नवी दिल्ली : "गेल्या वर्षभरात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले. मात्र जोपर्यंत आरोपामध्ये काही तथ्य सापडत नाही तोपर्यंत वर्षभरात कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. परंतु आता ईडीला काहीतरी तथ्य सापडलं असेल, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची कारवाई केली.", असे प्रतिपादन गुरुवारी (दि. २६ मे) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले. अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. त्यासंदर्भात ते बोलत होते.
गुन्हा घडला नसेल तर सिद्ध करून दाखवावं
"एखाद्याने गुन्हा केल्यास त्या व्यक्तीवर जर कधी ॲक्शन झालीच तर त्याने आपल्यावर झालेली कार्यवाही चुकीची आहे, असं म्हणण्यापेक्षा आपल्या हातून असं काही घडलच नाही हे कोर्टात सिद्ध करून दाखवावं. याशिवाय दुसरा महत्त्वाचा पर्याय नसतो. कारण आपण राजकारणात असल्याने आपल्यावर सुडबुध्दीने कार्यवाही होतेय; अशा म्हणण्याला आता जनताही कंटाळली आहे.", असे रावसाहेब दानवे यांचे म्हणणे आहे.
आम्हाला राज्यातील सरकार पाडायचं नाही.
"अनिल परबांवर झालेली ईडीची कार्यवाही चूकीची असेल तर त्यांनी निर्दोष असल्याचे कोर्टात सिध्द करुन दाखवावं. आम्हाला राज्यातील सरकार पाडायचं नाही. या सरकारने जनतेच्या हिताची कामं करावित. मागच्या सरकारने जी चांगली कामं केली आहेत ती सतत चालू ठेवावीत.", असे मत रावसाहेब दानवे पाटील यांनी मांडले.