भारत सध्या चांगल्या स्थितीत नसल्याचे तसेच नरेंद्र मोदी कोणाचे ऐकत नसल्याचे राहुल गांधी या परिसंवादात बरळले. एवढेच नव्हे, तर देशात सर्वत्र रॉकेल पसरवून ठेवले असून, केवळ एक ठिणगी टाकण्याचा अवकाश कधीही भडका उडू शकतो, असे सांगताना त्यांची जीभ कचरली नाही. केंद्रातील भाजप सरकारला दूर सारणे अशक्य असल्याचे राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी नेत्यांच्या लक्षात आल्याने त्यांचा मोदी सरकारविरुद्ध असा थयथयाट सुरू केला आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अलीकडेच लंडनमध्ये ‘ब्रिज इंडिया’ नावाच्या ‘थिंक टँक’ने आयोजित केलेल्या परिसंवादात भाषण केले. आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना लक्ष्य करून त्यांच्यावर टीका केली. खरे म्हणजे आपल्या विदेश दौर्यामध्ये आपल्याच देशाची, आपल्याच देशातील सरकारची बदनामी करण्याचे पाप कोणीही देशाभिमानी करणार नाही. पण, काय बोलावे याचा पोच नसल्याचे राहुल गांधी यांनी लंडनमधील परिसंवादातील भाषणातून दाखवून दिले. भारत सध्या चांगल्या स्थितीत नसल्याचे तसेच नरेंद्र मोदी कोणाचे ऐकत नसल्याचे राहुल गांधी या परिसंवादात बरळले. एवढेच नव्हे, तर देशात सर्वत्र रॉकेल पसरवून ठेवले असून, केवळ एक ठिणगी टाकण्याचा अवकाश कधीही भडका उडू शकतो, असे सांगताना त्यांची जीभ कचरली नाही. केंद्रातील भाजप सरकारला दूर सारणे अशक्य असल्याचे राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी नेत्यांच्या लक्षात आल्याने त्यांचा मोदी सरकारविरुद्ध असा थयथयाट सुरू असल्याचे दिसून येत आहे.
‘आयडियाज फॉर इंडिया’ या शीर्षकाच्या परिसंवादात गेल्या साडेसात वर्षांमध्ये मोदी सरकारने ज्या अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या, त्यांची माहिती राहुल गांधी यांना देता आली असती. कोरोना महामारीच्या काळात देशातील गरीब जनतेची उपासमार होऊ नये म्हणून केंद्र सरकारने ज्या उपाययोजना केल्या, त्याबद्दल राहुल गांधी यांना कौतुकाचे दोन शब्द बोलता आले असते! भारताने प्रचंड प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेऊन या महामारीवर कशी मात केली, हे त्यांना सांगता आले असते. पण, यातील काहीच राहुल गांधी यांना दिसले नाही. जी परिस्थिती देशात विद्यमान नाही, त्याचे अवास्तव चित्र रंगवून विदेशात मोदी सरकारची बदनामी करण्याचे काम त्यांनी केले. प्रत्यक्षात भारतीय घटनेवर मोदी सरकारने कसलाही घाला घातला नसताना, घटनेवर हल्ला करण्यात आल्याचा आणि त्यामुळे भारतातील राज्यांना केंद्र सरकारशी संवाद साधता येत नसल्याचे राहुल गांधी यांनी ठोकून दिले.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारत ही ‘सोने की चिडिया’ आहे असे वाटते. काही थोड्यांनाच त्याचा लाभ मिळावा असे त्यांना वाटते. पण, सर्वांना समान संधी मिळायला हवी, असे आम्हास वाटते, असे राहुल गांधी म्हणाले. आपल्याला कोणी विचारत नाही म्हणून एखाद्याने किती खोटे बोलावे? समाजाच्या शेवटच्या थरातील व्यक्तीच्या उत्कर्षासाठी कार्य करण्याचा निर्धार आणि त्याप्रमाणे कृती करणार्या भारतीय जनता पक्षाबद्दल राहुल गांधी यांनी विदेशी भूमीवर इतके धादांत खोटे विधान करावे? तसेच या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करण्याचे काहीच कारण नव्हते. राहुल गांधी यांच्या वक्तव्यास संघ योग्य ते उत्तर देईल. कदाचित राहुल गांधी यांच्या या बालिश बडबडीकडे लक्षही देणार नाही! पण, राहुल गांधी यांनी संघावर टीका करण्यापूर्वी संघाचे कार्य कसे चालते, ते समजून घेण्याची गरज आहे. पण, या जन्मी त्यांना ते शक्य होईल असे वाटत नाही!
राहुल गांधी यांनी या कार्यक्रमात भारतीय विदेश सेवेवरही टीका केली. ही सेवा ‘उद्धट’ झाली असल्याची माहिती आपणास एका युरोपियन राजनैतिक अधिकार्याने दिल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधी यांच्या या टीकेला सडेतोड उत्तर दिले. भारताची विद्यमान विदेशसेवा राष्ट्रीय हित जपण्याचे, दुसर्यांच्या आरोपांना उत्तर देण्याचे कार्य करते. त्यास ‘उद्धटपणा’ असे म्हणता येणार नाही. आत्मविश्वास म्हणावे लागेल, अशी सणसणीत चपराक एस. जयशंकर यांनी लगावली. त्याचप्रमाणे देशात रॉकेल पसरवून ठेवले आहे. या राहुल गांधी यांच्या वक्तव्यास भाजपने तसेच उत्तर दिले आहे. काँग्रेस पक्षच दंगली भडकविण्यासाठी १९८४ पासून रॉकेल घेऊन फिरत आहे, असे खणखणीत उत्तर भाजपने दिले. राहुल गांधी यांनी देशातील एका सर्वात जुन्या पक्षाचे अध्यक्षपद भूषविले आहे. पण, अजूनही त्यांच्यामध्ये म्हणावी तशी परिपक्वता आल्याचे दिसत नाही. तशी परिपक्वता असती तर त्यांनी विदेशात अशी बडबड केली नसती!
श्रीरंगपट्टण येथील जामिया मशीद उभारली आहे अंजनेय मंदिरावर!
वाराणसी येथील ज्ञानवापी परिसरात शिवलिंग सापडल्याचे सर्वेक्षणात आढळून आल्यानंतर आणि त्या परिसरात हिंदू मंदिराची अनेक चिन्हे दिसून आल्यानंतर तो सर्व परिसर हिंदू समाजाच्या ताब्यात यायला हवा, अशी समस्त हिंदू समाजाची मनीषा असली तरी सध्या हा विषय न्यायालयापुढे असल्याने न्यायालय काय निर्णय देते, याची प्रतीक्षा केली जात आहे. ज्ञानवापी परिसरात असलेल्या शृंगारगौरी आणि अन्य हिंदू देवतांची नित्य पूजा करण्याची अनुमती मिळावी, यासाठी पाच महिलांनी न्यायालयाकडे दाद मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले असता, त्या न्यायालयाने जिल्हा न्यायालयाने हे प्रकरण हाताळावे, असे निर्देश दिले आहेत. हे सर्व प्रकरण तडीस नेण्यास त्या न्यायालयास किती काळ लागतो ते पाहायचे! हे सर्व विषय चर्चेत असताना मुघल आक्रमकांनी आणि सत्ताधीशांनी देशभरात कोठे आणि कोणती हिंदू मंदिरे पाडून त्यांचे मशिदीत रूपांतर केले, याची चर्चा सुरू झाली आहे. दक्षिणेत टिपू सुलतानाच्या राजवटीत तर हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार झाले होते. असंख्य हिंदूंची हत्या, असंख्य हिंदू महिलांवर बलात्कार अशा घटना टिपूच्या काळात घडल्या होत्या. अनेक धर्मस्थळांची विटंबना टिपू सुलतानाने केली होती. त्यापैकी एक म्हणजे श्रीरंगपट्टण येथे असलेले अंजनेय मंदिर.
आज तेथे अंजनेय मंदिर नसून त्या मंदिरावर जामिया मशीद उभी आहे. प्रत्यक्षात तेथे मशीद नसून अंजनेय मंदिर होते. त्यामुळे ही जागा पूजापाठ करण्यासाठी हिंदू समाजाच्या ताब्यात देण्यात यावी, अशी मागणी हिंदू समाजाने केली आहे. ‘नरेंद्र मोदी विचार मंच’ या संघटनेच्यावतीने मंड्याच्या उपायुक्तांना एक निवेदन सादर करण्यात आले असून,त्यामध्ये सदर वास्तूत अंजनेयाच्या मूर्तीची पूजा करण्याची आणि जामिया मशिदीच्या आतमध्ये पूजापाठ करण्याची अनुमती दिली जावी, अशी मागणी केली आहे. आज तेथे जी वास्तू उभी आहे, ते पूर्वीचे अंजनेय मंदिर होते. तेथे मंदिरच होते याचे ऐतिहासिक पुरावे असल्याचेही त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जामिया मशिदीच्या परिसरामध्ये जे बारव आहे, त्या ठिकाणी हिंदूंना स्नान करण्याची अनुमती देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. टिपू सुलतानाने पर्शियाच्या सत्ताधीशास जे पत्र लिहिले होते, त्या पत्रामध्ये संबंधित स्थानी अंजनेय मंदिर होते, असा उल्लेख केलेला आहे. श्रीरंगपट्टण ही टिपू सुलतानाची राजधानी होती. अंजनेय मंदिर म्हणजे सध्या असलेली जामिया मशीद तेथील किल्ल्याच्या आवारात आहे. टिपूने त्या मंदिरावर जी मशीद उभारली आहे ती १७८२ मध्ये उभारल्याचे सांगण्यात येते. मुस्लीम आक्रमकांनी आणि हिंदुस्थानावर शासन करणार्या मुस्लीम सत्ताधीशांनी असंख्य हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा इतिहास आहे. हिंदू समाजावर जो घोर अन्याय करण्यात आला, तो इतिहास हिंदू समाज विसरलेला नाही, हेच अशा घटनांवरून दिसून येते. अंजनेय मंदिर हिंदू समाजाच्या ताब्यात सहजपणे मिळते की, त्यासाठी संघर्ष करावा लागतो ते भावी काळात दिसून येईलच.
चरक शपथ दिल्याबद्दल डीन निलंबित!
अॅलोपथी वैद्यकीय अभ्यासक्रमास जाणारे विद्यार्थी ‘हिप्पोक्रॅटिक ओथ’ घेत आले आहेत. मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी या शपथेऐवजी वैद्यकशास्त्रामध्ये ज्यांनी मोठे कार्य केले, अशा चरक ऋषीच्या नावे शपथ घ्यावी, असा विचार पुढे आला आणि तो अनेक ठिकाणी कृतीतही आला. मात्र, काही राज्यांतील राजकारणी या चरक शपथेस विरोध करीत असल्याचे दिसून आले आहे. तामिळनाडूमधील मदुराई मेडिकल महाविद्यालयाचे डीन डॉ. राथिनवेल यांना तामिळनाडू शासनाने, त्या महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘महर्षी चरक शपथ’ घेतली म्हणून निलंबित केले आहे. तामिळनाडू सरकारने अशी कृती करून भारतीय थोर ऋषींचा अवमान तर केला आहेच. पण, अशी कृती करून संस्कृत भाषेबद्दल आपणास आदर नसल्याचेच त्या राज्याने दाखवून दिले आहे. सध्या त्या महाविद्यालयाच्या डीनना निलंबित करण्यात आले असून त्याची चौकशी केली जात आहे.
विद्यार्थ्यांनी ज्या कार्यक्रमात चरक शपथ घेतली त्यावेळी तेथे तामिळनाडू सरकारचे दोन मंत्रीही उपस्थित होते. चरक शपथ घेतली म्हणून त्या मंत्र्यांनी त्यावेळी आक्षेप घेतला. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या संकेतस्थळावर ही चरक शपथ इंग्रजी भाषेत उपलब्ध असून ती आम्ही घेतल्याचे स्पष्टीकरण विद्यार्थ्यांनी केले. भारताची थोर परंपरा, संस्कृत भाषा यांना तामिळनाडूमधील शासनकर्ते किती हीन वागणूक देत आहेत, ते अशा घटनेवरून लक्षात येत आहे. ‘नॅशनल मेडिकल कौन्सिल’ने तामिळनाडूमध्ये घडलेल्या या घटनेचा निषेध केला आहे. गेल्या ४० वर्षांपासून आम्ही देशभरात चरक शपथ देत आलो आहोत. यंदाच्या वर्षी भारतातील १५० वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चरक शपथ घेतली, अशी माहिती कौन्सिलकडून देण्यात आली. तामिळनाडूच्या राज्यकर्त्यांकडून आपल्याच देशातील थोर विद्वानांचा कशा प्रकारे अनादर केला गेला, हे या उदाहरणावरून दिसून आले.