात, तर ‘एमबीए’त्यांनी नाशिक येथे पूर्ण केले. सातत्याने धावत्या असणार्‍या आजच्या जगाच्या वेगाशी जुळवून घ्यायचे, तर आपल्यालाही वेग वाढविण्याशिवाय पर्याय नाही, हे कटू वास्तव. परंतु, याच धावण्याची एक योग्य बाजू म्हणजे शरीरस्वास्थ्यासाठीचा परिपूर्ण व्यायाम असलेले धावणे. हाच मंत्र घेऊन आज पुढे निघालेले अनिरुद्ध यांना धावण्याची आवड कशी निर्माण झाली, हा प्रवास मोठा रंजक आहे. ते सांगतात की, “साधारण आठवीत असल्यापासून मी धावत आहे. लहानपणी मी तबलावादन शिकत होतो. शिकताना तबल्याच्या नादातून निर्माण होणार्‍या लयीची ओळख आणि आवड माझ्या मनात निर्माण झाली. धावत असतानाही एक छान अशी लय शरीराला आणि विचारांनादेखील प्राप्त होते, हे अनुभवायला मिळाले. तिथून मी धावण्याच्या प्रेमात पडत गेलो.”
 
 
शिक्षणानंतर आपल्या वडिलांच्या ‘फुड प्रोसेसिंग’च्या व्यवसायात अनिरुद्ध यांनी मदत करण्यास सुरुवात केली आणि यशस्वीपणे तो १६ वर्षं सांभाळला. अर्थात, यादरम्यान कुठेतरी रिक्तता जाणवत आहे, काहीतरी सुटून जात आहे, असे त्यांच्या मनाला एकीकडे वाटू लागले होते. पुण्यात असताना वसतिगृह ते महाविद्यालय हे साधारणपणे दहा किलोमीटरचे अंतर ते सायकलद्वारे पार करत होते. त्यामुळे सायकल चालवण्याचीही आवड निर्माण झालेली होती. यातूनच पुढे अनिरुद्ध यांनी काही ‘मॅरेथॉन’मध्ये भाग घेतला. ‘मॅरेथॉन’मध्ये धावल्यानंतर त्यांची केवळ गोडीच लागली नाही, तर जीवनाला एक उद्दिष्ट प्राप्त झाल्यासारखे वाटू लागले. याच क्षेत्रामध्ये शास्त्रोक्त शिक्षण घ्यावे, असे मग त्यांनी ठरवले आणि त्यादृष्टीने शोध घेण्यास सुरुवात केली. ‘अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसीन’च्या भारतातल्या मुंबई शाखेत हा कोर्स घेतला जातो, असे समजले व त्यासाठी त्यांनी प्रवेश घेतला. हे शिक्षण घेताना, त्यांची या क्षेत्राची आवड वाढत गेली व २०१५ साली ते या कोर्समध्ये भारतात प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाले.
 
 
 
आपल्या शहरात ‘मॅरेथॉन’, ‘रनिंग’ व ‘फिटनेस’साठी असलेल्या जागृतीचा अभाव त्यांना मुळातच जाणवत होता. त्यादृष्टीने नेमके काय करता येईल, अशा विचारातून त्यांच्या ’ActivNRG’ संस्थेची निर्मिती झाली. सुरुवातीला केवळ दोन प्रशिक्षणार्थी असलेल्या या संस्थेने अल्पावधीतच यशाचे टप्पे गाठले. आज नाशिक शहरात तब्बल तीन ठिकाणी संस्थेच्या शाखा आहेत. ‘फिटनेस’ व धावण्यासंबंधीचे आवश्यक प्रशिक्षण देणारी ही महत्त्वाची संस्था ठरलेली आहे.
धावणे ही कुठल्याही वयात नैसर्गिक क्रिया असून, हा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त परिणामकारक, असा शारीरिक व्यायाम प्रकार आहे. अनेक वर्ष शारीरिक व्यायामापासून दुरावलेल्या व्यक्तीने अचानक धावण्यास सुरुवात केल्यास शरीराला इजा होऊ शकते. सुरक्षित व योग्य प्रकारे धावण्यासाठी अनेक तांत्रिक बाबींवर लक्ष द्यावे लागते. श्वसनाचे नियम, योग्य वेग आणि कालावधी, योग्य असे शूज, धावताना काळजीपूर्वक केलेली शारीरिक हालचाल अशा काही बाबींची काळजी घेतल्यास धावण्याची सुरुवात करण्यासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही व निवृत्तीचेदेखील कुठलेही विशिष्ट वय नाही, असे अनिरुद्ध आवर्जून सांगतात.
 
 
दक्षिण आफ्रिका येथे दरवर्षी होणार्‍या जगातील सर्वात मोठ्या व जुन्या ‘मॅरेथॉन’ मध्ये धावायला गेलेले असताना अनिरुद्ध यांना साधारण सत्तरीचे एक गृहस्थ भेटले. तब्बल ४२ वेळा ‘मॅरेथॉन’ धावल्यानंतर ही त्यांची ४३ वी ‘मॅरेथॉन’ होती. धावण्याच्या क्षेत्रातील तुमचे आदर्श कोण, असे विचारल्यावर अनिरुद्ध या काकांचे उदाहरण देतात. या व्यक्तीची कित्येक दशकांची तपस्या, स्वास्थ्यासाठी असलेले सकारात्मक विचार पुढील अनेक पिढ्यांसाठी आदर्श निर्माण करताना जसे दिसतात तसेच, आपण व्हावे इतरांना देखील प्रवृत्त करावे, असे अनिरुद्ध यांनी मग मनापासून ठरवले. आज त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी येणार्‍यांमध्ये साधारण पस्तिशी ओलांडलेल्या व्यक्ती येतात तेव्हा धावण्यासाठी, ‘फिटनेस’साठी ते इच्छुक असले तरी आपण हे करू शकू याची त्यांना शाश्वती नसते. योग्य त्या शिक्षणानंतर मात्र तीच व्यक्ती वर्षभरात अर्ध ‘मॅरेथॉन’ धावते तेव्हा त्याला जो आनंद होतो तो अनिरुद्धसाठीदेखील अतिशय समाधानकारक असतो.
 
 
यातीलच काही रनर्सने पुढे पूर्ण ‘मॅरेथॉन’, ‘अल्ट्रा मॅरेथॉन’ देखील पूर्ण केलेल्या आहेत हे कौतुकास्पद आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. आजारावर उपचार करण्यापेक्षा तो होऊ नये, म्हणून प्रयत्न व्हावेत या विचारातून अनिरुद्ध यांनी ‘हेल्थ कोच’ असे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवले आहे. अधिकाधिक लोकांना योग्य जीवनशैली बाबत जागरूक व सजग करत समाजात आरोग्य चळवळ सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. अनेक पुरस्कार मिळवणारे अनिरुद्ध उपनिषदांतील ‘चरैवेति चरैवेति’ हा संदेश खर्‍या अर्थाने जनमानसात रूजवत आहेत. त्यांच्या कार्यास अनेकानेक शुभेच्छा!
 
 
 

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.

अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर खापरखेडा येथे तिरंगा सन्मान यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर खापरखेडा येथे तिरंगा सन्मान यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ भारतीय सेनादलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या महापराक्रमाच्या सन्मानार्थ नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा-चिचोली ग्रामपंचायत क्षेत्रात आज सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे आणि सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली होती...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121