मुंबई : दादर सार्वजनिक वाचनालयातर्फे २ मे ते ११ जून य कालावधीसाठी लहान मुलांसाठी मोफत बालवाचनालय चालवण्यात येणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ य वेळेत हे वाचनालय सुरु असणार आहे. आजच्या टीव्ही - स्मार्टफोन्सच्या जगात लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणूनज दादर वाचनालयातर्फे गेली १७ वर्षे हा उपक्रम चालवला जातो. कवी, लेखक आणि मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माता दीपक शेडगे यांच्या हस्ते या वाचनालयाचे उदघाटन झाले. या उदघाटन प्रसंगी बोलत असताना त्यांनी काही काव्य वाचनाची प्रात्यक्षिके दाखवून मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन केले.
लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी असे उपक्रम जाणीवपूर्वक राबवले पाहिजेत असे मत याप्रसंगी दीपक शेडगे यांनी नोंदवले. सर्व वाचकांनी आपल्या मुलांना त्यांच्या मित्रमंडळींसोबत पाठवून या मोफत वाचनालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन दादर सार्वजनिक वाचनालयाच्या प्रमुख विश्वस्त आणि प्रमुख कार्यवाह शुभ कामथे आणि कार्यक्रम समिती कार्यवाह उल्का सहस्रबुद्धे यांनी केले.