मुंबई : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर काही दिवसांपूर्वीच ईडीने कारवाई करत त्यांच्या विरोधातील काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती. मुंबईसह पुणे आणि मुरुड येथेही ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ईडीच्या पथकाने मुरुड ग्रामपंचायतीकडून साई रिसॉर्टची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. आता या संबंधात भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी अनिल परब यांनी ज्या विभास साठेंकडून जमीन विकत घेतली होती, त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी केली आहे.
"महाराष्ट्राचे परिवहन मंत्री श्री अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्ट घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. या घोटाळ्यासंबंधी अनेक तपास यंत्रणा/संस्थांनी तसेच पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांनी श्री अनिल परब व त्यांच्या साई रिसॉर्ट एनएक्स वर कारवाई करण्याचा ही निर्णय घेतला आहे. श्री अनिल परब यांनी मे २०१७ मध्ये श्री विभास साठे यांच्याकडून दापोली येथील मुरुड किनाऱ्यावरील जमीन घेतली व फ्रॉड, फोर्जरी, चीटिंग करून तिथे रिसॉर्ट बांधला.
श्री अनिल परब या घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत म्हणून आम्हाला भीती वाटते की, श्री परब हे श्री विभास साठेवर दडपण आणणार. श्री विभास साठे यांचे "मनसुख हिरेन” होऊ नये हे पाहण्याची जबाबदारी महाराष्ट्र पोलीसांची आहे," अशा शब्दात किरीट सोमैया यांनी महाराष्ट्र पोलीस संचालकांना पात्र लिहिले आहे.
तसेच "श्री विभास साठे यांच्या जिवाला धोका लक्षात ठेऊन त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी, त्यांचे मनसुख हिरेन होऊ नये हे पहावे, ही विनंती," अशी विनंतीही किरीट सोमैया यांनी पोलीस महासंचालकांना केली आहे.