पुणे : शहरात कधी काळी अस्तित्वात असलेली पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरे आक्रमकांनी पाडून तेथे आज असलेल्या छोटा व बडा शेख सल्ला ही प्रार्थनास्थळे उभारली असल्याचा दावा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकार्याने केला. त्यावरून आता पुण्यनगरीतही ‘ज्ञानव्यापी’सारखे प्रकरण उभे राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. याबाबत समविचारी लोकांशी बोलून दिशा ठरवू, असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
अजय शिंदे यांनी कालच्या राज ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या वेळी ही माहिती सांगितली. हिंदूंची ही मंदिरे ताब्यात मिळावी म्हणून न्यायालयात जाण्याबाबत विचार केला जात असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. आपण पूर्वीपासूनच हा विषय हाताळत आहोत असेही ते म्हणाले. पुण्येश्वराचा इतिहास सांगताना शिंदे म्हणाले की, “अल्लाउद्दिन खिलजी याचा बडा अरब हा सरदार जेव्हा पुणे शहरावर चाल करून आला तेव्हा त्याने भगवान शंकराचे आणि पुण्येश्वर तसेच नारायणेश्वर ही दोन्ही मंदिरे उद्ध्वस्त केली.
त्यापैकी एक मंदिर शनिवार वाड्याच्या अगदी समोर आणि दुसरे लाल महालाच्या पुढे आहे. तेथे आज छोटा दर्गा आहे,” असे शिंदे म्हणाले. या सगळ्या मंदिरांवर मशिदी उभारण्यात आल्याने त्या मुक्त करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, “याबाबत भूमिका स्पष्ट करताना हा विषय आजचा नाही, तर गेली अनेक वर्षे हा विषय चर्चिला जातो, राज्याच्या विधीमंडळातदेखील चर्चा झाली, पण तोडगा निघत नाही,” असे शिंदे सोमवारी म्हणाले.