नागपूर : काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर प्रदेशच्या इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिल्याने काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजी असल्याचे दिसत आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव माजी आमदार आशिष देशमुख यांच्याकडून पृथ्वीराज चव्हाण यांनी बाहेरचा उमेदवार दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ते आपल्या प्रदेश महासचिव पदाचा राजीनामा देणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कर्तबगार नेते असूनही उत्तर प्रदेशच्या एका शायरला उमेदवारी
महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये अनके कर्तबगार नेते असताना एका शायरला राज्यसभेची उमेदवारी दिल्याने सर्वच स्तरावर नाराजी व्यक्त होत आहे. अशातच प्रतापगडी यांचा २०१९च्या लोकसभेत तब्बल ६ लाख मतांनी दारूण पराभव झाला होता. असे असतानाही त्यांची राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा विरोध म्हणून राजीनामा देणार असल्याचे आशिष देशमुख यांनी सांगितले.
सोनिया गांधींनी आश्वासन दिले होते पण...
"काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला योग्य वेळी लक्ष ठेवू असे आश्वासन दिले होते. त्यामुळ यंदा राज्यसभा उमेदवारीची संधी मिळेल अशी आशा होती. पण राज्यातील व्यक्तीला बाजूला सारून दुसऱ्या राज्यातील व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पुढच्या काळात चांगल्या लोकांना उमेदवारी मिळेल.", अशी आशा आशिष देशमुख यांनी व्यक्त केली.