एक नजर सह्याद्रीवर

    23-May-2022
Total Views | 108
SA
 
 
 
कालच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा करण्यात आला. हा दिवस जैविक संसाधनांच्या संरक्षणासाठी आणि जागतिक जैवविविधतेविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे.महाराष्ट्राला लाभलेल्या निसर्गसंपन्न सह्याद्रीची जैवविविधता ही समृद्ध आहे परंतु त्याचे रक्षण होणे ही तितकेच गरजेचे आहे. याचाच आढावा घेणारा हा लेख.
 
 
 
आपल्या सभोवतालच्या वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांच्या विविध प्रजातींचाच नव्हे, तर त्या प्रत्येकाची आनुवांशिक विविधता आणि आपली पृथ्वी बनवणार्‍या विविध प्रकारच्या परिसंस्थांचा हा दिवस आहे. 1993च्या उत्तरार्धात संयुक्त राष्ट्रमहासभेच्या समितीने दि. 29 डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस’ म्हणून नियुक्त केला. पण, डिसेंबर 2000मध्ये, संयुक्त राष्ट्राच्या ‘जनरल असेंब्ली’ने दि. 22 मे, 1992 रोजी जैवविविधतेवरील अधिवेशनाचा मान्य मजकूर स्वीकारला. आणि या स्मरणार्थ दि. 22 मे ‘आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस’ म्हणून बदल केला गेला. याचे दुसरे कारण म्हणजे, अनेक देशांना दि. 29 डिसेंबर रोजी योग्य उत्सवांचे नियोजन करणे आणि पार पाडणे कठीण होत होते.
 
‘सर्व जीवनासाठी सामायिक भविष्य निर्माण करणे’ हा या वर्षीचा विषय आहे. आगामी ’सीओपी15 युएन जैवविविधता परिषदे’त स्वीकारल्या जाणार्‍या जागतिक जैवविविधता ‘फ्रेमवर्क’ला गती देण्यासाठी हे घोषवाक्य निवडले गेले आहे. आपल्यासमोरील समस्यांना ठामपणे हाताळणे त्याच बरोबर समस्या सोडवणे आणि वर्षानवर्षे सुरू असलेला जैविविधतेचा र्‍हास थांबवणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या मते, मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरण बदलले जात आहे. जैवविविधता आणि पर्यावरण सेवेसाठीचे ‘इंटरगव्हर्नमेंटल सायन्स-पॉलिसी’द्वारे सादर केलेला नवीन अहवाल असे नमूद करतो की, दहा लाखांहून अधिक प्राणी आणि वनस्पतींना नष्ट होण्याचा धोका आहे. आपण पर्यावरणाचा एक घटक आहोत, हे लक्षात आले, तरच निसर्गाचे होणारे नुकसान थांबवू शकू. जैवविविधतेचे नुकसान झाले की, प्रत्येक सजीवाला त्रास होतो आणि मानवतेलाही होणारच हे समजणे आवश्यक आहे. निसर्गाशी असलेल्या आपल्या नातेसंबंधांचे विश्लेषण करताना, एक वास्तव समोर येते की, आपली कितीही तांत्रिक प्रगती झाली तरीही, आपण पाणी, अन्न, औषधे, कपडे, इंधन, आश्रय, ऊर्जा अशा अनेक गोष्टींसाठी वैविध्यपूर्ण परिसंस्थांवर अवलंबून आहोत आणि राहणार. युएनच्या मते, तीन अब्जांहून अधिक लोक त्यांच्या उपजीविकेसाठी सागरी आणि किनारी जैवविविधतेवर, तर 1.6 अब्ज लोक जंगलांवर अवलंबून आहेत. म्हणून प्रजातींचे संवर्धन हे फक्त परोपकारी कर्म नसून आपल्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे.
 
 
हवामानातील बदल हा जैवविविधतेला सगळ्यात मोठा धोका आहे. अशा अनेक प्रजाती आहेत, ज्यांनी आधीच अपरिवर्तनीय परिणाम भोगले आहेत. दररोज १०० ते १५०  प्रजाती अदृश्य होत आहेत, तसेच दरवर्षी १५ ते १८  हजार प्रजाती लोप पावत आहेत. हे आकडे ठोकताळे असले, तरी आपण काय गमावतो आहोत, याची जाणीव करून देऊ शकतात.
चला तर मग, आज जागतिक जैवविविधता दिनाच्या निमित्ताने जगातील एका महत्त्वाच्या जैवविविधता ‘हॉटस्पॉट्स’बद्दल अर्थात पश्चिम घाट आणि सह्याद्रीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. उच्च भूवैज्ञानिक आणि सांस्कृतिक मूल्यांकासोबतच, जैविक विविधतेच्या संवर्धनासाठी प्रचंड जागतिक महत्त्व असलेला प्रदेश म्हणून पश्चिम घाटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. भारताच्या पश्चिम किनार्‍याजवळ केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये असलेली ही रांग 1600 किमी लांब असून 1 लाख, 40 हजार किमी क्षेत्र व्यापते. पश्चिम घाट हिमालयापेक्षा जुना असून त्यांचे महत्त्व, संपूर्ण भारतीय द्वीपकल्पातील मोठ्या प्रमाणावर जैवभौतिक आणि पर्यावरणीय प्रक्रियांवरच्या प्रभावातून दिसून येत. पश्चिम घाट आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पर्वतीय वन-परिसंस्थेचा भारतीय मान्सून हवामान पद्धतींवर प्रभाव पडतो. भारताच्या उष्ण-उष्णकटिबंधीय हवामानात पश्चिम घाट प्रणाली हस्तक्षेप करून, उष्णकटिबंधीय मान्सून प्रणालीचे एक उत्कृष्ट उदाहरण सादर करते.
 
 
पश्चिम घाटाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत उच्चपातळीची जैविक विविधता. ही पर्वत साखळी जैविक विविधतेचे जगातील आठ ’हॉटेस्ट हॉटस्पॉट्स’पैकी एक आहे. पश्चिम घाट हे जगातील उष्णकटिबंधीय सदा-हरित जंगलाचे अतिउत्तम उदाहरण आहे. जागतिक स्तरावर धोक्यात असलेल्या ‘आययुसीएन’- लाल यादीमधल्या किमान ३२५ प्रजाती पश्चिम घाटात आढळतात. इथे जागतिक स्तरावर धोक्यात असलेले २२९ वनस्पती, ३१ सस्तन प्राणी, १५ पक्षी, ४३ उभयचर, पाच सरपटणारे प्राणी आणि एक माशांची प्रजाती आढळते. इथल्या एकूण ३२५ धोक्यात असलेल्या प्रजातींपैकी १२९ प्रजाती असुरक्षित, १४५  लुप्तप्राय आणि ५१ धोकादायक म्हणून वर्गीकृत आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, पश्चिम घाटामध्ये वनस्पती आणि प्राण्यांच्या विविधतेचे अपवादात्मक स्तर आणि स्थानिकता आहे. पश्चिम घाटात आढळणार्‍या जवळपास ६५० वृक्षप्रजातींपैकी ३५२ (५४ टक्के) स्थानिक आहेत. उभयचर - १७९ प्रजाती (६५ टक्के स्थानिक), सरपटणारे प्राणी - १५७ प्रजाती (६२ टक्के स्थानिक)आणि मासे-२१९ प्रजाती (५३ टक्के स्थानिक) आहेत. आशियाई हत्ती, गवा रेडा आणि वाघ यांसारख्या जागतिक स्तरावर धोक्यात आलेल्या ’लँडस्केप’ प्रजातींच्या सर्वात मोठी संख्या इथे आढळते. ‘सिंह-पुच्छ मकाक’, ‘निलगिरी ताहर’ आणि ‘निलगिरी लंगूर’ या लुप्तप्राय प्रजाती या क्षेत्रासाठी युनिक आहेत. अनेक धोक्यात असलेले अधिवास जसे मान्सूनमध्ये फुलणार्‍या रानफुलांचे कुरण, शोला जंगले आणि मिरिस्टिकाचे दलदल इ इथे सापडते. पश्चिम घाट परिसरात व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्ये आणि राखीव जंगले असून हे सगळे राज्याच्या मालकीचे आहे, तसेच ‘वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२’, ‘भारतीय वन कायदा १९२७ ’आणि ‘वन संरक्षण कायदा १९८०’ अंतर्गत कठोर संरक्षणाच्या अधीन आहे.
 
पश्चिम घाटाने बजावलेली गंभीर हवामान आणि पर्यावरणीय भूमिका समजून घेतल्यानंतर, आता या प्रदेशाला भेडसावणारे मोठे धोके समजून घेऊया. पश्चिम घाटाचे पर्यावरणीय नुकसान ब्रिटिश वसाहतीच्या काळात सुरू झाले, ज्या दरम्यान शेती आणि मानवी वसाहती उभारण्याच्या उद्देशाने जंगलांचा मोठा भाग साफ करण्यात आला.तेव्हापासून या प्रदेशाला अनेक धोक्यांचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे एकत्रितपणे या प्रदेशातील जैवविविधतेचे लक्षणीय नुकसान झाले आहे. २००० मध्ये प्रख्यात ब्रिटिश पर्यावरणवादी नॉर्मन मायर्स यांनी केलेल्या अंदाजानुसार, पश्चिम घाट मूळ प्राथमिक वनस्पतींपैकी फक्त सात टक्के शिल्लक आहे. २०१७ मध्ये, बॉन, जर्मनी येथे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत, ‘आययुसीएन’ने ‘वर्ल्ड हेरिटेज आऊटलूक २' नावाचा अहवाल सादर केला, ज्यामध्ये त्यांनी पश्चिम घाटांना ‘अतिशय चिंताजनक’ या श्रेणीमध्ये ठेवले आहे आणि हे क्षेत्र वाढत्या लोकसंख्येच्या आणि विकासाच्या दबावाखाली आहे, असे नमूद केले आहे. तसेच परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी आणि हानिकारक प्रभाव कमी करण्यासाठी ‘लक्षीतव्यवस्थापन’ आवश्यक आहे, असे नमूद केले आहे. या प्रदेशाला सध्या भेडसावत असलेल्या धोक्यांचे उदाहरण म्हणजे बेकायदेशीर शिकार, वन उत्पादनांचे उत्खनन, जंगलांना आग इ. आणि ‘लँडस्केप’ पातळीचे धोके, जसे की खाणकाम, उत्खनन, रस्त्यांचे बांधकाम, मोठ्या आणि सूक्ष्मस्तरावरील जलविद्युत प्रकल्प, पवनचक्कीचे बांधकाम, मोठ्या प्रमाणावर कृषी विस्तार, मोनोकल्चर प्लान्टेशन्सची निर्मिती इत्यादी आहेत.
 
मला ठाऊक आहे, हे आपल्या पश्चिम घाट आणि सह्याद्रीचे महत्त्व वाचल्यावर तुम्हा प्रत्येकाला अभिमान वाटेल. पण अभिमानावर थांबू नका, भारताची तसेच पश्चिम घाटाची आणि सह्याद्रीची जैवविविधता धोक्यात आहे. दैवाने आणि निसर्गाने आपल्याला एक अमूल्य ठेवा दिला आहे. तो ठेवा सांभाळून ठेवायचा, का हे सोनं हातातून निसटू द्यायचे? हे आपण ठरवण्याची गरज आहे. फायदादेखील आपलाच आणि तोटादेखील आपलाच. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
 
-- डॉ. मयुरेश जोशी 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121