आत्मचरित्र लिहिताना एका उंच इमारतीवरून दोरीवर चालण्याचा जो कसरतीचा खेळ असतो तशीच काहीशी अवस्था लेखकाचीही असते. आपल्याबद्दल जसे आहे तसे पारदर्शी लिहिणे फार कमी जणांनाच जमते. पण, या कसरतीला माधव जोशी यांचे ‘माझी कॉर्पोरेट दिंडी` हे पुस्तक अपवाद ठरावे. स्वतःबद्दल कुठलीही अवास्तव कल्पना न ठेवता, जोशी यांनी आपल्या कॉर्पोरेट जगतातील प्रवासाचे सुयोग्य चित्रण या पुस्तकात केले आहे. कोकणातील पालगडसारख्या खेडेगावातून माधव जोशींच्या प्रवासाला सुरुवात होते. साने गुरुजींचे गाव म्हणून सुपरिचित असलेल्या पालगड येथे एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेल्या, गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण घेतलेल्या माधव यांचा जीवनप्रवास अनेकविध रंगांनी भरलेला आहे. आपण गावात वाढलो तरी आपल्या मुलांना गावातच राहायला लागू नये, अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा असल्याने माधव यांना मुंबईला पुढील शिक्षणासाठी पाठवले आणि इथूनच माधव यांच्या आयुष्याला वेगळे वळण लागले.
मग त्यांच्या ‘कॉर्पोरेट` कंपनीतील प्रवासाला कशी सुरुवात झाली, पहिल्या कंपनीतील कामाचा अनुभव, तिथे त्यांच्या वरिष्ठांचे अनुभव, पुढे कशी प्रगती करत करत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम केले, असे अनुभवचित्रण या पुस्तकात पुढे वाचायला मिळते. या अनुभवकथनाचे वैशिष्ट्य म्हणजे यात आपल्याला भेटणारी माणसे त्यांच्या खऱ्या स्वरूपात भेटतात, कुठलाही मुलामा लावून नाही. हे या पुस्तकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. म्हणूनच या पुस्तकाच्या मांडणीतील खरेपणा सातत्याने समोर येत राहतो. माधव जोशी यांचा ‘कॅडबरी` कंपनीपासून सुरू झालेला प्रवास, ‘टाटा टेलिकम्युनिकेशन्स`पर्यंत येतो, तो अनेक माणसांनी समृद्ध झालेल्या मार्गाने. यामधल्या एकदम ‘ऑर्थोडॉक्स` ब्रिटिश गृहस्थ पीटर विंडसर यांची कथा तर एकदम मजेशीर आहे. असेच एन. के. पटेल यांच्या बरोबरचे माधव जोशी यांचे अनुभवही तितकेच वाचनीय आहेत. या सर्व अनुभवांमधून माधव स्वतः कसे शिकत गेले किंवा या माणसांनी माधव यांना कसे समृद्ध केले, हा अनुभव एकदम आपल्यालाही अक्षरश: भारावून टाकतो.
भारतातील ‘कॉर्पोरेट` जगताचा 1991 आधीच आणि या वर्षी झालेल्या आर्थिक सुधारणानंतरच्या अशा दोन्ही कालखंडाचा प्रवास आपल्याला या पुस्तकातून घडतो. भारताच्या राजकारणाला, समाजकारणाला वेगळे वळण देणारी, अनेक माणसे आपल्याला या पुस्तकात भेटतात. काही उदाहरणे द्यायचीच झालं तर पी. चिदंबरम, सोमनाथ चॅटर्जी, रतन टाटा, जेआरडी टाटा, रतन टाटा यांसारख्या अनेक व्यक्ती आपल्याला या पुस्तकातून भेटतात. या पुस्तकातून माधव यांच्या बरोबरीने बदलत्या भारताचे दर्शनही घडत जाते. सुधारणपूर्व काळापासून ते आतापर्यंत आपल्या उद्योगक्षेत्रात कसे बदल होत गेले, तंत्रज्ञान युगाकडे आपण कसे वळलो, मोबाईल क्रांतीकडे भारत कसा आला, या संपूर्ण स्थित्यंतराचे शिल्पकार कोण? हा पूर्व प्रवासच मुळातून वाचण्यासारखा आहे. कारण, हे आपल्या त्या प्रवासाचे ‘डॉक्युमेन्टेशन` आहे, जे आपण अभ्यासणे गरजेचे आहे.
‘कॉर्पोरेट` जगतात काम करणे, फक्त काम न करता यशस्वी होऊन दाखवणे हे खूप अवघड काम असते. तरीही एका छोट्या खेडेगावातून येऊन संपूर्णपणे स्वकर्तृत्वावर अनेक कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करणे हे माधव जोशींनी कसे शक्य केले, हे आजच्या युगातील तरुणांनी खरंच त्यांच्या अनुभवांतून शिकण्यासारखे आहे. उच्च पदांवर काम करताना बरेचदा माणसे त्या तारांकित वलयाला भुलून काहीशी वेगळीच वागायला लागतात. पण, या पुस्तकात अशी असंख्य उदाहरणे मिळतील की, ज्यातून माधव जोशी यांनी आपल्यातले साधेपण लीलया जपले आहे. स्वतःबरोबर काम करणाऱ्या माणसांना सोबत घेऊन कसे जायचे, हे या पुस्तकातून शिकायला मिळते.
या पुस्तकातील काही प्रसंग खूप महत्त्वाचे आहेत. कारण, ते भारताच्या इतिहासाशी, औद्योगिक इतिहासाशी निगडित आहेत. पहिला प्रसंग म्हणजे पोखरणची अणुचाचणी आणि त्याचे भारतावर, भारतीय उद्योगजगतावर झालेले परिणाम. हे या पुस्तकातील एक महत्त्वाचे प्रकरण म्हणावे लागेल. कारण, याच गोष्टींमुळे भारतावर आर्थिक निर्बंध लादण्यात आले होते. पण, उद्योगक्षेत्र कसे भारत सरकारच्या मागे, सरकारच्या निर्णयांमागे ठाम उभे राहिले, ही गोष्ट पुस्तक वाचताना प्रकर्षाने जाणवते.
या पुढचे प्रकरण आहे ते भारत टेलिकॉम क्रांतीकडे कसा गेला, टेलिफोनच्या युगाकडून छोट्या मोबाईलच्या युगाकडे भारत कसा वळला, ‘2 जी स्पेक्ट्रम` प्रकरण ही सगळी प्रकरणे खूप महत्त्वाची आहेत. कारण, ती भारताच्या उद्योगक्षेत्राची कथा उलगडून दाखवतात.
फक्त भारताचा उद्यमप्रवास कथन करुन हे पुस्तक थांबत नाही, तर भविष्याचीही चर्चा या पुस्तकात केलेली दिसून येते. आपल्या देशासमोरील विविध आव्हाने, तंत्रज्ञान क्षेत्रात होणारे बदल या सर्व गोष्टींशी जुळवून घेताना आपण काय करायला हवे, या सर्व गोष्टींचा उहापोह या पुस्तकात लेखकाने केला आहे. आपल्या समोरच्या आव्हानांबरोबरच या क्षेत्रात येणाऱ्या युवकांनाही हे पुस्तक मार्गदर्शन करते. एका प्रचंड अनुभवाची शिदोरी असलेल्या व्यक्तीकडून इतके कोणलाही आवडेल, रुचेल, अशा पद्धतीने ‘कॉर्पोरेट` जगताच्या प्रत्येक पैलूवर केलेले मार्गदर्शनपर भाष्य हेच या पुस्तकाचे खरे गमक आहे.
या सगळ्या आव्हानांनी भारलेल्या प्रवासातही आपल्या कुटुंबाकडे माधव जोशी यांनी दुर्लक्ष केले नाही. आपल्या गावच्या गणपतीवर असलेली अतूट श्रद्धा, एकत्र कुटुंबात बालपण गेल्याने इतर कुटुंबीयांबरोबरचे जिव्हाळ्याचे संबंध, आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्ती या सर्वांशी माधव यांचे किती आपुलकीचे संबंध आहेत, तेही या पुस्तकात अगदी सुंदर पद्धतीने शब्दांकित करण्यात आले आहे. त्यांचे चालक म्हणून काम करणारे सुभाष कोकाटे यांच्याबरोबरचे त्यांचे हृद्य नाते खरंच आपल्यालाही हेलावून टाकते. त्यांच्या पत्नीचे सुरेखा यांचेही माधव जोशी यांच्या आयुष्यात किती बहुमूल्य योगदान आहे, हे या पुस्तकात त्यांनी सुंदर रेखाटले आहे. त्यांच्या पत्नीने केवळ माधव यांना साथच दिली नाही, तर त्याही पुढे जाऊन स्वतःची एक वेगळी ओळखही प्रस्थापित केली. सामाजिक कार्यात अग्रेसर राहून त्यांनी घरातल्या आणि बाहेरच्या सर्व जबाबदाऱ्या अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळल्या आणि हाच माधव यांच्या या यशस्वी प्रवासातील एक मैलाचा दगड म्हणावा लागेल.
पुस्तकाचे नाव : माझी कॉर्पोरेट दिंडी
लेखक : माधव जोशी
प्रकाशन : ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठसंख्या : 256
मूल्य : 300 रुपये
हर्षद वैद्य