बंगळुरू : ज्ञानवापी मशीद, शाही ईदगाह मशीद व अन्य मशीद-दर्गे मंदिरे पाडून बांधल्याचे प्रकरण न्यायालयात गेलेले असतानाच देशातील ३६ हजार मंदिरे पाडण्यात आली आणि त्यावर मशिदी बांधण्यात आल्या, असे विधान कर्नाटक भाजपचे आमदार के. एस. ईश्वराप्पा यांनी केले आहे. आ. के. एस. ईश्वराप्पा म्हणाले की, “देशातील ३६ हजार मंदिरे उद्ध्वस्त करून मशिदी बांधण्यात आल्या आहेत. आता मंदिर उभारणीसाठी कायदेशीर लढाई लढली जाणार. मशिदी इतरत्र बांधण्यास सांगितले जाईल आणि नमाज अदा करण्यास परवानगी दिली जाईल. परंतु, ते मंदिराऐवजी मशीद बांधू देऊ शकत नाहीत. सर्व ३६ हजार मंदिरे कायदेशीररित्या ताब्यात घेतली जातील. दरम्यान, मंड्या प्रशासनाला यासंबंधीचे एक निवेदन देण्यात आले आहे.
मशिदीत पूजा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. तसेच जामिया मशीद हनुमान मंदिर तोडून त्यावर उभारण्यात आली आहे. तेथे आजही हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आहेत, असा आरोपही करण्यात येत आहे. जामिया मशिदीला ‘मस्जिद-ए-आला’ अशा नावानेही ओळखले जाते. ही १७८६-१७८७ ला बांधण्यात आली होती, ज्याला दोन ‘टॉवर’ आहेत. जे एका चबुतर्यावर बनविण्यात आले आहेत. टॉवरला प्रत्येक मजल्यावर एक बाल्कनी आहे. इतर मशिदींप्रमाणे या मशिदीला घुमट नाही.