अहमदनगर: महाराष्ट्रातल्या बहुजनांची पोरे पवारांच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाहीत असा गंभीर इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे जाणाऱ्या गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या यात्रेला पोलिसांकडून चौंडीच्या वेशीवरच अडवण्यात आले. याचवेळी पडळकरांनी हा गंभीर इशारा शरद पवारांना दिला. सातत्याने बहुजण समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शरद पवारांना आजच कशी काय अहिल्याबाई होळकरांची जयंती आठवली ? असा खोचक सवालसुद्धा त्यांनी केला आहे.
अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे राष्ट्रवादी पक्षातर्फे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याच मेळाव्यासाठी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्याबाई जागर यात्रेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. " आज पोलिसांचा वापर करून तुम्ही बहुजन समाजाचा आवाज दडपू बघत आहात, पण ते तुमच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही" असा इशाराही पडळकरांनी दिला. अहिल्याबाई होळकर आमचे दैवत आहेत त्यांच्या दर्शनासाठी आम्हाला अडवणारे पोलिसव आहेत कोण ? असा सवालही पाडळकरांनी यावेळी केला आहे. एकूणच अहिल्याबाईंच्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्रात शरद पवार - पडळकर घमासान बघायला मिळणार अशी चिन्हे आहेत.