डोंबिवली : ‘एमएमआर’ क्षेत्रातील कडोंमपासह उल्हासनगर, ठाणे पालिका आणि अंबरनाथ, बदलापूर या नगरपरिषदेत शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप मनसेचे आ. राजू पाटील यांनी गुरूवारी केला. डोंबिवली ‘एमआयडीसी’ भागातील ‘विभा’ कंपनीच्या जागेवर कडोंमपाकडून उभारण्यात आलेल्या ‘कोविड सेंटर’बाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आ. राजू पाटील यांनी हा आरोप केला आहे.
‘कोविड’ काळात इंजेक्शन, ऑक्सिजन यांसह अनेक कंत्राटामध्ये शेकडो कोटींचा घोटाळा झाला असून, याचा जाब संबंधितांना विचारणार असल्याचे आ. पाटील म्हणाले. तसेच, ‘कोविड’ काळात तात्पुरत्या आरोग्य सुविधांवर खर्च करण्याऐवजी तो कडोंमपाच्या रुक्मीणीबाई किंवा शास्त्रीनगर रुग्णालयावर केला असता, तर कायमस्वरूपी आरोग्य सुविधा मिळाल्या असत्या. मात्र, तसे झाले नाही. उलट, शास्त्रीनगर रुग्णालयातील लिफ्ट बांधण्यातही घोटाळा झाल्याचा आरोप आ. पाटील यांनी केला आहे.