नवी दिल्ली : काशी विश्वनाथ – ज्ञानवापी प्रकरणाचा खटला दाखल करून घ्यायचा की नाही, याविषयी वाराणसी जिल्हा न्यायालयात पुढील सुनावणी ४ जुलै रोजी होणार आहे. याविषयी अद्याप मुस्लिम पक्षाचाच युक्तिवाद सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाराणसी जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. प्रार्थनास्थळ कायदा, १९९१ नुसार हा खटला सुनावणीयोग्य नसल्याचा मुस्लिम पक्षाचा दावा असून त्याविषयी त्यांच्यातर्फे युक्तिवाद सुरू आहे. सोमवारीदेखील मुस्लिम पक्षाने युक्तिवाद करताना हा खटला सुनावणी करण्याय योग्य नसल्याचा दावा केला आहे. त्याचप्रमाणे ज्ञानवापी मशिदीचा परिसर हा वक्फ मंडळाची संपत्ती नसल्याचा हिंदू पक्षाचा दावा अयोग्य असल्याचे मुस्लिम पक्षातर्फे सांगण्यात आले.
त्यासाठी मुस्लिम पक्षातर्फे १९३७ सालच्या दिन मोहम्मद खटल्याच्या निकालाचा हवाला दिला. या निकालामध्ये मशिद आणि मंदिराची मालमत्ता ठरविण्यात आली होती. त्यानुसार, ज्ञानवापी मशिदीचा संपूर्ण परिसर वक्फ मंडळाची मालमत्ता असून त्यामध्ये मुस्लिमांना नमाज पठणाचा अधिकार असल्याचा युक्तीवाद मुस्लिम पक्षातर्फे करण्यात आला आहे. मुस्लिम पक्षाचा युक्तीवाद अद्याप बाकी असून एकुण ५१ पैकी ३३ परिच्छेदांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. याविषयी पुढील सुनावणी ४ जुलै रोजी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे न्यायालयाने पक्षकारांना सर्वेक्षणाचे चित्रीकरण आणि छायाचित्रे प्रदान करण्याचे निर्देशही दिले आहेत.
भगवान विश्वेश्वरांची वादमित्राद्वारे याचिका
ज्ञानवापी मशिद परिसरामध्ये नित्य पूजाअर्चा करण्याची परवानगी देण्याची मागणी करून स्वयंभू भगवान विश्वेश्वर यांनी आपले ‘वादमित्र’ (नेक्स्ट फ्रेंड) वरिष्ठ दिवाणी वकील अॅड. विजय शंकर रस्तोगी यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. स्वयंभू भगवान विश्वेश्वर यांनी वादमित्राद्वारे दाखल याचिकेमध्ये आदेश १ नियम ११ अंतर्गत या श्रृंगारगौरी याचिकेमध्ये पक्षकार होण्याचे अर्जात म्हटले आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणात प्राचीन मुख्य देवतेलाच पक्षकार बनविण्यात आलेले नाही. देवतेला याप्रकरणी पक्षकार बनवून त्यांचीही बाजू ऐकून घेणे आवश्यक असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.