कांदळवने हा मुंबईचा महत्त्वाचा घटक आहे. परंतु, दररोज मुंबईतील लाखो नागरिक हे, या वनस्पती चिखलाने माखलेल्या आहेत, किनार्यावर निरर्थकपणे वाढणार्या आहेत अशी कल्पना करून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, हे कांदळवनाचे जंगल मुंबईचे रक्षण करते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या कांदळवनातून अनेक रोजगार सुद्धा निर्माण झाले आहेत. परंतु, आज काही प्रमाणात कांदळवनांचा र्हास होत आहे. याच कांदळवन क्षेत्रांचा आढावा घेणारा हा लेख...
पूर्व मुंबईत अर्धा बांधलेला महामार्ग, ‘ओव्हरपास’वर बारीक फांद्या असलेली उजाड झाडे आहेत. ही कांदळवनाची झाडे उष्णकटिबंधीय दलदलीच्या प्रदेशात आढळतात. या झाडांची मूळं श्वास घ्यायला, जमिनीच्या वर वाढतात. पण नजीकच्या दशकात, बांधकामामुळे त्यांचे जीवनरक्त असणारे खारे पाणी अडवले जाते आहे. त्यांची जमिनीवरची मुळे खार्या पाण्याऐवजी कोरड्या चिखलातून बाहेर पडत आहेत आणि अजून एक कांदळवनाचा परिसर उद्ध्वस्त होतो आहे. हे बघून दु:ख होते.
मुंबईच्या ऐतिहासिक नोंदीवरून असे दिसून येते की, १६७० मध्ये मुंबईच्या आसपास अनेक बेटे होती. देशावर राज्य करणार्या इंग्रजांनी या बेटांचे व्यावसायिक महत्त्व ओळखले.
त्यांनी खारफुटीची जंगलतोड केली आणि या बेटांचा एकत्रित भाग ‘ग्रेटर बॉम्बे’ म्हणून ओळखला जाऊ लागला. तेव्हापासून, विकास आणि वाढत्या लोकसंख्येच्या दबावाखाली खारफुटीच्या जमिनीचा नाश होऊ लागला. यावरून हे सिद्ध होते की, आजच्या मेगासिटीला खारफुटीच्या जंगलाचा चांगला भूतकाळ होता. घरे, झोपडपट्ट्या, सांडपाणी प्रक्रिया आणि कचर्याच्या ढिगार्यांसाठी पुनर्संचयित झाल्यामुळे मुंबईने गेल्या दोन दशकात ४०% कांदळवन क्षेत्र गमावले आहे. किनारपट्टीलगत वाढणारी औद्योगिक क्षेत्रे आणि घरगुती व औद्योगिक सांडपाणी सोडणे, यामुळे हे क्षेत्र प्रदूषित होत आहे. सुदैवाने गोदरेज, विक्रोळीमध्ये आजही उत्कृष्ट खारफुटीचे जंगल आहे. भारतात आढळणार्या खारफुटीच्या ३५ प्रजातींपैकी सुमारे २० प्रजाती महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आहेत आणि त्यापैकी १५ प्रजाती मुंबईत आढळतात. मातीची क्षारता जास्त असल्यामुळे मुंबईतील ६० टक्के खारफुटीमध्ये ‘एव्हिसेनिया मरिना’ यांचा समावेश होतो. ही प्रजाती मिठी नदीत लक्षणीय प्रमाणात आढळणारे शिसे, पारा आणि क्रोमियमसारख्या जड धातूंसह प्रदूषणदेखील सहन करते.
कांदळवने हा मुंबईचा महत्त्वाचा घटक आहे. परंतु, दररोज, मुंबईतील लाखो नागरिक या वनस्पती चिखलाने माखलेल्या किनार्यावर निरर्थकपणे वाढणार्या आहेत, अशी कल्पना करून जातात. मात्र, मुंबईतील नागरिकांच्या जीवनमानासाठी कांदळवन क्षेत्रेकिती महत्त्वाची आहेत, हे लोकांना समजत नाही. गाळ अडकवून ही कांदळवन क्षेत्रे मुंबईच्या किनार्याची अखंडता राखतात. मुंबई शहरासाठी ही एक महत्त्वाची सेवा आहे कारण, तिन्ही बाजूंनी समुद्राने ग्रासलेले आहे. हा परिसर औषधी व नैसर्गिक उत्पादनांसाठी तसेच मीठ उत्पादन, मधुमक्षिकापालन, इंधन आणि चारा इत्यादींसाठी खूप मोठी क्षमता असलेला आहे. कांदळवनाचे जंगल हे मासे, कोळंबी, मोलस्क आणि खेकडे इत्यादींचे प्रजनन आणि पालनपोषण करून मासेमारीसाठी उपजीविकेचे साधन उपलब्ध करतात. पण या महत्त्वाच्या परिसराची अजूनही काळजी घेतली जात नाही, ही नक्कीच शरमेची गोष्ट आहे. मे महिन्याच्या अखेरीस, पर्यावरणवादी आणि मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या पाणथळ जागा आणि कांदळवन संरक्षण पॅनेलचे सदस्य, यांनी वन विभागासह राज्य अधिकार्यांना वांद्रे (पश्चिम) येथील कार्टर रोडवरील खारफुटीवरबेकायदेशीर कचरा टाकल्याबद्दल आठवण करून दिली होती.
कारण, तेथील कचरा अजूनही काढला गेला नाही. तिथे कचरा टाकून जवळपास एक वर्ष झाले आहे. कांदळवन समितीने यापूर्वी नागरी संस्था, जिल्हाधिकारी आणि इतर विभागांना पत्र लिहिले होते. परंतु, अजूनही येथे ढिगारा तसाच आहे, असे पर्यावरणवादी डी. स्टॅलिन म्हणाले. या परिसरात ‘रायझोफोरा मुक्रोनाटा’, ‘एव्हिसेनिया मरिना’सारखी प्रचंड झाडे ढिगार्यात गाडली गेली आहेत आणि पाण्यापासून वंचित आहेत. २०० मीटरच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कचरा आहे आणि खारफुटीला विभाजित करणारा रस्ता तयार झाला आहे. वारंवार केलेल्या विनंत्या आणि निर्देशांकडे दुर्लक्ष केले गेले आहे, असेदेखील स्टॅलिन म्हणाले. हे २००६ च्या जनहित याचिका ८७ मध्ये पारित केलेल्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे आणि ‘सीआरझेड’ अधिसूचनेचे उल्लंघन आहे असेदेखील स्टॅलिन यांनी या प्रकरणाबद्दल सांगितले. स्थानिक रहिवाशांच्याही तक्रारी मिळाल्याने कार्टर रोडवरील ढिगारा लवकरच हटवण्यात येणार असल्याचे संबंधित वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी सांगितले.
पण कार्टर रोड हे एक उदाहरण झाले. असा अनेक ठिकाणी कांदळवनाचा नाश होत आहे. कधी विकासाच्या नावाखाली तर कधी काही वेगळ्या कारणाने आणि मुंबईच्या भविष्यासाठी हे भयंकर आहे.
पण सगळीच बातमी वाईट नाहीये, ऐरोली आणि विक्रोळी येथील कांदळवन सुंदरबन, भितरकणिका आणि आचरा यासारख्यांच्या यादीत सामील झाल्या आहेत. ‘मँग्रोव्ह सोसायटी ऑफ इंडिया’ (एमएसआय) नुसार त्यांची आता देशातील १२ अद्वितीय खारफुटीच्या जंगलांमध्ये गणना केली जाते. २००० हेक्टर क्षेत्र व्यापलेल्या, विक्रोळीच्या खारफुटीमध्ये १६ पेक्षा जास्त खारफुटीच्या प्रजाती, ८२ फुलपाखरांच्या प्रजाती, २०८ पक्ष्यांच्या प्रजाती, खेकड्याच्या १३ प्रजाती, कोळंबीच्या सात प्रजाती, माशांच्या २० प्रजाती आणि अनेक सस्तन प्राणी आहेत. ऐरोली कांदळवन १६९० हेक्टरमध्ये पसरलेली आहे आणि दरवर्षी 50 हजारांपेक्षा जास्त फ्लेमिंगो भेट देतात. कांदळवनाचा परिसर तटीय परिसंस्थेचा ‘कीस्टोन’ अर्थात अविभाज्य घटक आहे. कांदळवनाची झाडे गाळ आणि प्रदूषकांना अडकवतात, जे अन्यथा समुद्रात वाहून जातील. समुद्रीगवत,गाळ आणि चिखलासाठी आणखी एक अडथळा प्रदान करतात.
समुद्राच्या मजबूत लाटांपासून सीग्रास बेड आणि कांदळवन संरक्षण करते. खारफुटींशिवाय, ही अविश्वसनीय उत्पादक परिसंस्था कोलमडून पडेल. माती जागोजागी धरून, कांदळवनाची झाडे माती वाहून जाऊ देत नाहीत व किनारपट्टी स्थिर ठेवतात. वाळूच्या पट्ट्यांवर रुजलेली रोपे कालांतराने वाळूच्या पट्ट्या स्थिर ठेवण्यास मदत करतात आणि शेवटी लहान बेटे तयार करू शकतात. खारफुटीची झाडे, ज्यात भरती-ओहोटीच्या चिखलाच्या पट्टे असतात, ते एक ‘बफर-झोन’देखील प्रदान करतात जे वारा आणि लाटांच्या नुकसानापासून जमिनीचे संरक्षण करतात. ज्या ठिकाणी कोळंबी फार्मसाठी खारफुटीची तोड केली गेली आहे, ती ठिकाणे विनाशकारी चक्रीवादळ आणि भरतीच्या लाटांसाठी अधिक असुरक्षित झाली आहेत, असे अनेक उदाहरणांनी स्पष्ट झाले आहे. अशा या अत्यावश्यक क्षेत्राचे महत्त्व जाणून घेतल्यावर तुम्हालादेखील जाणवले असेल की, ही कांदळवनं किती महत्त्वाची आहेत. विशेषत: मुंबईसाठी. दि. २६ जुलै असो, अथवा वर्षानुवर्षे पावसात तुंबणारी मुंबई याचे मुख्य कारण कांदळवनांचा नाशच आहे, हे सिद्ध झालेले आहे. म्हणूनच समाज प्रबोधनच नाही, तर वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. बुडणार्या मुंबईला वाचवायचा हा शेवटचा आणि एकुलता एक मार्ग आहे. कांदळवनं वाचली, त्या क्षेत्राचे संवर्धन झाले आणि मुंबईच्या समुद्रकिनारपट्टी कांदळवनाने स्थिर झाली, तरच मुंबई बुडण्यापासून वाचेल.
- डॉ. मयूरेश जोशी