नवी दिल्ली : देशातील प्रमुख मुस्लिम संघटना जमियत-उलेमा-ए-हिंदने देशातील कथित वाढत्या जातीयदावादावर चिंता व्यक्त केली आहे. अल्पसंख्याकांच्या विरोधात वैरभाव पसरविण्याचा प्रयत्न होत असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकाने देशातील बहुसंख्य समुदायाच्या मनात अल्पसंख्यांकांविषयी विष कालविल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
जमियतचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी सभेत लोकांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, मुस्लिमांना देशात जगणे कठीण झाले आहे. आम्हाला आमच्याच देशात परके बनवण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याद्वारे जे काही करण्यात येत आहे, त्याकडे मुस्लिम समाजाने दुर्लक्ष करावे. ‘छद्म - राष्ट्रवादा’ च्या नावाखाली राष्ट्राची एकात्मता मोडीत काढली जात आहे, जी केवळ मुस्लिमांसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अत्यंत धोकादायक आहे. आदर मिळत नसला तरीही गप्प राहणे मुस्लिमांकडून शिकले पाहिजे. आम्ही त्रास सहन करू पण देशाचे नाव खराब होऊ देणार नाही. जमियत उलेमाने शांतता कायम राखण्यासाठा आणि वेदना, द्वेष सहन करण्याचा निर्णय घेतला आहे. ती आमची कमजोरी नाही, तर ती आमची ताकद आहे, असेही मदनी यांनी नमूद केले.