धनदांडग्यांसाठी निसर्गरम्य येऊरचे ‘लचके’

वनविभाग आणि ठाणे महापालिकेकडून येऊरमध्ये बांधकामांना परवानगी

    27-May-2022   
Total Views | 51

yeoor
 
 
ठाणे : पर्यावरण वाचवण्याच्या वल्गना करणार्‍या राज्य सरकारला ठाण्यातील येऊरमध्ये पर्यावरणाचे लचके तोडले जात असल्याची बाब दिसेनाशी झाली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या या निसर्गरम्य येऊरचा समावेश ठाणे मनपामध्ये झाल्याने या भागात गेल्या काही वर्षांत शेकडो बांधकामे उभी राहिली आहेत. विशेष म्हणजे मनपा प्रशासन आणि वनविभागाकडूनही या भागात नव्याने बंगले बांधण्यासाठी परवानग्या आणि ना हरकत दाखले दिले गेल्याने येऊरचे पर्यावरण धोक्यात आले आहे. शिवाय संवेदनशील क्षेत्रात वाढणारा मानवी हस्तक्षेप या भागातील वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण करत आहे.
 
 
 
२०१७ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरला पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आले. वनक्षेत्रात होणारी अतिक्रमणे व त्यांपासून निर्माण होणार्‍या वन्यजीव मानव संघर्षावर नियंत्रण मिळविण्याच्या हेतूने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने वटहुकूम काढून येऊर ‘बफर झोन’मध्ये १०० मीटरपर्यंत बांधकाम बंदी लागू केली. असे असताना वन विभाग, ठाणे मनपाने बांधकाम परवाने दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. येऊर गावामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि बांधकाम व्यवसायिकांकडून अनधिकृतपणे बंगल्यांची उभारणी केली जात आहे. २००९ मध्ये जेमतेम १३४ बंगले असलेल्या या भागात २०२० पर्यंत ५०० हून अधिक बांधकामे उभारण्यात आली आहेत. ‘लॉकडाऊन’ काळात नव्या बांधकामांची गती वेगाने वाढून ‘स्पोर्ट्स क्लब’, ‘टर्फ क्लब’, ‘रेस्टॉरन्ट’, ‘रिसॉर्ट’ आणि हॉटेल्सच्या संख्येत वाढ झाली. त्यानंतर या भागातील बांधकामांची संख्या तिपटीने वाढण्याची शक्यता आहे. आता तर ठामपाच्यावतीने या भागात बंगले प्रकल्पांसाठी बांधकाम परवानग्या दिल्या जात असून,वनविभागाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्रे मिळवून अधिकृत स्वरूपात बंगले उभारण्यात येत आहे. परिणामी, आत्तापर्यंतचे अनधिकृत येऊर आता
 
 
बंगले उभारण्याचा ठेका राष्ट्रवादीच्या नेत्याकडे?
 
येऊरच्या ‘इकोसेन्सिटिव्ह झोन’ मध्ये दहा एकर जमिनीवर दहा हजार चौरस फूट प्रीमियम निवासी बंगले विकसित करण्यासाठी ठाणे मनपाने परवानगी दिली आहे. काही श्रीमंत व प्रमुख लोकांना हे बंगले प्रीमियम किमतीत विकले जाणार असून, या प्रकल्पाचा ठेका राष्ट्रवादीच्या नेत्याकडे असल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.
 
 
वन्यप्रेमींचे आक्षेप बासनात
 
येऊरमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड अतिक्रमण झाले असून त्यात दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय गावालगतच्या वनविभागाच्या मोकळ्या जागाही हस्तगत करण्यात येत असून त्यावर मंडप सजावट, बांधकाम साहित्याची साठवण केली जाते. तर या भागातील मोठे मोकळे भूखंड पर्यटकांकडून मौजमजेसाठी वापरले जात असून पार्ट्या, मद्यप्राशन करण्याचे प्रकारही वाढत आहेत. यामुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला असून, बिबट्यासारखी श्वापदे थेट शहरात येऊ लागली आहेत. याविरोधात वन्यजीव प्रेमी आणि पर्यावरणप्रेमींकडूनही सातत्याने आक्षेप घेऊनही कार्यवाही ढीम्म आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121