व्यवस्था आणि यंत्रणा कशा वापराव्यात, याचे उत्तम उदाहरण सध्या महाराष्ट्रात सुरूच आहे. तर मुद्दा असा की, महिला आयोगासंदर्भात आता प्रसारमाध्यमात कोणतीही बातमी आली की, समजून जायचे भाजपच्या कोणत्या तरी नेत्याच्या कुठच्यातरी विधानावरून कारवाईचा बडगा उगारला जाणार. तसेही विद्या चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मोर्चा अध्यक्षा झाल्या. याच पक्षाच्या रूपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या. तेव्हाच आयोगाचे भविष्य कळून चुकले होते. महिला आयोगाकडे नक्की काय काम असते? तो आयोग सर्वसामान्य महिलांना न्याय देण्यासाठी कार्यवाही करतो की, केवळ राजकीय घटना घडली की ‘अॅक्शन मोड’मध्ये येतो? असा प्रश्न सर्वसाधारण जनतेला पडला आहे. खरेतर राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतच असतात. त्यांची विधाने त्या त्या वेळची प्रासंगिकच असतात. पण आता आयोग या विधानांवर काम करायला लागला आहे. महिला आयोग ज्या तत्परतेने नेतेमंडळीचे विषय हाताळते त्यावरून वाटते की, राज्यात घरगुती हिंसाचार, अपहरण, बलात्कार आणि इतर अनेक मार्गांनी महिलांचे शोषण थांबले असावे किंवा महिलांना आता कोणत्याच समस्या नसाव्यात, असे वाटते. सध्या भाजप महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकातदादा पाटील आणि सुप्रिया सुळेंचा विषय महिला आयोगाने त्यांच्या अखत्यारित घेतला आहे. अर्थात, आयोगाने त्यांचे काम करण्यास बंदी नाही. मात्र, महिलांसंदर्भात राज्यात गेले दोन वर्षे काय नाही घडले? पूजा-दिशा मृत्यू विसरून जाऊ, करूणा मुंडे प्रकरण विसरून जाऊ, कोरोना काळात कोरोना सेंटरमध्ये महिलांवर झालेले बलात्कार विसरून जाऊ, साकीनाक्याला अनुसूचित जातीच्या महिलेची झालेली क्रूर हत्या विसरून जाऊ, हे सगळे विसरण्यासारखे आहे. हे सगळे महिला आयोगाने दखल घ्यावीत, असे विषय नव्हते का? यात एक बाजू अशी आहे की, आपला तो बाब्या आणि दुसर्याचे कार्टे. सुप्रिया सुळे महिला म्हणून त्यांचा आदर करायलाच हवा. पण मग अमृता फडणवीस, कंगणा राणावत आणि केतकी चितळे या महिला नाहीत का? या महिलांनी असा काय गुन्हा केला की त्यांना सातत्याने अपमान आणि त्रासाला सामोरे जावे लागते? महिला आयोग यांच्यासाठी नाही का? पण काय करणार? विद्या चव्हाणांच्या सूनबाईंना जिथे न्याय मिळण्याची चिन्हे नाहीत, तिथे इतरांचे काय?
भावी स्वप्नाळू मुख्यमंत्री
मी छत्री असताना पावसात भिजणे आणि मांसाहार करून भगवंताच्या दारात जाणे, हे आमचे साहेबच जाणोत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मी पुढे चाललो. मी अगदी साहेबमय झालो. म्हणजे असं म्हणावं लागतं. खरेतर मी साहेबांपेक्षा पण ‘महा’हुशार आहे! काय म्हणता लबाड आहे? बरं! लबाड तर लबाड, पण या लबाडीमुळे तर ‘पॉवर’ आली. सगळी ‘पॉवर’ आपले ते ‘पवार’कृपा. आता मीसुद्धा हळूहळू त्यांच्यासारखं बोलतो, करतो. आता नुकतेच म्हणालो की, भाजपला फक्त एकाच समाजाची, धर्माची बलिदान दिसतात. मुस्लिमांचाही सन्मान व्हायला हवा. मग असे रोखठोक बोललो.
काय म्हणता, मी कोणत्या धर्माचा? मी सध्या ‘सेक्युलर’ आहे. देव, देश, अन् धर्मासाठी प्राण घेतले हाती वगैरे वगैरे लोकांचं काय सांगता? मुस्लिमांचा सन्मान करा. हो! मला हिंदू-मुस्लीम वगैरे तुलना केलीच पाहिजे. अशी तुलना करून मला माझ्या मुस्लीम बांधवांबाबत कळवळा स्नेह, करुणा, प्रेम अणि खूप काही दाखवायला हवे. तसे दाखवले नाही, तर साहेबांचे वारसदार मी कसे ठरणार? आणि आतली गोष्ट सांगू का? ‘कमळ’वाले पूर्वीपासून हिंदुत्व-हिंदुत्व, राम मंदिर वगैरे वगैरे करायचे. आता तर काय मोदी-शाह-योगी यांची नावे घेत देशभर हिंदू एक होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे देशात बाकीच्या राष्ट्रीय पक्षांना म्हणजे ‘हाता’ला जनतेने टाटा केले. म्हणून आता ‘हात’वाले, पण हळूहळू हिंदुत्वाचे भजन करू लागले. त्यांचं बघून आमचे प्रेरणास्थान ‘घड्याळ’वाले पण देव-मंदिरे भजू लागलेत.
मला वाटते की, आता मुस्लीम समाजाला आमच्याकडे खेचण्याची हीच ती वेळ. आता आमची स्पर्धा फक्त ओवेसींशी, म्हणून तर आम्ही औरंगाबाद, संभाजी नगरच्या झंझटीत पडत नाही. मुस्लीम मतदारांना जे जे आवडेल ते ते आवडून घेण्याचा माझा १०० टक्के यशस्वी प्रयत्न आहे. करावं लागतं साहेबांचा वारसा चालवायचा आहे. आतातरी सांगा बनेन ना मी मुख्यमंत्री? काय म्हणता, साहेबांच्या कन्या, सख्खे पुतणे, नातू कुठे जातील? मग मी काय करू? काय म्हणता, जसे माझे साहेब कायम भावी पंतप्रधानपदाचे स्वप्न बघतात, तसे मी कायम भावी मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बघू... भावी स्वप्नाळू मुख्यमंत्री??