पुणे : “एमआयएमला शिवसेनेनेच मोठे केले. यांच्या राजकारणासाठी, हिंदू-मुसलमान मतांच्या ध्रुवीकरणासाठी एमआयएमला मोठे केले. एमआयएम सतत हिंदूंविरोधात बोलत राहिली पाहिजे, ज्यातून यांची रोजीरोटी चालेल. पण, हे करताना यांच्या लक्षात आले नाही की, आपण एक राक्षस वाढवतोय. यांच्या राजकारणात औरंगाबादमध्ये एमआयएमचा खासदार निवडून आला. निजामाच्या औलादी महाराष्ट्रात वळवळायला लागल्या. यांना भुसभुशीत जमीन यांनीच करून दिली,” असा जोरदार घणाघात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर केला. तसेच “औरंगाबादचे लवकरात लवकर संभाजीनगर हे नामांतर करून, हे राजकारण कायमचे मोडीत काढून टाका,” अशी विनंतीदेखील राज ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधानांकडे केली. ते रविवारी येथील ‘गणेश क्रीडा कला मंच’च्या भरगच्च सभागृहात उपस्थित मनसैनिकांना संबोधित करत होते.
“पुण्याची आधी ठरलेली सभा पावसाची शक्यता म्हणून रद्द करून येथे घेतली, तशाही निवडणुका नसल्याने उगाच कशाला पावसात भिजून सभा घ्यायची,” अशी भाषणाची सुरुवात करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टोला हाणत, रविवारी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचाही आपल्या नेहमीच्या शैलीत खरपूस जोरदार समाचार घेतला.
महाराष्ट्रातील जनतेला राज्यातील राजकारण्यांचे डाव ओळखून सावध राहण्याचा सल्ला देताना, आपण केलेल्या सर्व आंदोलनाला यश मिळाल्याचेही त्यांनी पुनश्च अधोरेखित केले.
“शरद पवार हे सोयीसाठी राजकारण बदलतात आणि अफजलखान हा शिवाजी महाराजांना मारायला आला नव्हता, असे सांगणार्या शरद पवारांना औरंगजेब हा सुफी संत वाटतो,” असा घणाघात करून केवळ मतांच्या ध्रुवीकरणासाठी जनतेला खेळवत राहण्याचा उद्योग यांनी केला,” असा जोरदार प्रहार राज ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील भाषणाचा समाचार घेताना राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचे पकपक करणारे हे ढोंगी असल्याचे सांगितले. “ज्या राणा दाम्पत्याने उद्धव यांच्या विरोधात मुंबईत रान उठवले, त्याच राणांसोबत तुमचे नेते एकत्र जेवण घेतात, याचे एकाही शिवसैनिकाला काहीच वाटत नाही,” असे सांगून हिंदुत्वाच्या नावाने पोरकटपणा सुरू असल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
“मुंबईतील रेल्वे भरती, ‘रझा अकादमी’च्या मोर्चा विरोधात मनसे पक्ष रस्त्यावर उतरला होता,” असेही ते म्हणाले. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करायची गरजच काय, असा सवाल उपस्थित करणार्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवताना, “तू आहेस कोण? आजपर्यंत संभाजीनगरचा प्रश्न मिटवला का? कारण तो सतत निवडणुकांसाठी जीवंत ठेवायचा आहे. याच गोष्टी फक्त यांना करायच्या आहेत. उद्या नामांतर झाले, तर प्रश्नच मिटला. मग बोलायचे कशावर? अनेक शहरांमध्ये दहा-दहा दिवस पाणी येत नाही. ते विषयच नाहीत,” असे म्हणत संभाजीनगरमध्ये निजामाच्या औलादी तुमच्यामुळे वळवळ करायला लागल्या आणि म्हणून तुमचा खासदार तेथे पराभूत झाला,” असा टोलादेखील राज यांनी लगावला. “एमआयएमचा नेता येथे येऊन औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होतो, तरी महाराष्ट्र थंड का,” असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.
“आम्ही आंदोलन अर्धवट सोडत नाही,” असे सांगून राज ठाकरे यांनी टोलनाके, पाकिस्तानी कलाकारांना हुसकवून लावणे आणि भोंग्याच्या आंदोलनातील यशाचा पाढाही यावेळी वाचून दाखविला. ते म्हणाले की, “आम्ही विषय काढला म्हणून सकाळचा भोंग्यांचा आवाज बंद झाला, हे आपले यश आहे. त्यासाठी मी सर्व मनसे कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो,” असेही राज यावेळी म्हणाले. दि. १ जून रोजी होणार्या शस्त्रक्रियेमुळे प्रस्तावित अयोध्या भेट रद्द करावी लागत असल्याचे सांगून या भेटीला विरोधाची रसद महाराष्ट्रातून पुरवण्यात आल्याचा गंभीर आरोपदेखील राज ठाकरे यांनी केला. “आपल्या अयोध्या भेटीदरम्यान काही अप्रिय घटना झाली असती, तर येथून माझ्यासोबत जाणार्या माझ्या कार्यकर्त्यांवर केसेस लागल्या असत्या व निवडणुका लागल्या असत्या, तर आपले कार्यकर्ते मैदानात राहिले नसते,” असेही ते म्हणाले.
अयोध्येला आपण श्रीरामजन्मभूमी दर्शनासाठी तर जाणारच होतो, पण आपण या आंदोलनावेळी जे आपले कारसेवक तेथे त्यावेळी मारले गेले. त्यांची प्रेते शरयू नदीत टाकून दिल्याचे बघितले होते. त्या ठिकाणीदेखील भेट देण्याचा आपला मानस असल्याचे राज ठाकरे यांनी या सभेत स्पष्ट केले. तसेच लवकरच महाराष्ट्र सैनिकांसाठी प्रत्येक हिंदूंच्या घरोघरी पोहोचविण्यासाठी एक पत्र लवकरच जाहीर करणार असल्याची घोषणाही यावेळी राज ठाकरे यांनी केली.
...आणि अंध विद्यार्थी व्यासपीठावर!
भाषणाची सुरुवात करताना “या सभेसाठी काही अंध विद्यार्थी आले असल्याची माहिती मला मिळाली. कुठे आहेत ते?” असे विचारून राज ठाकरे यांनी ‘’या सर्व विद्यार्थ्यांना व्यासपीठावर घेऊन या,” असे सांगितले. यावेळी टाळ्यांचा कडकडाट सभागृहात झाला. या सर्व विद्यार्थ्यांना मंचावर सन्मानाने स्थान देण्यात आले. त्यानंतर राज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.