लँड बॅक, टेम्पल बॅक!

    28-May-2022
Total Views | 73

america 
 
 
तेथील ‘रेड इंडियन्स`नी ‘लँड बॅक` मोहीम सुरू केली तसेच येथील प्राचीन सनातन धर्मीय लोकांना आपली तीर्थक्षेत्रे व मंदिरे पुन्हा आपल्या ताब्यात घ्यावीत, असे आता कुठे वाटू लागले आहे. आपल्या पूर्वजांच्या मालकीची तीर्थक्षेत्रे, त्यांनी कष्टाने बांधलेल्या भव्य मंदिरात पुनश्च आपल्या देवांची स्थापना करावी, हे वाटणे स्वाभाविक आहे. हेच स्वातंत्र्य आहे.
 
अमेरिकेतील प्राचीन संस्कृती
अमेरिका खंडात ‘एस्किमो`, ‘इनुईट`, ‘डकोटा`, ‘लकोटा`, ‘शिरोकी`, ‘टोल्टेक`, ‘मिसिसिपी`, ‘इनू`, ‘माया`, ‘अझ्टेक`, ‘इंका` इत्यादी अनेक सभ्यता प्राचीन काळापासून वसत होत्या. यातील बहुतेक सभ्यता शिकार करून उदरनिर्वाह करत. उष्ण प्रदेशात राहणाऱ्या सभ्यता मका, सोयाबीन, बटाटे इत्यादींची शेतीही करत असत. यातील काही संस्कृती खूप विकसित झाल्या होत्या. त्यांनी Teotihuacans सारखी दीड लाख वस्ती असलेली शहरेदेखील वसवली होती. मोठमोठी मंदिरे, पिरॅमिड्स उभी केले होते. त्यांची सिंचन व्यवस्था, अचूक दिनदर्शिका, धातुशास्त्रकला, पारंपरिक वैद्यकीय प्रणाली आणि लेखनकला प्रगत झाली होती.
या सर्व सभ्यतांना ‘रेड इंडियन` या नावाने संबोधले गेले. ते अनेक देवतांची पूजा करत. निसर्गाची पूजा करत. ऊन, वारा, पाऊस, नदी, भूमी ही त्यांची दैवते होती. हे लोक त्या त्या भागातील नैसर्गिक संपत्तीची देखभाल करत असत. त्यांचा असा विश्वास होता की, प्रत्येक मनुष्य, प्राणी, झाड, नदी, भूमी यामध्ये आत्मा आहे, एक दैवी शक्ती आहे. अशा काही पवित्र मानलेल्या क्षेत्रांची ते उपासना करीत असत.
 
 
 
ऑस्ट्रेलियातील प्राचीन संस्कृती
ऑस्ट्रेलियामध्येदेखील अनेक सभ्यता किमान 40 हजारो वर्षांपासून वास्तव्यास आहेत. हे लोक शिकार करत, काही प्रमाणात शेती आणि मत्स्यपालनही करत असत. वर्षावनांपासून ते रखरखीत वाळवंटापर्यंतच्या हवामानाशी त्यांनी स्वतःला यशस्वीपणे जुळवून घेतले होते. त्यांच्याकडे 200 हून अधिक बोलीभाषा व मौखिक परंपरेतून आलेला निसर्गाच्या ज्ञानाचा मोठा साठा होता. त्यांच्या क्षेत्रातील पाण्याची ठिकाणे, प्राणी, जीवजंतू, वनस्पती आणि हवामानाचे सखोल ज्ञान होते. या संस्कृतीला त्यांची भूमी, तेथील पाण्याचे साठे, तेथील झरे, नद्या, पर्वत, अरण्ये, वृक्ष सगळेच अत्यंत पूज्य व पवित्र होते.
 
 
 
वसाहतीकरण- प्राचीन संस्कृतींचा नाश
युरोपमधील दर्यावर्दींना 15व्या शतकात अमेरिकेचा आणि 17व्या शतकात ऑस्ट्रेलियाचा शोध लागला. त्यावर युरोपमधील
राजे, व्यापारी आणि मिशनरी तिथे पोहोचले. त्याबरोबर तिथे नांदणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींच्या नाशाचे पर्व सुरू झाले. त्यांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कत्तली झाल्या. त्यांच्याकडील जमिनी गेल्या, त्यांच्या भाषा नष्ट होऊ लागल्या, त्यांचे परंपरागत ज्ञान कमी होऊ लागले. त्यांच्या पारंपरिक नृत्यांवर, जत्रा-मेळ्यांवर, धार्मिक कार्यांवर बंदी आली. ज्या स्थानांना ते पूज्य व पवित्र मानत होते, ते त्यांच्या हातून निसटून गेले. 20व्या शतकातसुद्धा या लोकांचा छळ होत राहिला व त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत राहिली.
‘लँड बॅक` मोहीम 21व्या शतकात हे चित्र काही प्रमाणात बदलायला लागले. अमेरिका व कॅनडामधील ‘रेड इंडियन्स`नी ‘लँड बॅक` ही मोहीम सुरू केली. या मोहिमेद्वारे तेथील रेड इंडियन, त्यांच्या पूर्वजांच्या मालकीच्या जमिनी पुनश्च ताब्यात घेण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्या पूर्वजांनी पवित्र मानलेल्या क्षेत्रावर स्वत:चे नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. या मोहिमेला आता थोडे यश प्राप्त होऊ लागले आहे.
 
 
 
1. कॅनडामधील गोरे लोक इंडियन्सना इच्छापत्राद्वारे, ट्रस्टद्वारे जमिनी हस्तांतरित करत आहेत.
2. कॅलिफोर्नियामधील युरेका शहराने एक बेट वियोट समाजाला हस्तांतरित केले.
3. माशपी वम्पानोआग (Mashpee Wampanoag) समाजाला 2007 मध्ये मॅसच्युसेट्स राज्याने 300 एकर जमीन परत केली.
4. 2019 मध्ये ओहायोमधील मेथोडीस्ट चर्चने, वान्दोत्ते (Wyandotte Nation) समाजाला त्यांचा भूभाग हस्तांतरित केला.
5. मोन्टेना येथील 18 हजार, 800 एकरचे राष्ट्रीय उद्यान, CSKT या समाजाला परत केले आहे.
6. 2020 मध्ये एस्लीन समाजाने कॅलिफोर्नियामधील पूर्वजांची 1200 एकर जमीन विकत घेतली. या ठिकाणी ते आता सांस्कृतिक शिक्षण केंद्र उभे करणार आहेत.
7. 3.9 लाख एकरचे वर्षावन ऑस्ट्रेलियाच्या सरकारने तेथील प्राचीन मालकी असलेल्या ‘कुकू यलंजी` या समाजाला हस्तांतरित केले.
8. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडच्या शासनाने पण ‘दारूम्बल` समाजाला त्यांचे क्षेत्र परत केले.
अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या सरकारची, न्यायालयाची आणि तेथील सामान्य गोऱ्या लोकांची भावना अशी आहे - आमचे पूर्वज युरोपमधून इथे आले. त्यांनी येथील समाजाकडून त्यांची भूमी हडप केली. त्यांच्यावर अनेक अन्याय केले. आता चुका सुधारण्याची वेळ आली आहे. जो भूभाग तो समाज पवित्र मानतो, तीर्थक्षेत्र आहे, असे मानतो, तो आम्ही त्यांना हस्तांतरित केला पाहिजे. त्या भूमीशी या प्राचीन संस्कृतीचे ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध असल्याने आम्ही त्या त्यांच्याकडे सुपूर्द करत आहोत.
 
 
 
भारतातील हिंदू, जैन व बौद्ध मंदिरे
भारतातील सनातन धर्मीय लोक, अमेरिकेतील वा ऑस्ट्रेलियामधील सभ्यातांच्याप्रमाणे फार प्राचीन काळापासून येथे नांदत होते. हिंदू धर्मीयसुद्धा निसर्गाची पूजा करत होते. नदीचा उगम, नदीचा घाट, नद्यांचा संगम, वृक्ष, अरण्य, पर्वत, पर्वत शिखर आणि विविध क्षेत्र हे हिंदूंनी पवित्र मानले. प्रत्येक क्षेत्राचे, मंदिराचे स्वत:चे महात्म्य आणि पावित्र्य आहे. हिंदूंनी इतर निसर्गोपासक सभ्यातांप्रमाणे आपल्या प्रथा-परंपरांच्या माध्यमातून निसर्गाची काळजी वाहिली. या परंपरेवर पहिल्यांदा तुर्क व मुघलांच्या आक्रमणाने आघात केला आणि दुसऱ्यांदा युरोपियन आक्रमणाने त्यावर आघात केला. जे विनाशपर्व अमेरिकेतील व ऑस्ट्रेलियातील प्राचीन सभ्यातांनी सोसले, तेच संकट भारतातील हिंदू, जैन व बौद्धांना सोसावे लागले.
 
 
मुघल, तुर्की शासनाचा अंत झाला, युरोपियन वसाहतवादाचा अंत झाला. पण, तरीही त्या काळात खंडित झालेल्या परंपरा पुनश्च सुरू झाल्या नाहीत. त्या काळात पाडलेली मंदिरे, अतिक्रमण केलेली मंदिरे मुक्त झाली नाहीत. हिंदू मंदिरांवर लादलेले कर अजूनही चालू आहेत. जुनी मंदिरे जी इंग्रजांनी भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात दिलीत, ती तशीच आहेत. देवालयाचे रुपांतर म्युजियममध्ये झाले आहे. जे मंदिर होते, त्याचे स्मारक झाले आहे. तीर्थक्षेत्रात अतिक्रमण झाले आहे. याची बोचणे हिंदूंच्या अनेक पिढ्यांना आहे. जसे तेथील ‘रेड इंडियन्स`नी ‘लँड बॅक` मोहीम सुरू केली तसेच येथील प्राचीन सनातन धर्मीय लोकांना आपली तीर्थक्षेत्रे व मंदिरे पुन्हा आपल्या ताब्यात घ्यावीत, असे आता कुठे वाटू लागले आहे. आपल्या पूर्वजांच्या मालकीची तीर्थक्षेत्रे, त्यांनी कष्टाने बांधलेल्या भव्य मंदिरात पुनश्च आपल्या देवांची स्थापना करावी, हे वाटणे स्वाभाविक आहे. हेच स्वातंत्र्य आहे.
 
 
 
आता अमेरिका व ऑस्ट्रेलियातील शासन, न्यायव्यवस्था, सामान्य गोरे लोक मान्य करत आहेत की, त्यांच्या पूर्वजांनी अत्याचार केले होते. ते आता सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहेत. हेच शहाणपण भारतीय शासकांना आले, तर मंदिरे हिंदूंच्या ताब्यात येतील. तसेच, हे शहाणपण भारतातील जे लोक स्वत:ला मुघलांचे वंशज समजतात, त्यांनी दाखवणे आवश्यक आहे. जी पवित्र स्थाने, तीर्थक्षेत्रे, मंदिरे आदी मुघलांनी, तुर्कांनी बळकावली ती परत करणे आपले कर्तव्य आहे, असे वाटले पाहिजे. तसे केल्याने मागील अन्याय काही प्रमाणात दूर होईल, कडू आठवणींची शांती होईल, दोन्ही समाजात बंधुभाव पसरेल आणि गतकाळाच्या बंधनातून मुक्त होऊन पुढील प्रगतीची वाटचाल निष्कंटक होईल.
 
 
  
संदर्भ
1. Return of Indian Island - by Bob Doran and Gregg McVicar - 40 acres of land on Indian Island was returned from the city of Eureka to the Wiyot people. https://www.northcoastjournal.com/070104/cover0701.html
2. Indigenous people across the US want their land back –and the movement is gaining momentum - Harmeet Kaur. CNN. 26 Nov 2020.
3. United Methodist Church gives historic mission site and land back to Wyandotte Nation - IndianCountry Today, 26 Nov 2020
4. Montana's National Bison Range transferred to tribes - Rob Chaney - AP NEWS, 18 Jan 2021
5. Northern California Esselen tribe regains ancestral land after 250 years - The Guardian. 28 July 2020
6. A historic rainforest and other lands have been returned to Indigenous Australians - NPR 5 Oct 2021
7. Sacred land where 300 Indigenous -ustralians were massacred returned to Darumbal people - The Guardian, 21 -pr 2022
 
 
दीपाली पाटवदकर
98224 55650
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121