नवी दिल्ली : तेलंगणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना घराणेशाहीच्या पक्षांवर जोरदार हल्ला चढविला. तेलंगणमधील ‘केसीआर’ सरकार हे भ्रष्टाचारात बुडलेले असून आता राज्यात भाजप परिवर्तन घडविणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
“घराणेशाहीवर चालणारे पक्ष फक्त स्वतःच्या विकासाचा विचार करतात. या पक्षांना गरीब लोकांची पर्वा नाही. त्यांचे राजकारण म्हणजे एकाच कुटुंबाने सत्तेत कसे राहून, जमेल तितकी लुबाडणूक कशी करता येईल, यावर केंद्रित असते. अशा घराणेशाहीवर चालणार्या पक्षांमुळे देशाच्या विकासावर विपरित परिणाम होतो. त्याचप्रमाणे अशा पक्षांचा लोकशाहीलाही मोठा धोका असतो. ‘केसीआर’ सरकार अंधश्रद्धाळू तसेच, भ्रष्टाचारात गुंतले आहे,” असेही पंतप्रधान म्हणाले. तेलंगणची जनता आता भ्रष्टाचाराला कंटाळली असून तेलंगणमध्ये भाजप परिवर्तन घडविणार आहे,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.