‘टेरर फंडिंग’ प्रकरणात पुण्यात जुनेदच्या आवळल्या मुसक्या

‘एटीएस’ची धडक कारवाई, ३ जूनपर्यंत कोठडीत

    25-May-2022
Total Views | 43
 
 

terror funding 
 
 
 
 
 
पुणे: दहशतवादी संघटनांना निधी पुरवल्याप्रकरणी संशयित जुनेद मोहम्मद या तरुणाच्या ‘एटीएस’च्या पथकाने येथील दापोडी परिसरातून मुसक्या आवळल्या असून त्यास न्यायालयाने दि. ३ जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जुनेद मोहम्मद दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची आणि त्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचला आणि दापोडीत त्याच्याबाबत सोमवारपासून चौकशी सुरू केली होती. मध्यरात्री त्याच्या मुसक्या आवळल्यावर मंगळवार, दि. २४ रोजी जुनेद मोहम्मदला येथील विशेष न्यायालयापुढे ‘एटीएस’ने हजर केले आणि न्यायालयाने त्याला कोठडीत पाठवले. विशेष म्हणजे, पुण्यात ‘एटीएस’ची अशा प्रकरणातील ही दुसरी कारवाई आहे.
 
फेब्रुवारी २०१९ मध्ये उत्तर प्रदेशातील एका तरुणासही पुण्यातून अटक करण्यात आली होती. आताच्या ‘एटीएस’च्या कारवाईत मिळालेल्या माहितीनुसार, जुनेद मोहम्मद काश्मीरमधील ‘गझवाते-अल-हिंद’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता. महिन्याभरापूर्वीच त्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाले होते. तो फेसबुकवरून तिघांच्या संपर्कात होता. मागील दोन वर्षांत त्याने काश्मीरला सहा वेळा जाऊन तेथील दहशतवादी संघटनांत असलेल्या लोकांशी संपर्क साधला होता. त्याच्या खात्यात जमा रकमेचा त्याने कसा विनियोग केला, स्थानिक कोणाच्या संपर्कात तो होता, त्याने तरुणांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले होते का, याबाबत आता ‘एटीएस’ चौकशीतून उलगडा करणार आहे. जुनेद मोहम्मद ‘लष्कर-ए-तोयबा’च्या आफताब शाह आणि उमर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता. या दोघांकडून त्याच्या खात्यात पैसे जमा झाले होते.
 
कोण आणि कुठला हा जुनेद?
 
पुण्याच्या दापोडी भागातून अटक केलेला आणि दहशतवादी कारवायांत सहभागी असल्याचा संशय असलेला जुनेद मोहम्मद मूळचा विदर्भातील असल्याची माहिती आहे. तो बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील रहिवासी असून गेल्या दीड वर्षांपासून तो पुण्यात राहायला आला होता. मदरशात त्याचे शिक्षण झाले आहे.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121