नाशिक : देशभरातील हिंदू भाविकांचे श्रद्धस्थान असलेल्या हनुमंताच्या जन्मस्थळावरून आता वादंग पेटला आहे. हनुमंताचे जन्मस्थळ कर्नाटकातील किष्किंधा की नाशिक जवळचे अंजनेरी यावरून हा वाद सुरु झाला आहे. या वादात किष्किंधा मठाचे मठाधिपती गोविंदानंद सरस्वती यांनी याच वरून नाशिक ते त्र्यंबकेश्वर अशा हनुमान रथयात्रेची घोषणा केली आहे. तर ही रथयात्रा रोखण्यात यावी यासाठी अंजनेरीच्या ग्रामस्थांनी पोलीस स्थानकात धाव घेतली आहे. पोलिसांना याबाबतीत सविस्तर निवेदनही सादर केले आहे.
हनुमंताची जन्मभूमी कोणती? सुग्रीवाची किष्किंधा नगरी ही महाराष्ट्रात की कर्नाटकात हे वाद खूप जुने आहेत. हिंदू देवदेवतांच्या जन्मस्थळांबद्दल असे वादंग कायमच होत असतात. यावर रीतसर अभ्यासपूर्ण संशोधन होऊन, खरे काय आहे ते लोकांसमोर यावे अशीच मागणी जनतेकडून केली जात आहे. त्यामुळे हिंदू देवळांच्या पुनर्स्थापनेच्या विषयवरून हिंदू समाज आक्रमक झाला असताना या नव्या वादांची त्यात भर पडत आहे हे निश्चित.