मुंबई : मुंबईतील भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील पाच दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलक्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. मंगळवारी दि. २४ रोजी सकाळी, मुंबईच्या अनेक भागात हलक्या पावसाने हजेरी लावली.
बुधवारी दि. २५ रोजी शहरात उच्च आर्द्रतेची नोंद झाली. हवामान विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेनुसार दि. २५ रोजी सकाळी सापेक्ष आर्द्रता ७१ टक्के होती. आणि कुलाबा वेधशाळेनुसार ती ८७ टक्के होती. बुधवारी दि.२५ कमाल तापमान ३४.५ अंश सेल्सिअस होते. येत्या दोन दिवसांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात शहरात मोसमातील पहिल्या मान्सूनपूर्व पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. मुंबईत आठवडाभर ढगाळ आकाश पाहायला मिळेल. तसेच दि. २८ आणि दि. २९ मे रोजी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अंदमान पर्यंत पोचलेला नैऋत्य मोसमी पाऊस अजून पुढे सरकलेला नाही. संपूर्ण राज्यात मान्सूनच्या वार्षिक तारखा १२ जून ते १५ जून या आहेत. यावेळीही मान्सून त्याच वेळी महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनाची अधिकृत तारीख १0 जून आहे.