डॉमनिकची अटक आणि गोव्यातील धर्मांतरणाचे दाहक वास्तव

    28-May-2022   
Total Views | 424
goa 
 
 

बेकायदेशीर धर्मांतरण, दुसऱ्या धर्माचा विद्वेष करणे आणि पसरवणे या गुन्ह्यांसाठी गोव्यातील म्हापसा पोलिसांनी दि. २६ मे रोजी उत्तर गोव्याच्या सड्ये शिवोली येथील फोर्थ पीलर चर्चच्या डॉमनिक डिसोझा आणि त्याची पत्नी जोऑन मास्कारेन्हास यांना अटक केली. या प्रकरणामुळे गोव्यातील ख्रिस्ती धर्मांतरणाचा एक काळा चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला आहे. त्यानिमित्ताने हे नेमके प्रकरण काय आहे आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने एकूणच या सगळ्याचा कसा पर्दाफाश करण्यात आला, त्याचे शब्दबद्ध केलेले हे वास्तव...
 

 
धार्मिक विद्वेष आणि धर्मांतराच्या उन्मादात कशाप्रकारे अधार्मिक शक्ती प्रस्थापित होतात आणि भोळ्याभाबड्या हिंदूंची कशी प्रतारणा होते, याचे डॉमनिक हे एक भयंकर उदाहरण. प्रत्येक हिंदूंनी समजून घ्यायलाच हवे, असे हे कठोर सत्य!
“माझी कुलदेवता शर्वाणीदेवी आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे. त्यांना माता जगदंबेने आशीर्वाद दिला. माता भवानीने अधर्मीयांशी लढायला ताकद दिली. तीच जगदंबा, तीच माता भवानी म्हणजे माझी कुलदैवता शर्वाणीदेवी. ती मला अधर्माशी लढायला शक्ती देईल,” असा विचार करून तो तरुण एका बलाढ्य शक्तीशी लढायला सिद्ध झाला. या तरुणाची म्हणजे अंकित साळगांवकरची आठवण येण्याचे कारण म्हणजे म्हापसा पोलिसांनी दि. २६ मे रोजी उत्तर गोव्याच्या सड्ये शिवोली येथील फोर्थ पीलर चर्चच्या डॉमनिक डिसोझा आणि जोऑन मास्कारेन्हास हिला अटक केली.
 
 
 
बेकायदेशीर धर्मांतरण आणि दुसऱ्या धर्माचा विद्वेष करणे आणि पसरवणे या गुन्ह्यांसाठी या डॉमनिकला आणि जोऑनला अटक झाली. पोलिसांनी त्यांच्यावर ‘कलम १५३ अ,` (धर्मावर आक्षेपार्ह किंवा हल्ले करणे), ‘२९५ अ` (धार्मिक भावना भडकावणे) तसेच, ‘औषधे आणि उपाय कायदा १९५४`च्या ‘कलम ३` आणि ‘४` (आक्षेपार्ह जाहिराती) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश खोबरेकर नाव्याच्या व्यक्तीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, डिसोझा आणि जोऑनने एका अज्ञात व्यक्तीला त्याचा धर्म सोडून धर्मांतर करण्यास प्रवृत्त केलं होतं. याशिवाय आरोपींनी जाणूनबुजून शब्द, कृतीतून धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने धमकावलं आणि त्यांनी सांगितलेला धर्म स्वीकारण्याचं आमिष दाखवल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. गोव्यात मागील अनेक वर्षांपासून डॉमनिक आणि जोऑन बेकायदेशीररित्या धर्मांतरण घडवून आणतात. पैसे, औषधं आणि चांगलं खाणं-पिणं याचं आमिष दाखवून गरीब नागरिकांना धर्मपरिवर्तनाची फूस लावली जाते. म्हणूनच दोघांविरोधात याआधी अशाप्रकारचे आठ गुन्हेही दाखल आहेत.
 
 
 
ठरल्याप्रमाणे काही लोकांची कोल्हेकुई सुरू झाली की, गोवा हा शांत प्रदेश आहे. ख्रिस्तीधर्मीय गुण्यागोविंदाने तिथे नांदतात. डॉमनिकला अटक झाली यात नक्कीच धार्मिक विद्वेष आहे वगैरे वगैरे किंवा हिंदुत्वाचा ‘अजेंडा` आहे वगैरे वगैरे... तर या सगळ्यांच्या माहितीसाठी डॉमनिकच्या धार्मिकतेआडची अधार्मिकता उघड करणे भागच आहे. त्यासाठीच अंकित साळगांवकर या तरुणाची आठवण झाली.
 
 
 
२0११-२0१२. अंकितच्या ओळखीची एक व्यक्ती आजारी होती. तेव्हा गोव्यामध्ये एक खासगी चॅनेल चालायचे. त्यामधून फोर्थ पीलर चर्चच्या डॉमनिक डिसोझाच्या येशूमय चमत्काराचा महिमा वर्णिला जायचा. आपल्या परिचित व्यक्तीचा आजारही इथे बरा होईल म्हणून अंकित त्या परिचितासोबत फोर्थ पीलर चर्चच्या डॉमनिक डिसोझाकडे गेले. यथावकाश नोंदणी वगैरे केल्यानंतर सर्वप्रथम तिथे येशूची प्रार्थना झाली. त्यानंतर डॉमनिकने सगळ्यांना रांगेत उभे करून डोळे बंद करायला सांगितले. तो प्रत्येक रुग्णाला किंवा तत्सम त्रास असणाऱ्या व्यक्तीस स्पर्श करेल. जो व्यक्ती डॉमनिकच्या स्पर्शाने खाली पडेल त्यावर येशूची कृपा झाली, जिझूचा (‘येशू`ला तो ‘जिझू` म्हणे) आशीर्वाद त्याला प्राप्त झाला, असे त्याने सांगितले. पण, अंकितसोबत आलेली परिचित व्यक्ती मात्र डॉमनिकच्या स्पर्शाने पडली नाही. डॉमनिकने तर सांगितलेले की, जी व्यक्ती त्याच्या स्पर्शाने पडणार नाही, त्याच्यावर येशूची कृपा झाली नाही, असे समजायचे. त्यामुळे ज्या व्यक्ती पडल्या नाहीत, त्यांच्यात चुळबुळ सुरू झाली. आपण असे काय पाप केले की,येशूची कृपा झाली नाही, असे त्यांना वाटू लागले. अंकित हे सगळे पाहत होते. त्यावेळी सगळ्यांना ‘बायबल`चे पुस्तक वाटण्यात आले. किंमत फक्त सहा रुपये. अंकितच्या परिचित व्यक्तीने सांगितले की, “अरे मला तर काही वाटले नाही, ही तर फसवणूक वाटते.” तरीसुद्धा डॉमनिककडे इतके लोक जातात म्हणजे नक्कीच काहीतरी शक्ती त्याच्याकडे असेल, असा विचार करून अंकित आणि त्याचे परिचित तिथे जात राहिले. पण, परिचित व्यक्तीमध्ये काही फरक पडला नाही.
 
 
 
अंकितनेयाबाबत डॉमनिकला विचारणा केली असता तो म्हणाला, ”तुझ्या घरात सैतानाला पुजतोस, सैतानाला देव मानतोस, आधी फेकून दे ते! घरासमोर तुळशी वृंदावन आहे. उखडून टाक ते! त्याशिवाय जिझू तुझ्या घरात येणार नाही. तुला बरं व्हायचे असेल, तर तुझ्यासारख्याच आजारी लोकांना सांग की, तुझ्यावर जिझूची कृपा झाली आणि तू बरा झालास. जोपर्यंत तू असे लोकांना सांगत नाहीस तोपर्यंत तुझ्यात ‘पॉझिटिव्हिटी` येणार नाही.” आता मात्र अंकित आणि परिचित यांना खात्रीच पटली की, डॉमनिककडे येणारे आजारी लोक बरे होत नाहीत. ‘जोपर्यंत इतरांना तुम्ही बरे झालात असे सांगत नाही, तोपर्यंत तुम्ही बरे होणार नाहीत,` असे डॉमनिक भोळ्याभाबड्या लोकांना सांगतो, म्हणून लोकही ‘आजारातून बरे झालो` असे खोटेच सांगतात. आपण बरे होण्यासाठी येशू आपल्या घरी यायला हवा, त्यासाठी घरातील परंपरागत पुजलेले देव, तुळस काढून फेकले पाहिजेत, असेही त्यांच्या मनावर बिंबवले गेल्यामुळे लोक सर्रास तसे करत.



कधी ना कधी जिझू घरात येईलच, असा त्यांना आशावाद दिला जाई. त्या आशेवर लोक वर्षानुवर्र्षे डॉमनिककडे जायचे. एक पिढी संपून दुसरी पिढी जायची. घरात तोपर्यंत ख्रिस्ती बिलीव्हर पंथाचे वर्चस्व झालेले असायचे. हा सगळा विचार करून अंकित आणि परिचिताने डॉमनिककडे जाणे सोडून दिले. मात्र, काही दिवसाने डॉमनिकने अंकितशी संपर्क साधला. “काय झाले? कृपा प्राप्त करायला का येत नाही?” असे विचारले. अंकितने नकार दिल्यावर डॉमनिकचे म्हणणे होते की, “आमच्या विरोधात काहीही नकारात्मक बोललास, तर परिणाम चांगले होणार नाहीत. तोंड गप्प ठेवायचे.” हा मात्र अंकितसाठी धक्काच होता. कारण, तो डॉमनिकच्या मुळी विरोधात गेलाच नव्हता. डॉमनिकच्या या विधानाचा अर्थ लावत असताना त्याने परिसरातील आणखी माहिती मिळवली.
 
 
 
तेव्हा त्याला कळले की, डॉमनिक अशा प्रकारे धर्मांतरच करतो. भोळ्याभाबड्या लोकांची प्रतारणा करतो. फसवणुकीतून मोठ्या प्रमाणात धर्मांतर होते. मात्र, त्याच्याकडे गेलेल्या खूप कमी जणांना याबद्दल माहिती होते. माहिती झाल्यावरही लोक ‘आपल्याला काय करायचे?` म्हणून गप्प बसतात किंवा गोव्यातल्या त्याच्या वर्चस्वाला दबून शांत राहतात. मात्र, अंकित यांनी डॉमनिकच्या फसवणुकीसंदर्भात २0१५च्या आसपास फेसबुकवर पोस्ट टाकायला सुरुवात केली. त्यानंतर डॉमनिक आणि त्याच्या काही समर्थकांकडून १00 पेक्षा जास्त पोलीस केस अंकितवर दाखल झाल्या. म्हापसामध्ये तर त्याला धमकी मिळाली. काही गुंडांनी शिवीगाळ करत मारण्याचा प्रयत्नही केला. अंकितने याबद्दल म्हापसा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. अंकितवर आता नव्याने एक पोलीस केस झाली. ती म्हणजे अंकितने डॉमनिकची पत्नी जोऑन हिचा विनयभंग केला. तिला अश्लिल खाणाखुणा केल्या. यासाठी अंकिततला तुरूंगवासही झाला. मात्र, अंकितने यापैकी काहीही केलेले नव्हते. सत्य गोव्यातल्या जनतेला माहिती होते. त्यामुळे गोव्यातल्या सगळ्याच हिंदुत्ववादी संघटना सरसावल्या आणि त्यांनी अंकित यांच्या तुरूंगातून सुटकेसाठी प्रयत्न केले. अंकित हे सध्या जामिनावर बाहेर आहेत.



पण, डॉमनिकच्या अधर्मीय कारवायांबाबत फेसबुकवर माहिती दिली म्हणून अंकित यांच्यावरील अन्याय अजूनही संपलेला नव्हता. अंकित हे शापोरा अंजुना गावचे रहिवासी. अंजुना चौपाटीला लागूनच त्यांचे वंशपरंपरागत घर आणि किराणा मालाचे दुकान. काही दिवसांतच अंकित यांना प्रशासनाच्या विविध विभागांकडून नोटीस आली की, `अंकित यांच्या दुकान आणि घरासंदर्भात त्यांच्याकडे अनेक तक्रारी आहेत. ते दुकान बेकायदेशीर आहे. ते तोडा.` अर्थात, या तक्रारीतही काही तथ्य नव्हतेच. कारण, साळगांवकर कुटुंब न जाणे किती पिढ्या तिथे राहत होते. दुकानाची जागा, दुकान त्यांचेच होते. या तक्रारीबद्दल माहिती मिळताच गोव्यातल्या हिंदुत्ववादी संघटना आणि सामान्य नागरिकही अंकित यांच्या समर्थनार्थ उभे राहिले आणि म्हणूनच अंकित यांचे घर आणि दुकानही कारवाईपासून बचावले.
 
 
 
मात्र, आता परिसरात डॉमनिकचे कुकृत्य आणि कपटनीती सगळ्यांनाच समजू लागली. यातच डॉमनिक त्याच्या चर्चवर भोंगेही लावायचा. त्यातून मोठ्या आवाजात प्रार्थना आणि प्रवचनही करायचा. शांत आणि सुशेगात गोव्यामध्ये हे सगळे म्हणजे जरा अतीच होते. गोव्यात कॅथलिक ख्रिस्ती धर्म तसा वजन ठेवून आहे. डॉमनिक हा ख्रिस्ती धर्मातील ‘बिलिव्हर` पंथाचा. तो काही ‘रोमन कॅथलिक` नाही. गोव्यात ‘रोमन कॅथलिक` आणि ‘बिलिव्हर` ख्रिस्ती पंथाचे चर्चही वेगळेच आहेत. गोव्यातच कशाला, आपल्या महाराष्ट्रात पाहिले तरीही ही बाब ठळकपणे जाणवते, तर डॉमनिकच्या ‘बिलिव्हर` ख्रिस्ती पंथामध्ये मोठ्या संख्येने हिंदू समाज जाऊ लागला. उत्तर गोव्यात ‘बिलिव्हर` ख्रिस्ती पंथाचे प्रस्थ वाढू लागले. आर्थिक आणि राजकीय वजनही वाढू लागले. यामुळे कॅथलिक चर्चही डॉमनिक विरोधात उभा राहिला. कॅथलिक चर्चने भूमिका घेतली की, `डॉमनिक धार्मिक विद्वेष पसरवतो. देवदेवतांच्या मूर्तींवर नाचतो. हे सगळे चूक आहे. तसेच, चर्चमध्ये भोंगे लावतो हेसुद्धा न्याय्य नाही.`
 
 
 
यादरम्यान एक घटना अशीही घडली की, डॉमनिककडे एक व्यक्ती आली. डॉमनिकने त्याला स्पर्श केला. डॉमनिकने आधीच सांगितलेले असते की, त्याने स्पर्श केल्यावर व्यक्ती पडली तरच त्याच्यावर येशूची कृपा आहे, असे समजते, तर डॉमनिकच्या स्पर्शाने ती व्यक्ती पडली, पण पुन्हा उठलीच नाही. डोक्याला मार लागून बेशुद्ध होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी याबद्दल पोलिसांमध्ये तक्रारही नोंदवली. पण, काय झाले माहिती नाही, डॉमनिकच्या केसालाही धक्का लागला नाही. मात्र, त्यांनतर डॉमनिकच्या विरोधात तक्रारी सुरू झाल्या.
 
 
 
या काळात अंकित स्वतःच्या कुटुंबात आणि दैनंदिन कामांमध्ये व्यस्त होते. आपल्या महाराष्ट्रासाठी विशेष बातमी की, अंकित यांना दि. २१ डिसेंबर, २0२0 रोजी पुणे वानवडी पोलीस स्टेशनमधून समन्स आले. त्यात लिहिले होते की, शांतीनगर, वानवडी पुणे येथे राहणाऱ्या डॉमनिक डिसेाझा यांच्या तक्रारीनुसार तुम्हाला पुण्याला वानवडी पोलीस स्टेशनमध्ये येऊन जबाब नोंदवावा लागेल. नाही आलात, तर तुमच्यावर रितसर कारवाई केली जाईल. अंकित यांच्यासाठी हा धक्काच होता. कारण, एक तर अंकित आणि डॉमनिक दोघेही गोव्यातले. डॉमनिक पुण्याच्या वानवडीचा रहिवासी कसा काय? आणि वानवडी पोलिसांनी तातडीने जबाब नोंदवायला बोलवले? २0२0 साली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होतेच. कोरोना आपत्ती आणि इतरही काही गंभीर घटना महाराष्ट्रात घडल्या होत्या. त्यामुळे अंकित यांनी या समन्सला कायदेशीर उत्तर दिलेच.
 
 
 
आता इथे महाराष्ट्राची नागरिक म्हणून माझ्यासाठी ही बाब धक्कादायक आहे की, डॉमनिकने अंकित यांना पोलिसी कारवाईत गुंतवण्यासाठी महाराष्ट्रच का निवडला? पुण्यात अंकित यांच्याविरोधात तक्रार नोंदवायला त्याला खरेच इतके सोपे गेले? विचार करण्यासारखे आहे, तर या सगळ्यावरून डॉमनिक म्हणजे काय आणि तो काय करतो आणि काय करू शकतो? याचा अंदाज सगळ्यांना आलाच असेल.
 
 
 
डॉमनिकच्या फेसबुक पेजवर गेलात, तर तिथे अनेक लोक दिसतील जे ‘त्याची आणि येशूची कृपा झाली म्हणून आम्ही कर्करोगावर मात करू शकलो किंवा आम्हाला बेबीबॉय झाला,` असे सांगताना दिसतात. पण, डॉमनिकला जेव्हा पोलिसांनी अटक केली तेव्हा आपण आजारी आहोत, असे त्याने सांगितले आणि दवाखान्यातही गेला. गोवा काय, महाराष्ट्र काय, नव्हे, आपल्या देशातली जनता कधी जागृत होणार आहे? आणखी किती क्रुसेड आणि जिहादचे बळी गेल्यावर भारतीय मानस शुद्धीवर येणार आहे? तुर्तास डॉमनिकच्या अटकेबद्दल गोव्यातील हिंदूंनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या आनंदात आपणही सामील होऊ.
 
 
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार
 
गोवेकरांना माहिती आहे की, डॉमनिक काय प्रस्थ आहे ते! काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमादरम्यान राज्यात बेकायदेशीर धर्मपरिवर्तन होत असल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. आज डॉमनिक आणि त्याची सहकारी जोऑन हिला अटक झाली. गोवा पोलिसांना कारवाई करण्याची कायदेशीर मुक्तता दिल्याबद्दल आमच्या गोव्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मी आभार व्यक्त करतो.


अंकित साळगांवकर






 
 
 
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121